सर्वात आधी टेस्ट सिरीज आणि त्यानंतर टी-२० मध्ये बाजी मारल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध ३ वन-डे मॅचची सिरीज खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. मंगळवारपासून पुण्याच्या गहुंजे स्टेडीअमवर ३ वन-डे मॅच खेळवल्या जातील. टी-२० सिरीजमध्ये भारतीय संघ दोनवेळा पिछाडीवर पडला होता. परंतू यानंतरही अत्यंत सफाईदार पद्धतीने कमबॅक करत भारताने बाजी मारली. ओपनिंगसाठीही टी-२० सिरीजमध्ये मध्ये अनेक प्रयोग करण्यात आले. परंतू वन-डे सिरीजसाठी रोहित शर्मा आणि शिखरच ओपनिंगला येणार असल्याचं कॅप्टन विराट कोहलीने स्पष्ट केलंय.
ADVERTISEMENT
“शिखर धवन आणि रोहित शर्मा टीम इंडियासाठी ओपनिंग करतील. जेव्हा वन-डे क्रिकेटचा प्रश्न येतो तेव्हा यात कोणतीही शंका नसते. गेल्या काही वर्षांपासून ते दोघंही आमच्यासाठी चांगली कामगिरी करतायत.” विराट कोहली पहिल्या वन-डे मॅचआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होता. इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या टी-२० सिरीजमध्ये भारताने ओपनिंगसाठी ४ कॉम्बिनेशन्स ट्राय करुन बघितली होती.
नुकत्याच पार पडलेल्या टी-२० सिरीजमध्ये पहिल्या दोन सामन्यात भारताने रोहित शर्माला विश्रांती देऊन शिखर आणि लोकेश राहुलला संधी दिली होती. परंतू ही जोडी फेल गेल्यानंतर भारताने तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माला पुन्हा एकदा संघात स्थान दिलं. दरम्यान अखेरच्या टी-२० सामन्यात विराट कोहली स्वतः रोहित शर्मासोबत ओपनिंगला आला होता. या सामन्यात दोन्ही बॅट्समननी तुफान फटकेबाजी करत इंग्लंडच्या बॉलर्सना सळो की पळो करुन सोडलं होतं. परंतू भविष्यातही मी असंच ओपनिंगला येईन याची खात्री नसल्याचं विराटने स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT