मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या निमीत्तानं राजकीय नेते पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरले आहेत. शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना यंदाच्या निवडणुकीत रंगताना पाहायला मिळू शकतो. परंतु राजकीय नेत्यांची MCA निवडणुकीत उतरण्याची ही पहिलीच वेळ नाही. 1930 साली स्थापन झालेल्या MCA मध्ये राजकारणाचा शिरकाव झाला तो 1963 मध्ये. शेषराव वानखेडेंपासून शरद पवारांपर्यंत अनेक दिग्गजांनी MCA निवडणुकीत आपलं नशिब आजमावलं आहे.
ADVERTISEMENT
शेषरावांनी वानखेडे स्टेडियम बांधले आणि अध्यक्षही झाले
तत्कालीन मंत्री असलेल्या शेषराव वानखेडेंनी वानखेडे स्टेडियमची उभारणी केली. आणि त्यानंतर त्यांच्या खांद्यावर मुंबई क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी देण्यात आली. 1963 पासून 1987 पर्यंत शेषराव वानखेडे अध्यक्ष पदावर होते. वानखेडे हे 1980 ते 1983 पर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचेही अध्यक्ष होते. शेषराव वानखेडे हे काँग्रेसचे मंत्री होते तसेच ते बॉम्बे विधानसभेचे पहिले अध्यक्षही राहिले आहेत.
मनोहर जोशी, शरद पवारही दिर्घकाळ होते पदावर
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे देखील दिर्घकाळ अध्यक्ष पदावर होते. 1992 ते 2001 या काळात मनोहर जोशी अध्यक्ष पदावर होते. माजी क्रिकेटपटू माधव मंत्री यांचा पराभव करत जोशी निवडून आले होते. मनोहर जोशी यांच्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष पदावर आले. माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचा पराभव करत पवार अध्यक्ष पदाच्या गादीवर विराजमान झाले. 2001 ते 2011 च्या काळात त्यांनी मुंबई क्रिकेटवरती आपली सत्ता गाजवली.
विलासराव देशमुखांनाही MCA ची भुरळ
आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार यांच्या गटात असलेल्या विलासराव देशमुखांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांचा पराभव करून एमसीएचे अध्यक्ष बनले होते. देशमुख यांना 181 तर वेंगसरकर यांना136 मतं मिळाली होती. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये देशमुख आणि वेंगसरकर हे दोघेही उपाध्यक्ष होते.
काँग्रेस vs राष्ट्रवादी vs भाजप रंगलेली निवडणूक
2001 पासून 2011 पर्यंत मुंबई क्रिकेटवरती आपलं वर्चस्व गाजवलेल्या शरद पवारांना 2013 च्या निवडणुकीत शह देण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृश्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी तयारी केल्याची चर्चा होती. माजगाव क्रिकेट क्लबचे सदस्य होत मुंबई क्रिकेटच्या निवडणुकीत चव्हाणांनी एन्ट्री घेतली होती. त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनीही 2013 ची निवडणुक लढवण्याचे संकेत दिले होते. परंतु नंतर शरद पवारांनी या निवडणुकीत विजय मिळवत पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवून दिलं. त्यानंतर 2013 ते 2017 या काळात शरद पवार अध्यक्ष होते.
अनेक दिग्गज नेत्यांचा मतदाराच्या रुपात MCAमध्ये प्रवेश
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, मिलींद नार्वेकर, नारायण राणे, नितीन सरदेसाई, जितेंद्र आव्हाड, सचिन अहिर, आशिष शेलार, राहुल शेवाळे, पंकज ठाकूर या नेत्यांनी मतदार म्हणून मुंबई क्रिकेटमध्ये एन्ट्री घेतलेली आहे. यापैकी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे मुंबई क्रिकेटचे 2017 ते 2018 या काळात अध्यक्ष राहिलेले आहेत. यंदाची निवडणुकही लढण्याचे संकेत आशिष शेलार यांनी दिलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचा सामना शरद पवार यांच्याशी असणार आहे. कारण शरद पवार यांच्या बाजूने संदिप पाटील यांनी निवडणुकीचा फॉर्म भरला असल्याची चर्चा आहे.
ADVERTISEMENT