पत्रकाराचं नाव उघड करणार नाही पण…वृद्धीमान साहाकडून ‘त्या’ वादावर पडदा?

मुंबई तक

• 03:12 PM • 22 Feb 2022

टीम इंडिया आणि वाद-विवाद हे नातं तसं फार जुनं आहे. निवड समितीने नुकताच श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. ज्यात कसोटी संघात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धीमान साहा, इशांत शर्मा यांना संधी नाकारण्यात आली. वृद्धीमान साहाने घडलेल्या प्रकारावरुन नाराजी व्यक्त केली. हा वाद ताजा असतानाच, एका वरिष्ठ पत्रकाराने वृद्धीमान साहाला दिलेल्या धमकीवरुन सध्या बीसीसीआयमध्ये वादळ […]

Mumbaitak
follow google news

टीम इंडिया आणि वाद-विवाद हे नातं तसं फार जुनं आहे. निवड समितीने नुकताच श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. ज्यात कसोटी संघात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धीमान साहा, इशांत शर्मा यांना संधी नाकारण्यात आली. वृद्धीमान साहाने घडलेल्या प्रकारावरुन नाराजी व्यक्त केली. हा वाद ताजा असतानाच, एका वरिष्ठ पत्रकाराने वृद्धीमान साहाला दिलेल्या धमकीवरुन सध्या बीसीसीआयमध्ये वादळ उठलं आहे.

हे वाचलं का?

प्रशिक्षक राहुल द्रविडने आपल्याला निवृत्तीचा विचार कर असं सांगितल्याचं साहाने सांगितलं. याचसोबत सौरव गांगुलीने जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला संघातल्या स्थानाची चिंता करण्याची गरज नसल्याचंही सांगितल्याचं साहा म्हणाला. साहाचं हे वक्तव्य प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत असताना एका वरिष्ठ पत्रकाराने साहाला मुलाखत देण्यासाठी विनंती केली. परंतू साहाने या विनंतीला कोणताही प्रतिसाद न दिल्यामुळे रागावलेल्या पत्रकाराने वृद्धीमानला धमकीचा मेसेज केला.

साहाची द्रविडवर नाराजी तरीही प्रामाणिक उत्तर देत ‘द वॉल’ ने जिंकलं फॅन्सचं मन

साहाने या पत्रकाराने पाठवलेल्या मेसेजचा स्क्रिनशॉट आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करत, इतकी वर्ष मी भारतीय संघासाठी योगदान दिल्यानंतर मला आज हे पहावं लागत असल्याचं म्हटलंय. या मेसेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की हा पत्रकार साहाला, “तू मला फोन केला नाहीस. मी यापुढे कधीही तुझी मुलाखत घेणार नाही. मी अपमान हलक्यात घेत नाही. मी हे लक्षात ठेवीन. तू हे करायला नको होतसं”.

साहाने स्क्रिनशॉट शेअर करताना या पत्रकाराचं नाव घेतलेलं नसलं तरीही सोशल मीडियावर काही फॅन्समध्ये एका वरिष्ट पत्रकाराच्या नावाची चर्चा सुरु आहे. साहाने या धमकीचा स्क्रिनशॉट शेअर केल्यानंतर साहजिकच त्याला इतर माजी खेळाडूंचा पाठींबा मिळायला लागला. परंतू यानिमीत्ताने बीसीसीआयमध्ये अध्यक्ष सौरव गांगुलीच्या विरुद्ध असलेल्या लॉबीनेही बीसीसीआयवर निशाणा साधत या प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

हा पत्रकार नेमका कोण याबद्दल अद्याप अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतू सोशल मीडियावर असलेल्या चर्चा खऱ्या मानल्या तर हा पत्रकार बीसीसीआय अधिकारी आणि काही आजी-माजी खेळाडूंच्या जवळचा मानला जातो. अनेक खेळाडूंची पुस्तकं लिहण्यात या पत्रकाराचा मोठा हात आहे. यामुळेच बीसीसीआयने सुरुवातीचे काही दिवस या प्रकरणात सावध भूमिका घेतली. परंतू साहाला मिळणारा पाठींबा पाहता बीसीसीआयने आता पावलं उचलायला सुरुवात केली आहे.

बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी पीटीआयशी बोलताना, आम्ही या प्रकरणी साहाला ट्विटबद्दल विचारु. नेमकी खरी घटना काय घडली आहे हे देखील आम्ही त्याच्याकडून जाणून घेऊ असं सांगितलं. याचसोबत बीसीसीआयने साहाला धमकी देणाऱ्या पत्रकाराचं नाव जाहीर करण्याचीही विनंती केली आहे.परंतू साहाने आपण पत्रकाराचं नाव जाहीर करणार नसल्याचं सांगत, पुन्हा एकदा आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. घडलेल्या प्रकारामुळे मला अतिशय त्रास झाला आहे. परंतू माझ्यामुळे एखाद्याचं करिअर बिघडेल असं मी कधीच करणार नाही. मला अशी शिकवण मिळालेली नाही. मी आता ते नाव जाहीर करणार नाही. परंतू हा प्रकार जर पुन्हा झाला तर मी मागे पुढे पाहणार नाही.

वृद्धीमान साहाला भारतीय संघात जागा नाकारल्यानंतर साहजिकच याचे पडसाद उमटले. साहाने नाराजी व्यक्त केल्यानंतरही प्रशिक्षक राहुल द्रविडने या प्रकरणात शांत प्रतिक्रीया देत, आपल्याला वाईट वाटलेलं नसल्यांच सांगितलं. त्यामुळे साहाने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता हे प्रकरण शांत राहतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

निवड होणार नाही, निवृत्तीचा विचार कर ! राहुल द्रविडच्या सल्ल्यावर भारतीय खेळाडूची नाराजी

    follow whatsapp