क्रिकेटपटूंना आपल्या आयुष्यात अनेकदा टीकेला सामोरं जावं लागतं. अनेकदा ही टीका त्यांच्या खराब खेळामुळे होते. काही खेळाडू फिक्सींगसारख्या दुष्टचक्रातही अडकतात. पण या पलिकडे जाऊन खेळाला आपला धर्म मानणारे अनेक खेळाडू भारतात आहेत. पण याच धर्माच्या नावाने एखाद्या खेळाडूवर जर आरोप झाले तर ते कोणत्याही खेळाडूसाठी दुर्दैवी असतं.
ADVERTISEMENT
स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधीत्व करणारा भारतीय संघाचा माजी ओपनर वासिम जाफर सध्या याच परिस्थितीतून जातोय. उत्तराखंड संघाचा कोच म्हणून काम करत असताना संघटनेच्या अधिकाऱ्यांनी वासिम जाफरवर संघात मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केलाय. वासिम जाफरने हे आरोप फेटाळून लावले असून त्याने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. जाफरच्या काही माजी सहकाऱ्यांनी त्याला आपला पाठींबा दर्शवलेला आहे, परंतू दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्या मुंबईचं वासिम जाफरने नेतृत्व केलं त्या मुंबईचा एकही खेळाडू अद्याप वासिम जाफरच्या समर्थनासाठी पुढे आलेला नाही.
वासिम जाफरवर आरोप काय आहेत??
संघात मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य देऊन आणि ड्रेसिंग रुममध्ये मौलवींना बोलवून ड्रेसिंग रुमचं वातावरण कम्युनलाईज केल्याचा आरोप वासिम जाफरवर उत्तराखंड क्रिकेट संघटनेने केला आहे. आता याची पार्श्वभूमी आपण समजावून घेऊया…
जून २०२० मध्ये वासिम जाफरने उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाची धुरा हातात घेतली. वासिम जाफरला उत्तराखंडने एक वर्षासाठी करारबद्ध केलं होतं. दरम्यानच्या काळात वासिम उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनच्या इनडोअर फॅसिलीटी कशी सुधारण्यात येईल याकडे लक्ष देत होता. नवीन वर्षात सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेतही उत्तराखंडचा संघ वासिमच्या मार्गदर्शनाखाली खेळला. पण या स्पर्धेनंतर गोष्टी बिघडत गेल्या.
विजय हजारे ट्रॉफीसाठी संघ निवडण्याच्या आधी टीमने किमान ३-४ सराव सामने खेळावेत यासाठी वासिम जाफर आग्रही होता. परंतू संघटनेचे सचिव माहिम वर्मा आणि इतर पदाधिकाऱ्यांनी दरम्यानच्या काळात वासिमशी कोणताही संपर्क ठेवला नाही. आपल्या रेजिग्नेशन लेटरमधघ्ये वासिमने या सर्व गोष्टींचा उल्लेख केलाय.
विजय हजारे ट्रॉफीसाठी संघाची निवड करताना निवड समितीने आपलं कोणतंही मत विचारात घेतलं नसल्याचं वासिमने म्हटलंय. रिझवान समशेद जे निवड समितीचे प्रमुख आहेत त्यांनी एकदाही वासिम जाफरला फोन करुन त्याचं मत विचारात घेण्याची तसदी घेतली नाही.
अवश्य वाचा – मॅनेजरच्या परवानगीनंतरच मौलवी ड्रेसिंग रुममध्ये आले !
गोष्टी बिघडल्या कुठे??
वासिम जाफरच्या म्हणण्यानुसार, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेसाठी महिम वर्मा जे उत्तराखंड संघटनेचे सचिव आहेत ते काही खेळाडूंना संघात स्थान द्यावं यासाठी प्रेशराईज करत होते. पण ज्या खेळाडूंसाठी महिम वर्मा वासिम जाफरवर प्रेशर आणत होते ते खेळाडू संघात खेळण्यासाठी योग्य नव्हते असं जाफरने म्हटलंय. त्यामुळे सचिवपदावर काम करणारे अधिकारी जर संघ निवडीसाठी माझ्यावर अशा पद्धतीने प्रेशर आणणार असतील तर मी माझं काम योग्य पद्धतीने करु शकणार नाही असं म्हणत वासिमने राजीनामा देण्याचं ठरवलं.
मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य दिल्याच्या आरोपाबद्दल वासिम जाफर म्हणतो…
संघात मुस्लीम खेळाडूंना प्राधान्य दिलं जातं यावर बोलताना वासिम जाफर म्हणाला, सय्यद मुश्ताक अलीमध्ये मी एका सामन्यासाठी समद फल्लाला संघाबाहेर काढलं. जर मला मुस्लीम खेळाडूंनाच प्राधान्य द्यायचं असतं तर समद आणि मोहम्मद नझीम सर्व सामने खेळले असते. माझ्यावर अशा पद्धतीने आरोप केले जातायत हे देखील खूप दुर्दैवी आहे. मला जर मुस्लीमांनाच संधी द्यायची असती तर मी जय बिस्ताला संघात आणलंच नसतं. मी जय बिस्ताला कॅप्टन करण्याच्या विचारात होतो पण निवड समितीला इक्बाल अब्दुल्ला योग्य उमेदवार वाटला आणि त्याचा अनुभव जास्त असल्यामुळे मी देखील त्याला होकार दर्शवला.
याचसोबत वासिमवर आणखी एक आरोप लावण्यात आला तो म्हणजे संघात खेळाडूंना रामभक्त हनुमान की जय अशा घोषणा देण्यापासून थांबवण्याचा…पण हे आरोपही वासिम जाफरने फेटाळून लावलेत. काही खेळाडू हे शीख धर्माशी निगडीत घोषणा द्यायचे. आम्ही बडोद्याला पोहचलो तेव्हा मी त्यांना सांगितलं की आता आपण कोणताही धर्म किंवा पंथ म्हणून खेळत नाहीयोत तर आपण उत्तराखंडाचं प्रतिनिधीत्व करतोय. अशावेळी आपली घोषणा ही Go Uttarakhand अशी घोषणा द्यायला हवी. जर मला धर्माचा विचार करायचा असता तर मी अल्ला हू अकबरच्या घोषणा द्यायला सांगितल्या असत्या.
संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये नमाज पठनासाठी मौलवी येऊन गेल्यामुळेही वासिम जाफरच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातायत. पण मौलवींना बोलवण्याचा निर्णय हा माझा नसून इक्बाल अब्दुल्लाचा होता असंही जाफरने सांगितलं. इक्बाल अब्दुल्लानेही यावेळी मीडियाशी बोलत असताना…मॅनेजर नवनीत मिश्रा यांच्या परवानगीनेच मौलवींना ड्रेसिंग रुममध्ये बोलावल्याचं म्हटलंय.
खेळाडूंचा पाठींबा पण मुंबईकरांची पाठ –
सोशल मीडियावर हे प्रकरण गाजल्यानंतर काही माजी खेळाडूंनी वासिमला आपला पाठींबा दर्शवला. परंतू ज्या मुंबईचं वासिम जाफरने इतकी वर्ष प्रतिनिधीत्व केलं, त्या मुंबईचा एकही सहकारी वासिमच्या समर्थनासाठी पुढे येताना दिसला नाही.
वासिमने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावलेत. आपल्या बहारदार खेळीने वासिमने मुंबई आणि विदर्भाला रणजी ट्रॉफी जिंकवून दिली. संघात खेळताना वासिमचा मैदानातवा वावर हा पाहण्यासारखा होता…पण क्रिकेटला आपला धर्म मानणाऱ्या खेळाडूवर जेव्हा धर्माच्या नावाने आरोप केले जातात तेव्हा खेळासाठी ही गोष्ट नक्कीच दुर्दैवी ठरते.
ADVERTISEMENT