विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ शुक्रवारी साऊदम्पटनच्या मैदानात वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपचा अंतिम सामना खेळण्यासाठी उतरेल. भारतीय संघाने या सामन्यासाठी अंतिम ११ खेळाडूंची यादी जाहीर केली असून यात अनुभवी खेळाडूंवर संघ व्यवस्थापनाने विश्वास दाखवला आहे. परंतू पुढील ५ ते ६ दिवस साऊदम्पटनमध्ये पावसाचा अंदाज असल्यामुळे क्रिकेटप्रेमींच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
स्थानिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १९, २० आणि २२ या तीन दिवसांमध्ये साऊदम्प्टनला पाऊस पडण्याची शक्यता आहे. १८ आणि २१ तारखेला पाऊस पडण्याची शक्यता कमी असली तरीही वातावरण ढगाळ राहणार आहे. पावसाने व्यत्यय आणल्यास आयसीसीने या स्पर्धेसाठी एक दिवस राखीव ठेवला आहे, त्या राखीव दिवशीही पावसाचा अंदाज असल्यामुळे हा सामना कसा पार पडतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
आयसीसीने या सामन्यासाठीच्या Playing Condition आणि नियम जाहीर केले आहेत. ज्यात सामना अनिर्णित राहिल्यास विजेतेपद दोन्ही संघांना विभागून देण्यात येणार आहे.
असा असेल भारताचा अंतिम ११ जणांचा संघ –
विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (व्हाईस कॅप्टन), ऋषभ पंत (विकेट किपर), रविंद्र जाडेजा, रविचंद्रन आश्विन, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी
दरम्यान, आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीसाची रक्कम जाहीर केली असून विजेत्या संघाला १२ कोटींच्या घरात रक्कम आणि मानाची गदा मिळणार आहे. ICC ने याबद्दल अधिकृत पत्रक काढून माहिती दिली. पराभूत संघाला आयसीसीकडून ५ कोटींच्या घरात रक्कम मिळणार असून तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला ३ कोटींच्या घरात रक्कम बक्षीस म्हणून मिळणार आहे. चौथ्या क्रमांकावर आलेल्या संघाला २ कोटी तर उर्वरित संघांना आयसीसी ७३ लाखांच्या घरात बक्षीस देणार आहे.
ADVERTISEMENT