T20 WC, Ind Vs Pak: दुबई: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीमध्ये भारताला आपल्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानकडून धक्कादायक पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानने भारताने तब्बल 10 गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. एखाद्या विश्वचषक सामन्यात पाकिस्तानने भारताविरोधात मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. कारण आतापर्यंत एकाही विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला विजय मिळवू दिला नव्हता. मात्र, मागील अनेक दशकांची ही परंपरा काल (24 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यामुळे मोडीत निघाली.
ADVERTISEMENT
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर मोहम्मद रिझवानच्या यांच्या शानदार खेळीच्या जोरावर पाकिस्तानने भारतावर दणदणीत असा विजय मिळवला. याच विजयाने त्यांनी भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे.
दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना फक्त 151 धावा केल्या होत्या. भारतीय संघाची फलंदाजी ही पूर्णपणे अपयशी ठरली. यावेळी फक्त एकट्या विराट कोहलीने अर्धशतक झळकावले. प्रत्युत्तरात पाकिस्तानच्या संघाने एकही विकेट न गमावता हे लक्ष्य 17 ओव्हरमध्येच गाठले. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने 68 आणि मोहम्मद रिझवानने 79 धावा केल्या.
टी -20 विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानकडून भारताचा पहिला पराभव
टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. दुबईमध्ये रविवारी खेळला गेलेला सामना पाकिस्तानच्या संघाने पहिल्यांदाच जिंकला आहे. याआधी भारताने 2007 ते 2016 पर्यंत टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये पाकिस्तानला नेहमीच पराभूत केलं होतं.
टी-20 विश्वचषकात आतापर्यंत भारत-पाकिस्तानमध्ये झालेले सामने
-
2007- भारताने पाकिस्तानचा पराभव केला (बॉल आऊट)
-
2007 – भारताने पाकिस्तानचा 5 धावांनी पराभव केला (अंतिम सामना)
-
2012- भारताने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला (कोलंबो)
-
2014- भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला (ढाका)
-
2016- भारताने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला (कोलकाता)
-
2021- पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला (दुबई)
केवळ टी-20 विश्वचषकच नव्हे तर वनडे विश्वचषकात देखील पाकिस्तानला भारतावर कधीही विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे भारताविरुद्धचा हा विजय पाकिस्तानसाठी खूपच महत्त्वाचा समजला जात आहे.
T-20 World Cup : लोकेश राहुलवर अन्याय, नो-बॉलकडे थर्ड अंपायरची डोळेझाक?
वनडे विश्वचषकात भारताचा विक्रम
-
1992: पाकिस्तानचा 43 धावांनी पराभव
-
1996: पाकिस्तानचा 39 धावांनी पराभव
-
2003: पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव
-
2011: पाकिस्तानचा 27 धावांनी पराभव
-
2015: पाकिस्तानचा 76 धावांनी पराभव
-
2019: पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव
कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पहिल्यांदाच विश्वचषकाच्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीची ही टी-20 फॉरमॅटमधील शेवटची मोठी स्पर्धा आहे. अशा परिस्थितीत विराट कोहलीच्या नावावर हा अत्यंत लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे.
ADVERTISEMENT