“…तर त्याचे खापर मोदी-शाहांवर फुटेल”, शिवसेनेचे (UBT) स्फोटक भाष्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Who will win Lok Sabha 2024 election? Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) has put forward a position regarding this. Prime Minister Narendra Modi has been criticized. Allies are urged to exercise restraint.
Who will win Lok Sabha 2024 election? Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) has put forward a position regarding this. Prime Minister Narendra Modi has been criticized. Allies are urged to exercise restraint.
social share
google news

2024 lok sabha election prediction : देशभरात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तयार होऊ लागलं आहे. भाजपसह प्रमुख राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले असून, 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मित्रपक्षाचं लक्ष वेधून घेत काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून मित्रपक्षांचे कान टोचले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. (Latest update on Maharashtra Politics)

ADVERTISEMENT

शिवसेनेने सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “2024 च्या गणिताची आतापासून जुळवाजुळव सुरू झाली आहे. ही जुळवाजुळव फक्त भारतीय जनता पक्षच करतोय असे नाही, तर यावेळी भाजपेतर पक्षही कामास लागले आहेत. भाजपच्या पायाखालची सतरंजी खेचली जात आहे. कर्नाटकच्या निकालामुळे मोदी-शाहांच्या चेहऱ्यावरचा रंग साफ उडाला आहे. दक्षिणेतला एकमेव दरवाजा त्यांच्यासाठी बंद झाला आहे. नव्या संसदेत तामीळनाडूतून खास ‘सन्गोल’ आणला तरी तामिळी जनता ‘हा किंवा तो द्रमुक’ सोडून भलत्या-सलत्यांच्या पाठीमागे पळत नाही हा आतापर्यंतचा इतिहास. त्यामुळे दक्षिणेत भारतीय जनता पक्षाने कर्नाटक हे एकमेव राज्य गमावले हा 2024 च्या तोंडावर अपशकुन आहे.”

“पुढील काळात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढसह चारेक राज्यांत निवडणुका होतील. यातील मध्य प्रदेश भाजपकडे राहणार नाही. महाराष्ट्राप्रमाणे एका शिंद्यांस काँग्रेसमधून फोडून भाजपने मध्य प्रदेशात सरकार बनवले. ते कमालीचे अलोकप्रिय ठरले व भाजप त्यामुळे गाळात जात आहे. छत्तीसगढ पुन्हा काँग्रेसकडेच जाईल. राजस्थानात जादूगार अशोक गेहलोत भाजपास सहजासहजी पुढे जाऊ देणार नाहीत. हे चित्र जनमताचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत याचे द्योतक आहे. मोदी-शाह या दुकलीविरोधात देशभरात संताप आहे. गुजरात आणि उत्तर प्रदेश ही दोन राज्ये सोडली तर मोदी-शाहांच्या विरोधात संपूर्ण देश उभा ठाकला आहे”, असं मत अग्रलेखातून मांडण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

मोदी-शाहांवर हल्ला, विरोधकांना सबुरीचा सल्ला; ठाकरेंनी अग्रलेखात काय काय म्हटलंय?

– “राज्यातील प्रादेशिक पक्षांना व त्यांच्या छत्रसालांना एकत्र बांधण्यासाठी प्रत्येक जण शर्थ करीत आहे. नितीश कुमार यांनी पाटण्यात 12 जून रोजी भाजप वगळून देशभक्त पक्षांची बैठक बोलावली आहे. त्या बैठकीतून बऱ्याच सकारात्मक गोष्टी बाहेर पडतील. राजकारणातील सध्याचे गुजरात मॉडेल राष्ट्रहिताचे नाही. सर्वच प्रमुख सरकारी पदांवर, आर्थिक पेढ्यांवर एकाच राज्यातील लोकांची नेमणूक केली जात आहे व देशाचा सर्व आर्थिक ओघ एकाच राज्यात वळवला जात आहे. त्यामुळे ‘गुजरात विरुद्ध संपूर्ण देश’ असा संघर्ष उभा राहिला तर त्याचे खापर मोदी-शाहांवर फुटेल”

हिंदू-मुसलमान दंगलींचा फंडा

– “एकाच राज्यात व त्यातील लोकांकडे सर्व आर्थिक सत्ता एकवटून मोदी व शहा सरळ ‘भेद’ करीत आहेत. 2024 च्या प्रचारात हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. गुजरातने शंभर टक्के लोकसभेच्या जागा भाजपास दिल्या तरी काही खरे नाही, पण विधानसभेप्रमाणे ‘आप’ने गुजरातेत चढाओढ केली नाही तर भाजपास पैकीच्या पैकी जागा मिळणार नाहीत. उत्तर प्रदेशात मायावतींचा मासा भाजपच्या गळास लागला आहे, पण राहुल गांधी यांनी एक स्वतंत्र मोहीम उत्तरेत राबवली तर चित्र बदलू शकेल. अखिलेश यादव-काँग्रेस यांनी एकत्र येण्याचा समंजसपणा दाखवला तर ‘हिंदू-मुसलमान’ दंगलींचा फंडा योगी राज्यात चालणार नाही.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Sakshi Murder साहिलला मिळालेल्या धमकीमुळे झाला? खुनाच्या 24 तास आधी काय घडलं होतं?

– “भारत जोडो यात्रा, कर्नाटकाच्या विजयानंतर राहुल गांधी यांचे नेतृत्व आणि पकड मजबूत झाली आहे. मोदी हे ब्रह्मांडासही ज्ञानामृत पाजतात. तसे राहुल गांधींचे नाही. त्यांच्यातील संयम लोकांना आवडू लागला आहे. मोदी-शाहांचे मोगली क्रौर्य, अहंकार, उठवळ राजकारण, थापेबाजी दिवसेंदिवस उघडी पडत आहे. लोकांना पर्याय हवा आहे. भाजप हा अजिंक्य नाही. मोदींचा पराभव होऊच शकत नाही हा भ्रम तुटू लागला आहे.”

ADVERTISEMENT

दंतकथा 2024 ला तुटेल

– “जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष हे स्थान भाजपचे उरलेले नाही. देशात 36 राज्ये आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, आसाम, गुजरात, हरयाणा, मणिपूर, अर्धेमुर्धे महाराष्ट्र ही राज्ये सोडली तर भाजपच्या नावे सगळा ठणठण गोपाळ आहे. बिहार, प. बंगाल, कर्नाटक, केरळ, राजस्थान, तामीळनाडू, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, झारखंड अशा राज्यांत भाजप किंवा मोदी नाहीत. 2014 व 2019च्या विजयात तांत्रिक हेराफेरी होती हा लोकांचा संशय होता, पण ‘ईव्हीएम’चा गैरवापर व पैशांचा वापर करून मोदींना विजयी केले जाते ही दंतकथा 2024 ला तुटेल”

Video >> पंकजा मुंडे भाजपमध्ये नेमक्या कुठं आहेत?, बघा खास विश्लेषण

– “पी. चिदंबरम यांनी जे गणित मांडले ते सत्य आहे. देशातील 450 जागांवर भाजपविरोधात एकास एक लढत झाली तर चित्रच बदलेल. प. बंगालसारखी मोठी राज्ये, हरयाणा-तेलंगणासारखी मध्यम, ईशान्येकडील छोट्या राज्यांत भाजपच्या दहापाच व एकदोन जागा कमी झाल्या तरी किमान शंभर जागांचा फटका बसेल व हा 05आकडा भरून देण्यास कोणीही माईचा लाल पुढे येणार नाही.”

– “मोदी-शाहांच्या क्रौर्याने, अहंकारी राजवटीने प्रत्येक जण पीडित आहे. महाराष्ट्रासारखी राज्ये तर सध्याच्या भाजपास पूर्णपणे झोपवणार आहेत. प. बंगाल, बिहार, कर्नाटकात भाजप संपुष्टात येईल. भाजपचे लोक ‘अब की बार चारशे पार’चा जो गजर लावत आहेत ते उसने अवसान आहे. दोनशेपर्यंत पोहोचले तरी पुरे असे त्यांचेच लोक बोलत आहेत.”

मोदी नाही तर कोण? मित्रपक्षांना सुनावलं

– “गुजरातच्या तथाकथित पोलादी पुरुषांना मणिपूरची हिंसा रोखता आली नाही. कश्मिरी पंडितांची घरवापसी करता आली नाही. पुलवामा कांडात आपल्याच चाळीस जवानांचे नाहक बळी 2019च्या निवडणुका जिंकण्यासाठी घेतले आणि हे म्हणे देशभक्त! कश्मीरात आजही जवानांचे बळी जात आहेत व मोदी-शाहांकडे त्यावर तोडगा नाही. हे सर्व जनता पाहत आहे. अशा वेळी भाजपेतर पक्षांनी एक व्हायला हवे व ते एक होताना दिसत आहेत. लोकांचा रेटा मोठा आहे. मोदी-शाह प्रवृत्तीचा पराभव घडविण्यासाठी जनतेने मन बनवले आहे. देशभक्त पक्षांनी कपाळकरंटेपणा करू नये. मोदी नाही तर कोण? राहुल गांधी मोदींसमोर टिकणार नाहीत. मोदी यांना राहुलमुळे विजय मिळतो वगैरे भ्रामकांतून सगळ्यांनी बाहेर पडायला हवे.”

हेही वाचा >> नामांतरावरून असाही गोंधळ! एकाच दिवशी अहमदनगरला मिळाली चार नवी नावं!

– “मोदींना आव्हान आता राहुल गांधींचेच वाटत आहे हे मोदी-शाहांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते. मोदी हेच भाजपच्या दारुण पराभवाचे कारण ठरतेय. अमित शहा त्या पराभवास हातभार लावतील. आता प्रश्न राहतो मोदी विरोधकांचा. पंतप्रधानांचा चेहरा कोण? संविधान, भारतमाता हाच चेहरा आहे. लोकांतून नेता निर्माण होईल. रावणराज्याचा अंत झाल्यावर श्रीरामाचा राज्याभिषेक झाला व अयोध्येत दिवाळी साजरी झाली. त्यामुळे रावणराज्याचा अंत होण्यासाठी वानरसेनाही बरोबर घ्यावी लागेल. त्यासाठी सगळ्यांनाच ‘मी’पणा कमी करावा लागेल. आता तरी ‘आपल्याला बुवा पंतप्रधान व्हायचे नाही’ याच भूमिकेत सर्व नवरदेव आहेत. नवरदेवांनी हेच धोरण ठेवले तर सगळ्यांच्याच मनाप्रमाणे घडेल”, असा सल्ला शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मित्रपक्षांना दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT