ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होत आहे. उभय संघांमधील हा फायनल सामना 7 जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. टीम इंडिया सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करणार आहे, तर ऑस्ट्रेलियन टीम पहिल्यांदाच फायनल खेळणार आहे. 2021 साली साउथॅम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून 8 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. (wtc final ind vs aus 2023)
ADVERTISEMENT
सामन्यात येऊ शकतो पावसाचा व्यत्यय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यादरम्यान लंडनमधील हवामानावरही क्रिकेट चाहत्यांची नजर असेल. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा आहे, परंतु तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी (9 आणि 10 जून) विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. एकूणच, पाच दिवसांच्या खेळादरम्यान तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे, जे सामन्याच्या दृष्टीने खूप चांगले म्हणता येईल.
हेही वाचा >> Ajinkya Rahane WTC Final : ‘अजिंक्य’साठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती!
आयसीसीनेही अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस (12 जून) ठेवला आहे. पहिल्या पाच दिवसात पावसामुळे किंवा इतर कारणांमुळे खेळ खराब झाला, तर हा राखीव दिवस वापरला जाईल. पाच दिवसांचा खेळ कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण झाला, तर राखीव दिवस वापरला जाणार नाही.
सामना बरोबरीत किंवा अनिर्णित राहिला तर काय होईल?
अंतिम सामना जर अनिर्णित राहिला तर भारत आणि ऑस्ट्रेलियाला संयुक्त विजेता घोषित केले जाईल. सामना बरोबरीत संपला तरी दोन्ही संघ संयुक्तपणे चॅम्पियन ठरतील. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात केवळ दोनच सामने बरोबरीत संपले आहेत. 1960 मध्ये प्रथमच वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन कसोटी सामना झाला. त्यानंतर 1986 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चेन्नई कसोटी सामना बरोबरीत संपला.
हेही वाचा >> WTC Final 2023, Ind vs Aus : टीम इंडियाला मोठा धक्का! रोहित शर्मा जखमी
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2021-23 च्या गुणतालिकेत, ऑस्ट्रेलियन संघाने 152 गुणांसह पहिले स्थान मिळवले आणि टीम इंडियाने (127 गुण) दुसरे स्थान मिळविले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. असं असलं तरी, दोन्ही संघांना एक प्रकारे अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी दावेदार होते कारण आयसीसी क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
WTC फायनलसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, केएस भरत (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जयदेव उनाडकट , उमेश यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक).
स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.
डब्ल्यूटीसी फायनलसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मायकेल नेसर , स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर
स्टँडबाय खेळाडू: मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची माहिती
-तारीख- 7 ते 11 जून, 2023
स्थळ – ओव्हल ग्राउंड, लंडन
संघ- भारत आणि ऑस्ट्रेलिया
राखीव दिवस – 12 जून
ADVERTISEMENT