Ind vs Pak : या ४ कारणांमुळे टीम इंडिया T20 World Cup विजयाची प्रबळ दावेदार

मुंबई तक

• 09:25 AM • 24 Oct 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा ही अत्यंत महत्वाची असणार आहे. यासाठीचं कारण म्हणजे या स्पर्धेनंतर विराट कोहली टी-२० ची कॅप्टन्सी सोडणार आहे. विराटने आतापर्यंत टीम इंडियाला एकदाही आयसीसी स्पर्धांचं विजेतेपद मिळवून दिलं नाही. त्यामुळे विराट कोहलीसाठी स्वतःला कॅप्टन म्हणून सिद्ध करायची ही शेवटची संधी असणार आहे. मग संपूर्ण स्पर्धेचा विचार करायला […]

Mumbaitak
follow google news

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी यंदाची टी-२० विश्वचषक स्पर्धा ही अत्यंत महत्वाची असणार आहे. यासाठीचं कारण म्हणजे या स्पर्धेनंतर विराट कोहली टी-२० ची कॅप्टन्सी सोडणार आहे. विराटने आतापर्यंत टीम इंडियाला एकदाही आयसीसी स्पर्धांचं विजेतेपद मिळवून दिलं नाही. त्यामुळे विराट कोहलीसाठी स्वतःला कॅप्टन म्हणून सिद्ध करायची ही शेवटची संधी असणार आहे.

हे वाचलं का?

मग संपूर्ण स्पर्धेचा विचार करायला गेला तर असे कोणते ४ मुद्दे आहेत की ज्या जोरावर टीम इंडिया ही स्पर्धा जिंकू शकते? याचा आढावा घेणार आहोत.

कारण पहिलं – धोनी टीम इंडियाचा मेंटॉर

स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच बीसीसीआयने महेंद्रसिंह धोनीला भारतीय संघासाठी मेंटॉर म्हणून नेमण्याचा चतूरपणा दाखवला. टी-२० मध्ये कॅप्टन म्हणून धोनीची कामगिरी आणि त्याचा इतिहास हा सर्वमान्य आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे धोनीने वयाच्या ४० व्या वर्षी चेन्नईला आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलंय. त्यामुळे अबु धाबी, शारजाह, दुबई या तिन्ही ठिकाणच्या पिचेसची धोनीला इत्तंभूत माहिती झाली आहे. कोणतही खेळपट्टी कधी कसा रंग दाखवेल याचा अंदाज धोनीला आल्यामुळे त्याचा अनुभव हा प्रत्येक सामन्यात संघनिवडीसाठी महत्वाचा ठरु शकतो.

T20 World Cup : दुबईत आज दोन शेजारी आपापसात भिडणार, जाणून घ्या विजयाची आकडेवारी काय सांगते?

कारणं दुसरं – आघाडीचा तोफखाना

यंदाची स्पर्धा भारत जिंकू शकतो यामागचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे भारताचे आघाडीचे तीन फलंदाज. सलामीला रोहित शर्मा आणि त्याच्यासोबत सध्याच्या संघाचा विचार करायला गेलं तर लोकेश राहुल आणि इशान किशन हे डेडली कॉम्बिनेशन ठरु शकतं. सराव सामन्यात रोहित शर्मा, इशान किशन, लोकेश राहुल यांनी केलेली बॅटींग पाहिली की एक गोष्ट आपल्या नक्कीच लक्षात येतील ती म्हणजे जर हे तिन्ही फलंदाज प्रत्यक्ष स्पर्धेत आपल्या नेहमीच्या फॉर्मात खेळले तर त्यांना थांबवणं कठीण होऊन बसेल.

याव्यतिरीक्त सूर्यकुमार यादव, विराट कोहली यांच्यासारखे खंदे फलंदाज भारताकडे आहेत ज्याचा फायदा हा संघाला होऊ शकतो. विशेषकरुन सूर्यकुमारची डेथ ओव्हर्समधली फटकेबाजी ही भारतीय संघासाठी प्लस पॉईंट ठरु शकते.

T20 World Cup : रोहित शर्माकडून भारताला आशा, परंतू पाकिस्तानविरुद्धची कामगिरी ठरु शकते चिंतेचा विषय

कारण तिसरं – फिरकीचं जाळं

युएईतल्या खेळपट्ट्यांवर स्पिनर्सचा बोलबाला असतो ही बाब आता लपून राहिलेली नाही. भारताने यंदा अनुभवी आणि युवा अशा फिरकीपटूंना संघात स्थान दिलंय. तब्बल ४ वर्षांनी रविचंद्रन आश्विन भारताच्या टी-२० संघात परतला आहे. आयपीएलमध्ये पॉवरप्लेच्या ओव्हर्समध्ये त्याने बॉलिंग करुन विकेट घेत स्वतःला सिद्ध केलंय. त्याच्यासोबत रविंद्र जाडेजा, राहुल चहर आणि मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती यांचाही ऑप्शन भारताकडे उपलब्ध आहे.

वरुण चक्रवर्तीच्या फिटनेसचा इश्यू जरीही असला तरीही त्याचे गुगली बॉल हे प्रतिस्पर्ध्याला नक्कीच पेचात पाडू शकतात. त्यामुळे अचूक टप्पा आणि योग्य दिशेने जर भारताच्या स्पिनर्सचे बॉल पडले तर समोरचा फलंदाज जाळ्यात अडकलाच म्हणून समजा.

कारणं चौथं – धडकी भरवणारे फास्ट बॉलर्स

जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि अखेरच्या टप्प्यात राखीव खेळाडूंमधून मुख्य संघात दाखल झालेला मुंबईकर शार्दुल ठाकूर. भारताच्या या तिन्ही बॉलर्सकडे आपलं स्वतःचं वैशिष्ट्य आहे. जसप्रीत बुमराहचे डेडली यॉर्कर बॉल, भुवनेश्वर कुमारचा नॅचरल स्विंग आणि शार्दुलचं मोक्याच्या क्षणी विकेट काढण्याचं कौशल्य भारतासाठी प्लस पॉईंट ठरु शकतं. भुवनेश्वर कुमारने प्रदीर्घ काळानंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. सध्याची आकडेवारी ही त्याच्या बाजूने नसली तरीही भुवनेश्वरची सरासरी त्याला भारतीय संघासाठी फायदेशीर ठरु शकते.

त्यामुळे या चारही गोष्टी जुळून आल्या तर भारतीय संघाचा विजय नक्कीच मानला जाईल.

    follow whatsapp