Tokyo Olympic 2020 : बॅडमिंटनमध्ये P.V.Sindhu ला कांस्यपदक, चिनी खेळाडूवर मात

मुंबई तक

• 12:29 PM • 01 Aug 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांनी ठेवलेल्या अपेक्षाला साजेसा खेळ करत पी.व्ही. सिंधूने पदकाची कमाई केली आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सिंधूने ब्राँझ पदकाच्या सामन्यात चीनच्या हे बिंग जिआओवर सरळ दोन सेटमध्ये मात करत सामना जिंकला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे दुसरं पदक ठरलं. २१-१३, २१-१५ च्या फरकाने सरळ दोन सेट जिंकत सिंधूने कांस्यपदकाची कमाई केली. रिओ पाठोपाठ […]

Mumbaitak
follow google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये कोट्यवधी भारतीयांनी ठेवलेल्या अपेक्षाला साजेसा खेळ करत पी.व्ही. सिंधूने पदकाची कमाई केली आहे. सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर सिंधूने ब्राँझ पदकाच्या सामन्यात चीनच्या हे बिंग जिआओवर सरळ दोन सेटमध्ये मात करत सामना जिंकला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं हे दुसरं पदक ठरलं. २१-१३, २१-१५ च्या फरकाने सरळ दोन सेट जिंकत सिंधूने कांस्यपदकाची कमाई केली. रिओ पाठोपाठ टोकियो ऑलिम्पिकमध्येही पदकाची कमाई करत सिंधूने स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध केलं.

हे वाचलं का?

एकाच खेळात ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं मिळवणारी सिंधू पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. याआधी कुस्तीत भारताकडून सुशीलकुमारने बिजींग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलं होतं.

पहिल्या सेटमध्ये सिंधूने आश्वासक सुरुवात केली. सुरुवातीच्या काही क्षणांमध्ये सिंधूकडे ४-० अशी आघाडी होती. परंतू चीनच्या हे बिंग जिआओ ने चांगली झुंज देत सिंधूला बरोबरीत रोखलं. ४-० अशा आघाडीवर असलेल्या सिंधूशी बरोबरी करत हे बिंगने पहिल्या सेटमध्ये आघाडी घेतली. चिनी खेळाडूंच्या रणनितीसमोर सिंधू पुन्हा एकदा कमी पडते की काय असं वाटत असतानाच सिंधूने वेळेत स्वतः सावरलं.

आपल्या ठेवणीतले काही फटके वापरत सिंधूने मध्यांतरापर्यंत पुन्हा सामन्यात आघाडी घेतली. ११-८ अशा आघाडीनंतर पहिला सेट सुरु झाला. ज्यानंतर सिंधूने सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. युवा चिनी खेळाडूला तिने कोर्टच्या दोन्ही बाजूला पळवत सुरेख वसूल केले. हे बिंगने सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला खरा…परंतू सामन्यावर पकड मजबूत केलेल्या सिंधूने नंतर हे बिंगला पुनरागमन करण्याची संधीच न देता २१-१३ च्या फरकाने पहिला सेट जिंकला.

दुसऱ्या सेटमध्ये सिंधूने आश्वासक सुरुवात करत सेटमध्ये आघाडी घेतली. आपल्या अनुभवाचा फायदा घेत सिंधूने हे बिंगला चुका करायला भाग पाडत एका क्षणाला ५-२ अशी आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरादाखल हे बिंगनेही काही सुरेख फटके खेळले. सिंधूला अडचणीत आणत हे बिंगने काही सुरेख स्मॅशचे फटके खेळत आपले इरादे स्पष्ट केले. दुसऱ्या सेटमध्ये हे बिंग सिंधूला मोठी आघाडी घेऊ देत नव्हती. सिंधूने क्रॉस कोर्ट स्मॅशचा सढळ हस्ते वापर करत हे बिंगवर दडपण आणायला सुरुवात केली. सिंधूच्या या आक्रमक खेळाचं उत्तर हे बिंग जिआओच्या खेळात नव्हतं. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये काही सुंदर रॅली झाल्या, ज्याचा फायदा घेत हे बिंगने सिंधूला पुन्हा एकदा आव्हान देण्यास सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंमध्ये सिंधूचा अनुभव हा उजवा असला तरीही हे बिंगही तिला सहज आघाडी घेऊ देत नव्हती. अखेरीस आपला अनुभव पणाला लावत सिंधूने दुसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत ११-८ अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सेटच्या मध्यांतरानंतरही दोन्ही खेळाडूंमधली ही झुंज कायम राहिली. हे बिंगने काही सुरेख ड्रॉपचे फटके खेळत सिंधूला आव्हान दिलं. प्रत्युत्तरादाखल सिंधूनेही खणखणीत स्मॅश फटक्यांची बरसात केली. परंतू यादरम्यान झालेल्या काही चुकांमुळे हे बिंगने सामन्यात ११-११ अशी बरोबरी साधली. परंतू सिंधूने आपला संयम न ढळू देता सेटमध्ये परत एकदा आघाडीवर घेतली. सिंधूच्या काही फटक्यांचं हे बिंगकडे उत्तर नव्हतं, तरीही बिंगने सिंधूला कडवी झुंज देत मोठी आघाडी घेऊ दिली नाही. अखेरीस सिंधूने आपला सर्व अनुभव पणाला लावत २१-१५ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत कांस्यपदकावर नाव कोरलं.

    follow whatsapp