आपल्या कसोटी कारकिर्दीतला शंभरावा सामना खेळणाऱ्या विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध सामन्यात विक्रमाची नोंद केली आहे. कसोटी क्रिकेट कारकिर्दीत विराट कोहलीने पहिल्या डावात ८ हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारा विराट सहावा भारतीय खेळाडू ठरला आहे.
ADVERTISEMENT
याआधी सचिन तेंडुलकर (१५ हजार ९२१ धावा), राहुल द्रविड (१३ हजार २८८ धावा), सुनील गावसकर (१० हजार १२२ धावा), व्ही.व्ही.एस.लक्ष्मण (८ हजार ७८१ धावा आणि विरेंद्र सेहवाग (८ हजार ५८६ धावा) या भारतीय खेळाडूंनी हा विक्रम करुन दाखवला आहे. शतकी कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधी विराट कोहलीचा खास सत्कार करण्यात आला आहे.
भारताकडून शतकी कसोटी सामना खेळणारा विराट कोहली १२ वा खेळाडू ठरला आहे. २०१९ पासून शतक हुलकावणी देत असल्यामुळे विराट कोहली या सामन्यात शतक झळकावेल अशी सर्वांना आशा होती. रोहित शर्मा आणि मयांक अग्रवाल हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर विराटने हनुमा विहारीच्या साथीने भारतीय संघाचा डाव चांगल्या पद्धतीने सावरलाही होता. परंतू लंच सेशननंतर फिरकीपटू एम्बुलदेनियाने विराटला क्लिन बोल्ड करत श्रीलंकेला मोठी विकेट मिळवून दिली. विराटने ७६ बॉलमध्ये ५ चौकारांसह ४५ धावांची खेळी केली. विराटला शतक झळकावताना पहायला मिळेल या आशेनं मैदानात आलेल्या भारतीय चाहत्यांची मात्र यानिमीत्ताने निराशा झाली.
शंभरावी कसोटी आणि विराट-सचिनची तुलना, कोहली मोडू शकेल का तेंडुलकरचा रेकॉर्ड?
ADVERTISEMENT