भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे. उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने जपानच्या अकाने यागागुचीचं खडतर आव्हान २१-१३, २२-२० असं परतवून लावलं. सिंधूच्या या विजयामुळे बॅडमिंटनमध्ये भारताला पदकाची आशा निर्माण झाली आहे. २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्येही सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली होती.
ADVERTISEMENT
उपांत्यपूर्वी फेरीत सिंधूसमोर जपानच्या यामागुचीचं आव्हान असल्यामुळे हा सामना रंगतदार होणार अशी सर्वांना आशा होती. अपेक्षेप्रमाणे अकाने यामागुचीने सुरुवातीच्या क्षणांमध्ये आघाडी घेत चांगली सुरुवात केली. परंतू सिंधूनेही स्वतःला वेळेत सावरत दमदार कमबॅक केलं. यामागुचीविरुद्ध खेळण्याचा अनुभव असलेल्या सिंधूने नंतर सेटवर पकड मजबूत करायला सुरुवात केली. कोर्टच्या दोन्ही टोकांवर यामागुचीला पळवत सिंधुने स्मॅश, ड्रॉप, बॅकहँड फटक्यांचा सुरेख वापर केला. पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूकडे ११-७ अशी आघाडी होती.
मध्यांतरानंतर यामागुचीने सामन्यात कमबॅक करण्याचा प्रयत्न करत काही चांगले पॉईंट घेतले. परंतू शांत आणि संयमी खेळ करत सिंधूने आपली ५ गुणांची आघाडी कायम ठेवली. अखेरीस २१-१३ च्या फरकाने सिंधूने पहिल्या सेटमध्ये बाजी मारली.
यामागुचीने पहिला सेट गमावला असला तरीही दुसऱ्या सेटमध्ये तिने सुरुवातीपासून सिंधूला चांगली झुंज द्यायला सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये फारसं अंतर नव्हतं. परंतू नंतर सिंधूने आपली गती वाढवत यामागुचीला पुन्हा एकदा बॅकफूटला ढकलायला सुरुवात केली. दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूकडे ११-६ अश आघाडी होती. मध्यांतरानंतर सिंधू सामन्यात सहज बाजी मारेल असं वाटत असतानाच यामागुचीने तिला पुन्हा एकदा झुंज द्यायला सुरुवात केली.
दुसऱ्या सेटमध्ये मध्यांतरानंतर आश्वासक आघाडी असलेल्या सिंधूची आघाडी काही क्षणांतच एवघ्या एका गुणावर येऊन ठेपली. पहिल्या सेटमध्ये सिंधूने आजमावलेल्या रणनितीचा वापर करत यामागुचीने सिंधूला चांगलंच थकवलं. एका क्षणाला ६ गुणांनी आघाडीवर असलेल्या सिंधूला नंतर १५-१५ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं. दुसऱ्या सेटमधली ही झुंज अखेरच्या क्षणापर्यंत कायम होती. काही मिनीटांसाठी यामागुचीने दोन गुणांची आघाडी घेतली होती. परंतू सिंधूने आपला सर्व अनुभव पणाला लावत २२-२० च्या फरकाने सेट जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
उपांत्य फेरीचं आव्हान सिंधूने पार केलं तर तिला सुवर्णपदकासाठी खेळावं लागेल. परंतू उपांत्य फेरीत सिंधूला पराभवाचा सामना करावा लागला तर तिला कांस्यपदकासाठी लढावं लागेल. त्यामुळे उपांत्य फेरीचा अडथळा दूर करुन सिंधूने यंदा भारताला सुवर्णपदकाची भेट द्यावी अशी इच्छा कोट्यवधी भारतीय बाळगून आहेत.
ADVERTISEMENT