अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या आणि निर्णायक असलेल्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव केला. या पराभवाबरोबरच भारत विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला असून, पुन्हा एखादा महिला विश्व चषकावर नाव कोरण्याचं स्वप्नभंगलं.
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवाबरोबरच भारत महिला विश्व चषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेनं सामना जिंकत भारताला सेमी फायनल आणि विश्व चषक स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २७४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं शेवटच्या षटकात विजय मिळवला. शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेनं भारताच्या तोंडून विजयाचा घास हिसकावून घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ७ गडी बाद २७५ धावा केल्या.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला. अखेरच्या विजयासाठी दक्षिण आफ्रिकेला अखेरच्या षटकात सात धावांची गरज होती. भारताकडून दीप्ती शर्माने अखेरचं षटक टाकलं. दीप्ती शर्माने चांगली गोलंदाजी केली, मात्र पाचव्या चेंडूवर झालेली चूक भारताला चांगलीच महागात पडली.
अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर दीप्तीने बळी घेतला, पण तो चेंडू नो बॉल ठरला. त्यामुळे एक धाव अधिकची गेलीच. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेला फ्री-हिट चेंडू मिळाला. या संधीचा पुरेपुर फायदा घेत दक्षिण आफ्रिकेनं भारताचा पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय सलामीवर स्मृती मंधाना आणि शेफाली वर्माने जबरदस्त सुरूवात करून दिली. स्मृतीने मंधानाने ७१ धावा, तर शेफाली वर्माने ५३ धावा केल्या. त्याचबरोबर कर्णधार मिताली राजने ६८ आणि हरमन प्रीत कौरने ४८ धावांची खेळी केली. यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या बळावर भारताने आफ्रिकेसमोर २७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं.
आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून लॉरा व्होल्वार्डटने ८० धावांची खेळी केली. त्याचबरोबर लारा गुडालने ४९ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मिगनॉन प्रिजची खेळी महत्त्वाची ठरली. मिगनॉनने ६३ चेंडूत ५२ धावांची खेळी करत दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून दिला.
दक्षिण आफ्रिकेने आधीच सेमी फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. भारताच्या पराभवामुळे आता वेस्ट इंडिज सेमी फायनलमध्ये पोहोचला आहे. आता सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड आमने-सामने असणार आहेत.
ADVERTISEMENT