दुबईत पार पडलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघाने बाजी मारली आहे. यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अंतिम फेरीत श्रीलंकेला ९ विकेटने धुव्वा उडवत विजेतेपदावर मोहर उमटवली आहे.
ADVERTISEMENT
श्रीलंकेच्या संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींगचा निर्णय घेतला. परंतू भारतीय गोलंदाजांनी पहिल्यापासूनच भेदक मारा करत सामन्यावर आपलं वर्चस्व कायम राखलं. विकी ओसत्वाल, कौशल तांबे आणि अन्य गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या संघाने अक्षरशः नांगी टाकली. एकामागोमाग एक विकेट जाण्याचं सत्र सुरुच राहिल्यामुळे श्रीलंकेचा संघ मोठी भागीदारी करु शकला नाही.
एका क्षणाला श्रीलंकेच्या संघाची अवस्था ८ बाद ८२ अशी झाली होती. अशावेळी लंकेचा संघ शतकी धावसंख्येचा टप्पातरी ओलांडतो की नाही असं वाटत होतं. परंतू रवीन डी-सिल्वा, यसिरु रोड्रिगो, मथीशा पाथीरना यांनी भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत संघाला शतकी धावसंख्या ओलांडून दिली. ज्यामुळे निर्धारित षटकांमध्ये श्रीलंकेचा संघ ९ विकेट गमावत १०६ धावांपर्यंत मजल मारु शकला.
DLS मेथडप्रमाणे भारतीय संघाला ३२ ओव्हरमध्ये १०२ धावांचं सुधारित आव्हान देण्यात आलं. ज्याचा भारतीय संघाने यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर हरनुर सिंग झटपट माघारी परतल्यामुळे भारतीय संघाची खराब सुरुवात झाली होती. परंतू यानंतर अंगरिक्ष रघुवंशी आणि शाईक रशिद यांनी लंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून रघुवंशीने नाबाद ५६ तर रशिदने ३१ धावांची खेळी केली.
ADVERTISEMENT