एकीकडे महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेशी संवाद साधत असताना दोन दिवसांत पर्याय मिळाला नाही तर राज्यात लॉकडाउन लावावा लागेल असे संकेत दिले आहेत. एकीकडे राज्यात लॉकडाउनची टांगती तलवार असताना ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या चौदाव्या सिझनवरही गंडातर तयार झालं आहे. १० ते २५ एप्रिलदरम्यान आयपीएलचे सामने मुंबईत खेळवले जाणार आहेत. परंतू राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता लॉकडाउन लागल्यास…मुंबईचे सामने हैदराबादला हलवण्यात येऊ शकतात. बीसीसीआयने हैदराबादचा पर्यायी जागा म्हणून विचार करुन ठेवला आहे. ESPNCricinfo ने यासंदर्भातली बातमी दिली आहे. चेन्नई, मुंबई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरु अशा सहा शहरांमध्ये यंदाचा हंगाम खेळवला जाणार आहे.
ADVERTISEMENT
IPL वर टांगती तलवार? वानखेडे मैदानावरील ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
एकीकडे राज्यात लॉकडाउनसदृष्य परिस्थिती तयार झाली असली तरीही राज्य सरकारने बीसीसीआयला या गोष्टीचा सामन्यांवर परिणाम होणार नाही याची खात्री दिली आहे. आयपीएलसाठी सर्व खेळाडू याआधीच Bio Secure Bubble मध्ये गेले आहेत. त्यातच बीसीसीआयने यंदाचा हंगामही प्रेक्षकांविना खेळवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे खेळाडू Bubble बाहेरील व्यक्तींशी संपर्कात येण्याचा प्रश्न उद्भवत नाहीये. चेन्नई सुपरकिंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे चार संघ मुंबईत आपले पहिले सामने खेळणार आहेत.
दरम्यान राज्य सरकारने बीसीसीआयने सामन्यांच्या आयोजनाबद्दल खात्री दिली असली तरीही सध्या निर्माण झालेल्या अनिश्चीततेच्या वातावरणामुळे बीसीसीआयने खबरदारीचा उपाय म्हणून हैदराबादचा पर्याय खुला ठेवला आहे. त्यातच वानखेडे मैदानातील ८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे बीसीसीआयसमोरील चिंतेत आणखी भर पडली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलचे सामने मुंबईतच पार पडतील. “अद्याप पर्यायी जागेबद्दलची कोणतीही माहिती आम्हाला मिळालेली नाही. महाराष्ट्रात चाचण्यांच प्रमाण जास्त असल्यामुळे रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. राज्यात जरी लॉकडाउन लागलं तरीही त्याचा सामन्यांवर काही परिणाम होईल अशा प्रकारची कोणतीही माहिती आम्हाला राज्य सरकारकडून मिळालेली नाही.” त्यामुळे राज्यात लॉकडाउन लागल्यास आयपीएलच्या भवितव्याबद्दल काय निर्णय घेतला जातोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
IPL 2021 Explainer : ऋषभकडे दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन्सी, निर्णय किती बरोबर किती चूक?
ADVERTISEMENT