आशिया कपमधील भारत-पाकिस्तान सामन्यापासून क्रिकेटर अर्शदीप सिंग सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याच्याविरोधातील कटाचा आता पर्दाफाश झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिकेटर अर्शदीप सिंगबाबत पाकिस्तानच्या कारस्थानाचा पर्दाफाश झाला आहे. अर्शदीपचे खलिस्तानी म्हणून वर्णन करण्याचा कट पाकिस्तानच्या आयएसपीआरनं रचल्याचं कळतंय. पंजाबमधील शीख जनतेला भारताविरुद्ध भडकवण्याचं षडयंत्र रचलं गेलं. यासाठी पाकिस्तानातून पाकिस्तानी ट्विटर हँडलवरून शेकडो खलिस्तानी वाले ट्विट करण्यात आले.
ADVERTISEMENT
अर्शदीप सिंग टार्गेटवर का?
रविवारी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होता. सुपर फोरच्या या सामन्यात पाकिस्तानने भारताचा पाच गडी राखून पराभव केला. या सामन्यात रवी बिश्नोईच्या चेंडूवर अर्शदीप सिंगने आसिफ अलीचा एक अतिशय सोपा झेल सोडला. त्यावेळी पाकिस्तानला 12 चेंडूत 26 धावांची गरज होती. यानंतर टीम इंडिया मॅच हरल्यावर लोकांनी ट्विटरवर अर्शदीप सिंगवर निशाणा साधला.
भारत सरकारनं उचललं पाऊल
टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगचा एक झेल काय चुकला, लोकांनी त्याला खलिस्तानशी जोडले. सोशल मीडियावर तो टार्गेट झाला होता. इतकेच नाही तर विकिपीडियावरील अर्शदीप सिंगच्या पेजवर काही बदल करण्यात आले आणि तिथे ‘खलिस्तानी’ संघटनेशी संबंध असल्याची बाब जोडण्यात आली. वाद वाढल्यानंतर भारत सरकारनेही कारवाई केली आणि आयटी मंत्रालयाकडून विकिपीडियाला नोटीस पाठवण्यात आली.
टीम इंडिया अर्शदीप सिंगच्या पाठीशी
सामना संपल्यानंतर लगेचच अर्शदीप सिंगवर टीका सुरू झाली. सोशल मीडियावर त्याला ट्रोल करण्यात आले. मात्र, टीम इंडियाने अर्शदीप सिंगला पूर्ण पाठिंबा दिला आहे. माजी कर्णधार विराट कोहलीने म्हटले आहे की, कोणतीही चूक करणे हा सामन्याचा भाग असतो, तुम्ही अशा चुकांमधून शिकून पुढे जातात. आमच्या संघाचे वातावरण खूप चांगले आहे, सर्व सीनियर ज्युनियर खेळाडूंसोबत आहेत. हरभजन सिंगनेही अर्शदीप सिंगला पाठिंबा दिला.
पंजाब सरकारचे क्रीडा मंत्री मीत हायर यांनीही अर्शदीप सिंग यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. संपूर्ण देश अर्शदीपसोबत असल्याचे मीतने सांगितले. तो परत आल्यावर मी ढोल-ताशांच्या गजरात त्याचे स्वागत करीन. अंतिम सामना जिंकूनच येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामन्यात अर्शदीपची कामगिरी कशी होती?
ड्रॉप कॅच सोडला तर अर्शदीप सिंगने टीम इंडियासाठी या सामन्यात चांगली कामगिरी केली. अर्शदीपने 3.5 षटकात 27 धावा दिल्या आणि एक विकेटही घेतली. शेवटच्या षटकात पाकिस्तानला 7 धावांची गरज होती, त्यावेळी अर्शदीपने पाकिस्तानचा तणाव वाढवला आणि सामना 5व्या चेंडूपर्यंत नेला.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर टीम इंडियाचा पाच विकेटने पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने 181 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात पाकिस्तानने शेवटच्या षटकात हे लक्ष्य गाठले. भारतातर्फे विराट कोहलीने सर्वाधिक 60 धावा केल्या, तर पाकिस्तानकडून मोहम्मद नवाजने 20 चेंडूत 42 धावा करत सामन्याचे पारडे फिरवले.
ADVERTISEMENT