गेल्या काही वर्षांपासून IPL आणि VIVO या मोबाईल कंपनीचं नातं आता संपुष्टात आलेलं आहे. कारण आयपीएल २०२१ साठी बीसीसीआयने VIVO सोबतचा करार रद्द करण्याचं ठरवलंय. भारत आणि चीन यांच्यात २०२० मध्ये डोकलाम सीमेवर झालेल्या संघर्षात १६ भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर भारतात चिनी वस्तूंविरोधात वातावरण तयार झालं. ज्याचा फटका बीसीसीआयलाही बसला. आयपीएलचं प्रमुख स्पॉन्सरशीप असलेल्या VIVO या मोबाईल कंपनीसोबतचा करार बीसीसीआयला स्थगित करावा लागला होता. २०१८ साली बीसीसीआय आणि VIVO यांच्यात करार झाला होता. ज्यासाठी VIVO कंपनी प्रत्येक सिझनसाठी बीसीसीआयला ४४० कोटी रुपये देत होती.
ADVERTISEMENT
परंतु आयपीएल २०२० साठी देशात चीनविरोधी वातावरण पाहता बीसीसीआयने करार एक वर्षासाठी रद्द करत Dream 11 ला स्पॉन्सरशीपचे हक्क दिले. २२२ कोटी रुपये मोजत Dream 11 ने IPL 2020 च्या स्पॉन्सरशीपचे हक्क विकत घेतले होते. Outlook ने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएल २०२१ साठी VIVO कंपनी आपला करार दुसऱ्या ब्रँडच्या नावावर ट्रान्स्फर करण्याच्या तयारीत आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमेवरील संघर्ष पहिल्यासारखे होण्याची चिन्ह दिसत नसल्यामुळे VIVO ने आयपीएल २०२१ ला स्पॉन्सरशीप देण्यासाठी असमर्थता दर्शवली आहे.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानेही पीटीआयशी बोलताना VIVO कंपनीसोबतचा करार रद्द करण्यात आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. “VIVO सोबतचा करार आता जवळपास संपुष्टात आला आहे. बोर्ड आणि कंपनीने सहमतीने हा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय आणि VIVO यांच्यात २०१८ साली झालेल्या करारात आपले स्पॉन्सरशीपचे हक्क दुसऱ्या कंपनीला विकण्याचा एक क्लॉज आहे. येत्या काही दिवसांत BCCI ने याला परवानगी दिल्यास ही प्रक्रीया लवकर पार पडली जाईल.”
अवश्य वाचा – मराठमोळा माजी क्रिकेटर करणार विराटच्या RCB ला मदत
Dram 11 आणि Unacademy हे दोन ब्रँड सध्या आयपीएलच्या २०२१ च्या स्पॉन्सरशीपसाठी शर्यतीत आहेत. Unacademy हा ब्रँड सध्या आयपीएलचा असोसिएट स्पॉन्सर असून त्यांनी VIVO ने आपले हक्क सोडल्यास सर्वाधिक बोली लावण्याची तयारी केली आहे. आयपीएल २०२० प्रमाणे बीसीसीआय स्पॉन्सरशीपसाठी नव्याने टेंडर मागवू शकतं, असं केल्यास बीसीसीआयला गेल्या हंगामात लावण्यात आलेल्या २२२ कोटींपेक्षा जास्त रक्कम नक्कीच मिळेल. पण VIVO देत असलेल्या ४४० कोटींची रक्कम बीसीसीआयला मिळणार नाही. अशा परिस्थितीत VIVO आपले हक्क सोडून दुसऱ्या कंपनीला देणार असल्यास बीसीसीआयला VIVO ने लावलेल्या बोलीइतकी म्हणजेच ४४० कोटींची रक्कम मिळू शकणार आहे.
ADVERTISEMENT