'टिकली काढून फेकली, अल्ला हू अकबर म्हणाली तरी माझ्या नवऱ्याला...' कौस्तुभच्या पत्नीचा पवारांसमोरच टाहो
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वचजण हादरले. पुण्यातील एका कुटुंबातील व्यक्तींना या हल्ल्यात जीव गमवावा लागला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे असं त्यांचं नाव. याबद्दल कौस्तुभच्या पत्नीने तिचं दु:ख व्यक्त केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू

पतीच्या मृत्यूवर काय म्हणाली कौस्तुभची पत्नी?

शरद पवारांसमोर केलं दु:ख व्यक्त
Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांवर एक-एक करून गोळ्या झाडल्या, त्यांना अजान म्हणण्यास भाग पाडले आणि त्यांच्या धर्माबद्दल त्यांना विचारले. या भ्याड हल्ल्यात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांवर मात्र दु:खाचा डोंगर कोसळला. पुण्यातील एका कुटुंबातील व्यक्तीला या हल्ल्यात हकनाक जीव गमवावा लागला.
पुण्यातील दोघांना गमवावा लागला जीव
पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचे एक कुटुंब पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जम्मू आणि काश्मीरला गेले होते. मात्र, त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्या दहशतवादी हल्ल्यात त्या दोघांना आपला जीव गमवावा लागला. संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या पार्थिवावर आज (24 एप्रिल) पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कुटुंबांची भेट घेऊन शोक व्यक्त केला.
काय म्हणाली कौस्तुभ यांच्या पत्नी?
कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली घटना राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितली. त्या म्हणाल्या, "माझ्या नवऱ्याला माझ्या डोळ्यासमोर गोळ्या झाडण्यात आल्या. दहशतवाद्यांनी त्यांना अजान म्हणण्यास सांगितले. सर्व महिलांनी मोठ्याने अजान म्हणण्यास सुरुवात केली. तरीही, माझ्या नवऱ्याला त्यांनी गोळी मारली. दहशतवाद्यांनी तिथे जवळच असलेल्या माझ्या नवऱ्याच्या मित्राला बोलवलं आणि त्यांना सुद्धा अजान म्हणायला सांगितलं. हे सर्व पाहिल्यानंतर, तिथल्या महिला पर्यटकांनी त्यांच्या टिकल्या काढून टाकल्या. सर्व महिला 'अल्लाहू अकबर' म्हणू लागल्या, पण त्या दहशतवाद्यांनी कोणतीही दया न दाखवता पुरूषांवर गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर घोड्यावर बसलेल्या एका मुस्लिम व्यक्तीने आम्हाला मदत केली."
हे ही वाचा: सारख्याच नावामुळे नातेवाईक गोंधळले, सांगलीच्या संतोष जगदाळेंसोबत काश्मीरमध्ये काय घडलं?
मुस्लिम व्यक्तीने अडवल्यावर त्यालाही मारली गोळी
या सगळ्या घटनेविषयी सांगताना कौस्तुभ यांची पत्नी म्हणाली की, जेव्हा एका मुस्लिम व्यक्तीने दहशतवाद्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला आणि 'निष्पाप नागरिकांना मारू नका', असे सांगितले तेव्हा त्यालाही गोळी मारण्यात आली. यानंतर, सर्वजण या तिथून पळ काढला. यासाठी तिथल्या लोकांनी पर्यटकांना मदत केली. तसेच लष्कराच्या जवानांनी देखील मदत केली. मात्र, या सगळ्यांची मदत पोहचेपर्यंत माझ्या नवऱ्याचा जीव गेला.' असं म्हणत कौस्तुभ यांच्या पत्नीने पवारांसमोरच टाहो फोडला.