झिम्बाब्वेचा माजी वेगवान गोलंदाज हेन्री ओलांगाला प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहते ओळखतात. भारतीय संघ सध्या झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहे, झिम्बाब्वेचा संघ सध्या कमकुवत असला तरी एकेकाळी टीम इंडियाला तो संघ हुकुमत गाजवत होता. हेन्री ओलांगा आणि सचिन तेंडुलकर यांच्यातील लढत चाहत्यांना चांगलीच आठवते.
ADVERTISEMENT
भारत-झिम्बाब्वे मालिका सुरु असताना, माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने एक किस्सा सांगितला आहे, जो हेन्री ओलांगा आणि सचिन तेंडुलकर यांच्यामधला आहे. अजय जडेजाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा हेन्री ओलांगाने सचिन तेंडुलकरला आपल्या गोलंदाजीने त्रस्त केले होते आणि 1998 च्या कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची विकेट घेतली तेव्हा त्याला उत्तर द्यायचे होते म्हणून सचिन निट झोपू शकला नव्हता.
गांगुली, द्रविड, सचिन तेंडुलकरची दांडी केली होती गुल
1998 मध्ये जेव्हा कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि झिम्बाब्वे आमनेसामने होते, तेव्हाची ही घटना आहे. आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालणाऱ्या हेन्री ओलांगाने त्या सामन्यात सौरव गांगुली आणि राहुल द्रविडच्या विकेट घेतल्या, त्यानंतर सचिन तेंडुलकरलाही बाऊन्सरने पॅव्हेलियनमध्ये पाठवले त्यानंतर त्याचा जल्लोष पाहून प्रत्येक भारतीयाला चिड आली असेल.
कोका-कोला चषकाच्या त्या सामन्यात हेन्री ओलांगाने चार विकेट घेतल्यामुळे भारतीय संघ हा सामना हरला. पण टीम इंडियाने कोका-कोला कपच्या फायनलमध्ये झिम्बाब्वेचा दहा गडी राखून पराभव करून त्याचा बदला पूर्ण केला.
सचिन तेंडुलकरने रात्रभर जागून आखला प्लॅन
अजय जडेजाने सांगितले की, त्या चेंडूने सचिन तेंडुलकरला बदलले, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला सचिनसोबत खेळण्याची संधी मिळाली. कारण तो कोणत्याही दुसऱ्या अभिमानात जगत नसून त्याला त्याच्या खेळाचा अभिमान होता. जेव्हा हेन्री ओलांगाने त्याला आऊट केले तेव्हा तो विचार करत राहिला आणि त्याला नीट झोपही आली नाही. रात्रभर तो त्या चेंडूबद्दल अस्वस्थ आणि काळजीत होता. कारण आम्ही तो सामना गमावला होता.
फायनलमध्ये सचिनने सूड उगवला होता
सचिनचा हा राग केवळ 36 तास टिकला. कारण त्या सामन्यानंतर जेव्हा भारत आणि झिम्बाब्वे याच मालिकेतील अंतिम सामन्यात पुन्हा आमने-सामने आले, तेव्हा सचिन तेंडुलकरने झिम्बाब्वेच्या हेन्री ओलांगाला आपल्या बॅटची हवा दाखवली. सचिनने त्या डावात अवघ्या 92 चेंडूत 124 धावा केल्या होत्या आणि हेन्री ओलांगालाही चौकार आणि षटकार ठोकले होते.
कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या त्या अंतिम सामन्यात, झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना केवळ 196 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने 10 गडी राखून सामना जिंकला होता. सौरव गांगुलीने नाबाद 63 आणि सचिन तेंडुलकरने 92 चेंडूत 124 धावा केल्या, ज्यात 12 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. टीम इंडियाने अवघ्या 30 षटकांत लक्ष्य गाठले, या सामन्यात हेन्री ओलांगाने 6 षटकांत 50 धावा दिल्या होत्या.
ADVERTISEMENT