आयपीएलच्या पंधराव्या हंगामाच्या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने आपल्या संघाचं कर्णधारपद कोण भूषवणार या यक्षप्रश्नाचं उत्तर शोधल्याचं पहायला मिळतंय. पहिल्या टप्प्यातील लिलावामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने मुंबईकर श्रेयस अय्यर आणि ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार पॅट कमिन्सवर बोली लावून त्यांना आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे.
ADVERTISEMENT
याआधीच्या हंगामात श्रेयस अय्यर हा दिल्लीच्या संघाकडे होता. परंतू २०२१ मध्ये दुखापतीमुळे अर्धा हंगाम श्रेयसला खेळता आलं नाही, ज्यामुळे ऋषभ पंतकडे संघाचं कर्णधारपद गेलं. त्यातचं दिल्लीने श्रेयसला नवीन हंगामासाठी संघात कायम राखलं नव्हतं, त्यामुळे श्रेयस अय्यरवर सर्व संघांच्या नजरा होता. लिलावासाठी श्रेयसचं नाव सुरु झाल्यानंतर दिल्ली आणि कोलकातामध्ये चुरस सुरु झाली. परंतू ९ कोटींच्या बोलीवर दिल्लीचा संघ श्रेयससाठीच्या शर्यतीतून बाहेर पडला.
यामुळे श्रेयस आता KKR मध्ये दाखल होणार असं वाटत असतानाच अहमदाबादच्या संघाने आत उडी घेतली. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १० कोटींची बोली ओलांडणारा श्रेयस पहिला खेळाडू ठरला. अखेरीस शेवटपर्यंत तग धरुन राहिलेल्या KKR ने १२ कोटी २५ लाखांच्या बोलीवर श्रेयसला संघात कायम राखलंय.
त्याआधी KKR ने आपल्या संघातील अनुभवी खेळाडू पॅट कमिन्ससाठीही ७ कोटी २५ लाख रुपये मोजले. कमिन्सने नुकतच Ashes मालिकेत संघाचं नेतृत्व केलं. त्यामुळे कोलकाता संघाकडे आता कर्णधारपदासाठी दोन पर्याय तयार झाले आहेत. संघाचा सहायक प्रशिक्षक अभिषेक नायरनेही, कमिन्स आणि श्रेयस अय्यर हे दोन्ही खेळाडू आपल्या संघासाठी महत्वाचे असून कर्णधारपदाचा निर्णय योग्य वेळेत घेतला जाईल असं जाहीर केलं आहे.
ADVERTISEMENT