IPL 2021 रद्द झालेलं नाही, सामने होणारच – BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांची माहिती

मुंबई तक

• 04:38 PM • 04 May 2021

Bio Secure Bubble मध्ये असलेल्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित केले. यानंतर अनेकांच्या मनात यंदाची आयपीएल स्पर्धेबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या सर्व शंकांचं निरसन करत यंदाची आयपीएल स्पर्धा ही रद्द झालेली नसून फक्त स्थगित करण्यात आलेली आहे अशी माहिती दिली. ते Star Sports चॅनलवर […]

Mumbaitak
follow google news

Bio Secure Bubble मध्ये असलेल्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे उर्वरित सामने स्थगित केले. यानंतर अनेकांच्या मनात यंदाची आयपीएल स्पर्धेबद्दल अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या सर्व शंकांचं निरसन करत यंदाची आयपीएल स्पर्धा ही रद्द झालेली नसून फक्त स्थगित करण्यात आलेली आहे अशी माहिती दिली. ते Star Sports चॅनलवर बोलत होते.

हे वाचलं का?

“मी एक गोष्ट सर्वांना स्पष्ट करु इच्छितो, IPL 2021 स्पर्धा रद्द झालेली नाही. ती स्थगित करण्यात आली आहे, पुढे ढकलण्यात आली आहे…यंदाच्या हंगामातले उर्वरित सामने हे होणारच. येणाऱ्या काळात देशात कोरोनाची परिस्थिती सुधारली की आम्ही याबद्दल चर्चा करुन निर्णय घेऊ. खेळाडूंचं आरोग्य लक्षात घेऊनच बीसीसीआयने यंदाची स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. काही खेळाडूंना स्पर्धा मध्यावर सोडायची होती, त्यामुळे त्यांनी संघाशी चर्चा केली. सध्याची परिस्थिती पाहून आम्हाला गरजेनुसार योग्य ते निर्णय घ्यावे लागणार होते. त्यामुळे खेळाडूंसोबत असलेला त्यांचा परिवार व इतर बाबी लक्षात घेता यंदाची स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.”

IPL 2021 स्थगित, BCCI ला दोन हजार कोटींचं नुकसान

दरम्यान स्पर्धा स्थगित झाल्यानंतर बीसीसीआय आता उर्वरित महिन्यांमध्ये ही स्पर्धा कधी भरवता येईल याच्या तयारीला लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या कालावधीत बीसीसीआय उर्वरित सामने खेळवता येऊ शकतात का याबद्दल चाचपणी करत आहे. “सप्टेंबर महिन्यात उर्वरित सामने खेळवता येतील का याची आम्ही चौकशी करत आहोत. या वेळपर्यंत भारत विरुद्ध इंग्लंड दौरा संपलेला असेल. सर्व परदेशी खेळाडू हे टी-२० वर्ल्डकपसाठी तयार होत असतील. यादरम्यान मिळणाऱ्या कालावधीत हे सामने खेळवता येतील का याची चाचपणी केली जात आहे.” BCCI च्या एका अधिकाऱ्याने Cricbuzz शी बोलताना ही माहिती दिली.

यासाठी बीसीसीआयला आयसीसी आणि इतर संबंधित बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन अनेक परवानग्या मिळवाव्या लागणार आहेत. दरम्यान, यंदाचा हंगाम मध्यावधीत स्थगित करावा लागल्यामुळे बीसीसीआयला अंदाजे दोन ते अडीच हजार कोटींच्या घरात नुकसान सहन करावं लागणार आहे. ब्रॉडकास्ट आणि स्पॉन्सरशीपच्या माध्यमातून मिळणाऱ्या पैशांवर बीसीसीआयला यंदा पाणी सोडावं लागणार असं दिसत आहे. “स्पर्धा मध्यावधीत स्थगित करावी लागल्यामुळे आम्हाला अंदाजे दोन ते अडीच हजार कोटींचं नुकसान होणार आहे.” बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली. बीसीसीआयला सध्याच्या परिस्थितीत Star Sports या चॅनलकडून मिळणाऱ्या ब्रॉडकास्टिंग राईट्सच्या पैशांचा मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. प्रत्येक हंगामात बीसीसीआयला Star कडून सर्वाधिक पैसे मिळतात. Star India आणि BCCI यांच्यात आयपीएलच्या सामन्यांचं ब्रॉडकास्टिंग करण्यासाठी ५ वर्षांचा करार झाला होता.

IPL 2021 कोरोनामुळे स्थगित, BCCI समोर स्पर्धा पुन्हा खेळवण्यासाठी हे ३ पर्याय उपलब्ध

    follow whatsapp