भारताच्या १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार यश धुलने आपल्या रणजी क्रिकेट स्पर्धेची सुरुवात अतिशय संस्मरणीय पद्धतीने केली आहे. तामिळनाडूविरुद्ध रणजी सामन्यात यशने दोन्ही डावांत शतक झळकावलं आहे. पदार्पणाच्या रणजी क्रिकेट सामन्यात दोन्ही डावांत शतक झळकावणारा यश धुल हा तिसरा फलंदाज ठरला आहे.
ADVERTISEMENT
याआधी नरी काँट्रॅक्टर यांनी गुजरातकडून खेळताना, विराट स्वातेने महाराष्ट्राकडून खेळताना हा पराक्रम करुन दाखवला आहे.
यश धुल सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने कॅरेबिअन बेटांवर विश्वचषक स्पर्धा जिंकली. यानंतर आयपीएलच्या लिलावात यशवर दिल्ली कॅपिटल्सने बोली लावून त्याला संघात दाखल करुन घेतलं. यानंतर यशने लागोपाठ दोन इनिंगमध्ये शतक झळकावून स्वतःची उपयुक्तता सिद्ध केली.
यश धुल आणि ध्रुव शौरीने दिल्लीसाठी दुसऱ्या इनिंगमध्ये केलेल्या भागीदारीच्या जोरावर दिल्लीने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी २२८ धावांची भागीदारी केली.
U-19 विश्वचषक स्पर्धेत यश धुलला कोरोनाची लागण झाल्यामुळे तो दोन सामन्यांना मुकला होता. परंतू यानंतरही त्याने कोरोनावर मात करुन दमदार पुनरागमन करत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात निर्णायक शतकी खेळी करुन संघाच्या विजयात मोलाचा हातभार लावला होता.
ADVERTISEMENT