Beed Weapon License : बीडमध्ये शेकडोने बंदुका, परवाना कसा मिळतो? शासन कुणाला देतं शस्त्र बाळगण्याची परवानगी? वाचा सविस्तर
बीडमध्ये गुन्हेगारीचे नवनवीन किस्से रोज माध्यमांसमोर येत आहेत. एकट्या बीडमध्ये बाराशेहून अधिक अधिकृत बंदुकीचे परवाने असतील तर जिल्ह्यात अनधिकृत किती बंदुका असतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीडमध्ये 1200 हून अधिक शस्त्र परवाने

बंदुकीचा परवाना नेमका मिळतो तरी कसा?

शासन कुणाला देतं शस्त्र बाळगण्याची परवागनी?
बीडच्या मस्साजोगच्या प्रकरणानंतर राज्यातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकट्या बीडमध्ये तब्बल 1200 हून अधिक लोकांकडे अधिकृत बंदुकीचे परवाने असल्याचं समोर आलं होतं. सामाजिक कार्यकर्त्या आणि आरटीआय अक्टिव्हिस्ट अंजली दमानिया यांनी देखील याबाबत आवाज उठवला होता. अनेकांकडे परवाने नसतानाही त्यांनी बंदुकीसोबत फोटो काढले असल्याचे देखील दमानिया यांनी समोर आणलं होतं. त्यानंतर बीडचे पोलीस अधिक्षकांनी काहींवर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत.
बीडच्या गुन्हेगारीचे नवनवीन किस्से रोज माध्यमांसमोर येत आहेत. एकट्या बीडमध्ये बाराशेहून अधिक अधिकृत बंदुकीचे परवाने असतील तर जिल्ह्यात अनधिकृत किती बंदुका असतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बीडचं प्रातिधिनिक उदाहरण आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अनधिकृतरित्या मोठ्याप्रमाणावर बंदुकींचा तसेच गावठी कट्ट्यांचा वापर गुन्हेगार करत असल्याचं अनेक घटनांमधून समोर आलं आहे.
बीडमध्ये बाराशेहून अधिक बंदुकीचे अधिकृत परवाने दिले असल्याने तुम्हाला प्रश्न पडला असेल इतके परवाने दिले कसे? त्याचबरोबर एखाद्याला बंदुकीचा परवाना मिळतो कसा हा देखील प्रश्न तुम्हाला पडला असेल.
हे ही वाचा >> Fake IAS Officer : पोलिसांना सोबत घेतलं, हॉटेल-रिसॉर्ट मालकांना धमकावलं; तोतया IAS अधिकाऱ्याचे प्रताप वाचा
ग्रामीण भागात बंदुकीचा परवाना हवा असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागतो. तुम्ही कुठलं हत्यार घेणार आहात, त्याची तुम्हाला का गरज आहे या सगळ्यांची माहिती द्यावी लागते. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा अर्ज आल्यानंतर तो पोलीस अधीक्षकांकडे जातो. ती व्यक्ती ज्या भागात राहते त्या भागातल्या पोलीस स्टेशन मार्फत त्या व्यक्तीची पडताळणी केली जाते. यात त्या व्यक्तीचं कुठलं गुन्हेगारी रेकॉर्ड आहे का? त्या व्यक्तीला खरंच बंदुकीची गरज आहे का? त्या व्यक्तीला कोणाकडून धोका आहे का? याची पडताळणी केली जाते. याची संपूर्ण पडताळणी झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट हा पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठवला जातो. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून तो मग जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला जातो. त्यानंतर जिल्हाधिकारी त्या व्यक्तीला बंदुकीचा परवाना द्यायचा की नाही याचा निर्णय घेतात.
शहरात हा अधिकार पोलीस आयुक्तांना देण्यात आला आहे. पडताळणीची प्रक्रिया सारखीच असते, मात्र परवाना देण्याचा अधिकार हा पोलीस आयुक्तांना असतो.
परवाना कोणाला मिळतो? कोण अर्ज करु शकतो?
एखाद्याला बंदुकीचा परवाना हवा असेल, तर त्यासाठी ठोस कारण द्यावं लागतं. एखाद्या व्यक्तीच्या वडीलांकडे बंदुकीचा परवाना असेल आणि वडिलांनंतर मुलाला हवा असेल तर अशावेळी हा परवाना दिला जातो. एखादा सैन्यातील सैनिक आहे. सैन्यात असताना त्याच्याकडे बंदुकीचा परवाना असेल आणि रिटायर्ड झाल्यानंतर त्याने पुन्हा परवान्यासाठी अर्ज केला तर त्याला देखील हा परवाना मिळू शकतो. शेतकऱ्यांना जंगली श्वापदांसाठी छऱ्यांच्या बंदुकीचा परवाना दिला जाऊ शकतो. एखादा व्यापारी आहे, त्याला धोका असेल तर अशावेळी हा परवाना दिला जातो. अनेकदा पेट्रोल पंप चालक देखील बंदुकीच्या परवान्यासाठी अर्ज करतात अशावेळी त्यांची पडताळणी करुन योग्य कारण वाटल्यास त्यांना देखील असा परवाना दिला जाऊ शकतो.
परवाना रद्द कधी होतो?
एखाद्या व्यक्तीकडे परवाना आहे पण त्याने बंदुकीचा गैरवापर केला, तर त्या व्यक्तीचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. एखाद्या व्यक्तीने त्या बंदुकीचा वापर करुन गुन्हेगारी कृत्य केलं तर त्याचा देखील परवाना रद्द केला जाऊ शकतो. एका विशिष्ट काळासाठी हा परवाना दिलेला असतो. अधिकारी या परवान्यांची पडताळणी करुन एखाद्या व्यक्तीला परवान्याची आता गरज नाही असं वाटल्यास, त्या व्यक्तीला नोटीस पाठवून योग्य उत्तर न आल्यास परवाना रद्द केला जाऊ शकतो.
परवाना मिळाला, तर त्याला ती बंदुक हवी तशी वापरता येत नाही. योग्य कारणाशिवाय कोणालाही त्या बंदुकीचा वापर करता येत नाही.
एकूणच ही सर्व प्रक्रिया पाहता बीडमध्ये इतक्या मोठ्याप्रमाणावर शस्त्र परवाने का देण्यात आले हा प्रश्न अनुत्तरीत आहे. अंजली दमानिया यांनी याविरोधात आवाज उठवल्याने अनेकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे.