खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल २०२१ च्या सिझनमधील उर्वरित सामने स्थगित केले आहेत. सर्वात आधी KKR त्यानंतर CSK आणि नंतर SRH मधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. देश कोरोनाच्या संकटाशी लढत असताना आयपीएल स्पर्धा खेळवण्याची गरज आहे का अशी विचारणा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत होती. त्यातच खेळाडूंच्या सुरक्षिततेसाठी तयार करण्यात आलेल्या बायो सिक्युअर बबल मोडण्यात आल्यामुळे बीसीसीआयला ही स्पर्धा स्थगित करावी लागली.
ADVERTISEMENT
IPL 2021 : Bio Secure Bubble म्हणजे नक्की काय?
परंतू अनेक क्रिकेटप्रेमींना आयपीएलची स्पर्धा मध्यावधीतच स्थगित करण्यात आल्यामुळे पुढे या स्पर्धेचं काय होणार…येणाऱ्या काही महिन्यांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार की नाही? असा प्रश्न पडला आहे. आयसीसीच्या यंदाच्या वर्षातल्या कॅलेंडरचा विचार केला असताना BCCI समोर यंदाच्या हंगामात आयपीएल स्पर्धा खेळवण्यासाठी ३ पर्याय उपलब्ध आहेत.
मोठी बातमी! IPL चे सामने स्थगित, SRH च्या साहाला कोरोनाची लागण
पहिला पर्याय – १० दिवसांचा ब्रेक घेऊन आयपीएलचे उर्वरित सामने मुंबईत हलवता येतील
कोलकाता आणि चेन्नईच्या गोटात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआय या पर्यायाची चाचपणी करत होतं. ३ स्टेडीयम (वानखेडे, ब्रेबॉन, डी.वाय.पाटील) असल्यामुळे बीसीसीआय संपूर्ण स्पर्धा मुंबईत हलवण्याचा विचार करत असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. बीसीसीआयने सध्या स्पर्धा स्थगित केली असली तरीही बीसीसीआय या पर्यायाचा अजुनही विचार करु शकतं. परंतू सध्याची परिस्थिती पाहता सर्व खेळाडूंना १० दिवसांचा ब्रेक मिळणं गरजेचं आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांमध्ये लॉकडाउनमुळे रुग्णंसख्या आटोक्यात आली आहे. शहरात कोरोनाचा धोका टळला नसला तरीही इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतलं वातावरण बीसीसीआयसाठी योग्य आहे. अशा परिस्थितीत १० दिवसांच्या ब्रेकमध्ये बीसीसीआय मुंबईत बायो सिक्युअर बबल तयार करुन योग्य ती खबरदारी घेत सर्व सामने मुंबईत हलवू शकतं.
दुसरा पर्याय – WTC फायनल पुढे ढकलून आयपीएल जून महिन्यात युएईमध्ये भरवता येईल
यंदाच्या वर्षात आयपीएलचा उर्वरित हंगाम संपवायचा असेल तर बीसीसीआयसमोर हा आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. परंतू यासाठी बीसीसीआयला आयसीसीच्या दरबारात आपलं वजन वापरण्याची वेळ येऊ शकते. जून महिन्यात आयपीएल स्पर्धा युएईत खेळवण्याचा विचार झाल्यास १८ जूनपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील World Test Championship च्या फायनल मॅचवर याचा फरक पडू शकतो. त्यामुळे बीसीसीआयला आयसीसी सोबतच न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचीही मनधरणी करावी लागू शकते. परंतू बीसीसीआयने या पर्यायाचा विचार केला तरीही प्रॉब्लेम संपत नाहीयेत.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने १ जून ते २० जून या कालावधीत पाकिस्तान सुपरलिग स्पर्धेचे उर्वरित सामने खेळवण्याची तयारी केली आहे. पाकिस्तान सुपर लिगचे सामनेही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करावे लागले होते. पण असं असलं तरीही आयपीएल जून महिन्यात खेळवता येऊ शकते. कारण फार कमी परदेशी खेळाडू हे आयपीएल आणि पीएसएल अशा दोन्ही स्पर्धांमध्ये खेळतात. त्यामुळे बीसीसीआयने जून महिन्यात आयपीएल खेळवायचं ठरवल्यास ते परदेशी खेळाडूंना कोणती स्पर्धा खेळायची आहे हे निवडण्याचा अधिकार देऊ शकतात. पण यासाठीही बीसीसीआयला पाक क्रिकेट बोर्डाशी चर्चा करावीच लागणार आहे.
तिसरा पर्याय – टी-२० वर्ल्डकपआधी ऑक्टोबर महिन्यात युएईत आयपीएलचं आयोजन करता येईल
यंदाच्या वर्षात भारताचा इंग्लंड दौरा हा १४ सप्टेंबरला संपतो आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषकाचं आयोजन आहे. ही स्पर्धा भारतामध्येच खेळवण्याबद्दल बीसीसीआयने तयारी केली असली तरीही कोरोनामुळे परिस्थिती बिघडत गेल्यास युएईत ही स्पर्धा खेळवण्याचा पर्याय बीसीसीआयने खुला ठेवला आहे. अशा परिस्थितीत टी-२० वर्ल्डकप युएईला भरवला गेला तर बीसीसीआय आयपीएलचा उर्वरित हंगामही ऑक्टोबरमध्ये युएईत खेळवू शकते. यामुळे एका स्पर्धेच्या बायो बबलमधून बाहेर पडल्यानंतर खेळाडू दुसऱ्या महत्वाच्या स्पर्धेसाठीच्या बायो बबलमध्ये प्रवेश करु शकतात. परंतू या पर्यायातही बीसीसीआयने अनेकांच्या परवानग्या आणि मनधरणी करावी लागणार आहे.
ADVERTISEMENT