ऑस्ट्रेलियाविरुद्ध मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर भारतीय हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कमबॅक केलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना १-७ ने गमावल्यानंतर भारताने स्पेनवर ३-० ने मात केली आहे. रुपिंदरपाल सिंग आणि सिमरनजीत सिंग यांनी केलेल्या गोलच्या आधारावर भारताने या सामन्यात विजय मिळवला.
ADVERTISEMENT
संपूर्ण सामन्यात भारताने स्पेनवर दबाव ठेवत विजयाचं पारडं आपल्या बाजूलाच झुकलं होतं. इतकच नव्हे तर भारताच्या बचावफळीनेही आज स्पेनचे सर्व हल्ले परतवून लावत भारतीय गोलपोस्ट सुरक्षित ठेवली. सामन्याच्या पहिल्या सत्रात आठव्या मिनीटाला सिमरनजीत सिंगला गोल करण्याची संधी होती. परंतू ती वाया गेली. यानंतर स्पेननेही भारताच्या गोलपोस्टवर हल्ले चढवले पण श्रीजेश आणि भारताच्या बचावफळीसमोर त्यांचा निभाव लागला नाही. अखेरीस सिमरनजीतने १४ व्या मिनीटाला मैदानी गोल करत भारताला खातं उघडून दिलं.
दुसऱ्या सत्रातही भारताने आपलं आक्रमण कायम ठेवत स्पेनला सावरण्याची संधीच दिली नाही. रुपिंदरपालने या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर मिळालेल्या संधीचं सोनं करत भारताची आघाडी २-० ने वाढवली. या सत्रातही भारतीय बचावफळीने स्पेनचे सर्व हल्ले परतवून लावले. अखेच्या सत्रात भारताला पेनल्टी कॉर्नवर आणखी एक संधी मिळाली, ज्यावर गोल करत रुपिंदरपालने भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. स्पेनने या सामन्यात पुनरागमन करण्याचे प्रयत्न केले, परंतू अखेरपर्यंत त्यांना यश आल नाही.
ADVERTISEMENT