‘जगेन अन् मरेन, पण…’; शंभुराजेंनी डिवचताच भास्कर जाधवांचा सुटला संयम
“मी निवडून आलो काय आणि गेलो काय? मला ना सुख, दुःख. माझ्या आईच्या घराण्यात कुणी राजकारणत नाही, ना वडिलांच्या घराण्यात. पडलो काय नि गेलो काय, तत्वाने जगेन आणि तत्वाने मरेन”, असं उत्तर जाधवांनी शंभूराज देसाईंना दिलं.
ADVERTISEMENT
Bhaskar Jadhav News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. यावेळी विधानसभेत राजकीय जुगलबंदी चांगलीच रंगली. अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना शिवसेनेचे (युबीटी) आमदार भास्कर जाधव यांनी जुन्या राजकीय जखमांच्या खपल्या काढल्या आणि शिंदेंना लक्ष्य केले. गुलाबराव पाटलांना सवाल केला. यावरून शंभूराजे देसाईंनी त्यांना डिवचलं अन् भास्कर जाधवांचा संयम सुटला.
ADVERTISEMENT
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “तुमच्याबद्दल बऱ्याच जणांनी चिंता व्यक्त केली. विजयरावांना चांगलं खातं मिळालं नाही म्हणून फार मोठी चिंता तुमच्याबद्दल व्यक्त केली. त्या गोष्टीबद्दल तुम्ही फार भारावून जाऊ नका आणि दुःखीही होऊ नका. तुमची नोंद इतिहासात अशी होईल की, विजयरावांना चांगली खाती मिळाली नाही, तरीदेखील विजयरावांनी पक्ष सोडला नाही. ज्यांना सगळं काही मिळालं. ते इकडून उठले आणि तिकडे गेले. पण, विजयराव मात्र तिथेच राहिले, ही तुमच्या नावाने इतिहासात नोंद होईल.”
Bhaskar Jadhav : “तिघेही एकेकाळचे शिवसैनिक”
“तुम्ही ठरवायचं की आपली नोंद कोणती करून घ्यायचीये. या सभागृहातील तीन पदं महत्त्वाची आहे. सर्वोच्च पद म्हणून आपण (राहुल नार्वेकर) बसलेला आहात. राज्याच्या सर्वोच्च पदी एकनाथ शिंदे बसलेले आहेत. दुसरे विरोधी पक्षनेते पद हे विजय वडेट्टीवारांकडे आहे. नियतीचा काय न्याय आहे मला माहिती नाही. नियतीच्या मनात काय असतं, मला माहिती नाही. पण, तुम्ही तिघेही एकेकाळचे शिवसैनिक आहात”, ही बाब भास्कर जाधवांनी नोंदवली.
हे वाचलं का?
“विजयराव, तुम्हाला परिस्थिती कशीही असली, तरी लढावंच लागेल. आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा ही मंडळी (भाजप) तीन पायाचं सरकार, तीन चाकाचं सरकार म्हणून चेष्टा करायचे. टिंगल-टवाळी करत होते. आता तिघे एकत्र आल्यावर काय म्हणतात, त्रिशुल सरकार. देवेंद्र फडणवीस बोलण्यात अत्यंत चालाख आहे. शब्द कसा फिरवायचा, यात तुमचा हात कुणी धरू शकणार नाही”, असा टोला भास्कर जाधवांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
“मला माहिती नाही की, तुम्हाला ईडी, एनआयएची नोटीस आलीये की नाही? तुम्हाला सीबीआय, इन्कम टॅक्सची नोटीस आलीये की नाही. विजयराव, कुणाचीही नोटीस येऊ द्या. पण, लोकशाही वाचवण्यासाठी कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा”, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांना भास्कर जाधव यांनी दिला.
ADVERTISEMENT
एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना घेरलं
“अजित पवार तिकडे गेलेत. अजितदादा तुम्ही पलिकडे गेल्याचं आम्हाला दुःख आहेच, पण मगाशी राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, ज्यांचा विरोध होता, त्यांच्याबरोबरच विजयराव गेले. अजित पवारांना विरोध या सगळ्यांचा (शिवसेना शिंदे गट) होता. अजित पवार आम्हाला निधी देत नाही म्हणत होते.”
ADVERTISEMENT
“पलिकडे गेल्यावर भाषण काय होती, तर आमचं हिंदुत्व हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मांडीवर नेऊन ठेवलं. असं सारखं म्हणायचे. अजितदादा तुम्ही तिकडे गेलात बरं झालं. आता यांच्या मांडीवरून मानेवर बसा. त्यासाठी विजय वडेट्टीवार मदत करतील”, असा सल्ला भास्कर जाधवांनी अजित पवारांना दिला.
“मी निवडून आलो काय आणि नाही काय”
“नियती न्याय केल्याशिवाय कुणालाही सोडत नाही. गुलाबराव, कुठेय तुमचं हिंदुत्व? कुठेय अजितदादा निधी देत नव्हते, ते? त्याच अजितदादांच्या हाता राज्याच्या तिजोऱ्या आहेत. शेवटी नियती न्याय करत असते. मी बाकीच्यांना सगळ्यांना सांगतो…”, असं बोलत असतानाच शंभूराजे देसाईंनी भास्कर जाधवांना मध्ये टोकलं. त्यावर भास्कर जाधव म्हणाले, “मी निवडून आलो काय आणि गेलो काय? मला ना सुख, दुःख. माझ्या आईच्या घराण्यात कुणी राजकारणत नाही, ना वडिलांच्या घराण्यात. पडलो काय नि गेलो काय, तत्वाने जगेन आणि तत्वाने मरेन”, असं उत्तर जाधवांनी शंभूराज देसाईंना दिलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT