जपानच्या टोकियो शहरात होणारी ऑलिम्पिक स्पर्धा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. २३ जुलैला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १०० पेक्षा जास्त भारतीय खेळाडू या स्पर्धेत विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होणार असून महाराष्ट्रातले ८ सदस्य यात सहभागी होतील.
ADVERTISEMENT
यापैकी ३ हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात बीडचा अविनाश साबळे पात्र ठरला आहे. बीडसारख्या ग्रामीण भागातून आलेल्या अविनाशने गेल्या काही महिन्यांपासून उत्तम सराव करत ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे. काही दिवसांपूर्वी पटीयाला येथे झालेल्या National Athletics Championships मध्ये 8:20:20 अशी वेळ नोंदवत अविनाशने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. त्यामुळे यंदा अविनाश महाराष्ट्राचा झेंडा टोकियोत रोवेल अशी अनेकांना आशा आहे.
कोण आहे अविनाश साबळे आणि त्याची थोडक्यात ओळख –
२६ वर्षीय अविनाश साबळे हा बीड जिल्ह्यातील मांडवा गावचा तरुण आहे. अविनाश साबळेचं कुटुंब हे शेतकरी आहे, शेतीवर त्यांचं घर चालतं. आज अविनाश हा राष्ट्रीय पातळीवर आपलं नाव गाजवत असला, तरी त्याची बीज ही लहानपणीच रोवली गेली होती. लहानपणी घर ते शाळा हे ६ किलोमिटरचं अंतर अविनाश अनेकदा धावत जाऊन किंवा चालत जाऊन पूर्ण करायचा. गावातून शाळेत जाण्यासाठी दुसरी सोय नसल्यामुळे लहानपणापासून संघर्ष करण्याची सवय लागलेल्या अविनाशला नंतर चांगली संधी मिळाली.
त्याच्या याच शरिरयष्टीमुळे त्याला सैन्यदलाकडून खेळण्याची संधी मिळाली. १२ वी पर्यंत शिक्षण पार पडल्यानंतर अविशान भारतीय सैन्यदलाच्या ५ व्या महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. आतापर्यंत अविनाशने सियाचीन, राजस्थान, सिक्कीम यासारख्या ठिकाणी आपलं कर्तव्य बजावलं आहे.
महाराष्ट्रातले ‘हे’ खेळाडू Tokyo Olympic मध्ये करणार भारताचं नेतृत्व
२०१५ साली अविनाशने सर्वात आधी Inter Army Cross Country स्पर्धेत सहभाग घेतला होता. यानंतर अमरिश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाशने स्टिपलचेस प्रकारात सरावाला सुरुवात केली. परंतू या प्रकारासाठी अविनाशचं वजन हे जास्त होतं, त्यामुळे तीन महिन्यांत त्याने आपलं २० किलो वजन कमी केलं. नॅशनल कॅम्पमध्ये दाखल होण्याआधी अविनाशला निकोलाई स्नेसारेव्ह या दिग्गज प्रशिक्षकांनीही मार्गदर्शन केलंय.
२०१९ साली दोहा येथे झालेल्या World Championship मध्ये अविनाशने आपलं वैयक्तिक राष्ट्रीय रेकॉर्ड दोन वेळा मोडून ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं. या स्पर्धेत अविनाश पदक मिळवण्यात अपयशी ठरला असला तरीही त्याने ऑलिम्पिकला पात्र होण्यासाठी लागणारा निकष पूर्ण केला होता. यानंतर अविनाशने आपल्या सरावात कधीही खंड पडू दिला नाही. पटीयाला येथे झालेल्या National Athletics Championships मध्ये सर्वोत्तम वेळ नोंदवत अविनाशने आपली मेहनत पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. सध्या जागतिक क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर असलेल्या अविनाशला टोकियोमध्ये कडवी झुंज मिळणार आहे. परंतू महाराष्ट्राचा हा वाघ जपानमध्ये आपली जादू करुन दाखवेल अशी सर्वांना आशा आहे.
ADVERTISEMENT