टोक्यामध्ये सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं पहिलं पदकं निश्चित झालं आहे. भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेलने महिला एकेरी स्पर्धेत क्लास ४ श्रेणीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भाविनाने सर्बियाच्या खेळाडूचा पराभव केला. या विजयानंतर भाविना भावूक झाली.
ADVERTISEMENT
टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसच्या महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या भाविना पटेलने चमकदार कामगिरी केली. भाविनाचा सर्बियाची खेळाडू बोरिस्लावा राकोविच हिच्यासोबत मुकाबला झाला. या सामन्यात भाविनाने दणदणीत विजय मिळवला.
भाविनाने सर्बियाच्या राकोविचचा तीन गेममध्ये ११-५, ११-६, ११-७ अशा फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच भाविना उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली असून, ती सुवर्ण पदकापासून दोन पावलं दूर आहे. उपांत्य फेरी गाठल्यानंतर भाविना भावूक झाली. तिचे डोळेही भरून आले होते. ‘मला संपूर्ण देशाचे आभार मानायचे आहेत; कारण मी त्यांच्यामुळे इथे पोहोचले आहे. तुमचं प्रेम पाठवत रहा’, असे भावोद्गार भाविनाने सामन्यानंतर काढले.
भाविना सुवर्ण पदकापासून दोन पावलं दूर असली, तरी तिने भारतासाठी एक पदक निश्चित केलं आहे. टोक्यो पॅराऑलिम्पिकच्या नियमानुसार टेबल टेनिसमध्ये क्लास १ ते क्लास ११ पर्यंत थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवणाऱ्या खेळाडूंना कांस्य पदक दिलं जातं. त्यामुळे भारताचं कांस्य पदक निश्चित झालं आहे.
उपांत्यपूर्व फेरीत भाविनाने विजय मिळवल्यास ती अंतिम फेरीत सुवर्ण पदकांसाठी खेळेल. आता उपांत्य फेरीत तिचा सामना चीनच्या मियाओ झांगशी होईल. त्यामुळे भाविनाच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्याकडे तिच्या चाहत्यांची नजर असणार आहे.
भाविनाने प्री क्वार्टर फायनल सामन्यात ब्राझीलच्या खेळाडूचा पराभव केला होता. भाविनाने ब्राझीलची खेळाडू जॉयज डी. ओलिविअराचा १२-१०, १३-११, ११-६ अशा फरकाने पराभव केला होता. पॅरॉऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारतासाठी पदक निश्चित करणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे.
ADVERTISEMENT