BJP : “…तीच भूमिका प्रफुल पटेलांबद्दलही असती”, ठाकरेंवर पलटवार, भाजपने सोडलं मौन
Maharashtra BJP on Praful Patel : नवाब मलिक यांना विरोध करणाऱ्या भाजपला विरोधकांनी प्रफुल पटेलांवरून घेरले आहे. त्यावर आता भाजपने खुलासा करत विरोधकांना उत्तर दिले आहे. सामना अग्रलेखातून झालेल्या टीकेलाही भाजपने प्रत्युत्तर दिले आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra BJP on Nawab Malik and Praful Patel : ‘भाजपच्या नैतिकतेचे ऑडिट’ या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखातून शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रफुल पटेलांबद्दल भाजपला सवाल केले. शिवसेनेच्या (यूबीटी) प्रश्नांना उत्तर देतांना भाजपने उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर पलटवार केला आहे. (Maharashtra Bjp Reply To Uddhav Thackeray and Sanjay Raut)
उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर ‘वार’; भाजपचे उत्तर काय?
शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सामना अग्रलेखातून नवाब मलिकांबद्दल भाजपने घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केले. ठाकरे गटाने प्रफुल पटेलांबद्दल भाजपला प्रश्न केला. त्याला आता भाजपने उत्तर दिले आहे. भाजपने काय म्हटलंय वाचा…
“उबाठाचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपादक पोपटलाल यांनी त्यांच्या अडीच वर्षातील महाविकास आघाडीचं ऑडिट केलं असतं, तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उबाठा ‘एनपीए’त गेली आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार उरला तरी कुठे?”, असा सवाल भाजपने उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना केला आहे.
हेही वाचा >> “काय हे दादा? तुम्ही तर आमच्या इज्जतीचा…”, ठाकरेंचं फडणवीसांच्या वर्मावर बोट
“नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ते जेलमध्ये गेले. सध्या वैद्यकीय कारणांमुळे त्यांना जामीन मिळाला. पण प्रफुल्ल पटेल यांचं प्रकरण वेगळं आहे. त्यांच्यावर ना गुन्हा दाखल आहे, ना ते जामिनावर बाहेर आहेत. प्रफुल्ल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता, तर जी भूमिका नवाब मलिक यांच्याबाबत, तीच प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत ही असती”, अशी भूमिका भाजपने मांडली आहे.
“उबाठा गटानं नैतिकतेचं ढोंग अजिबात रचू नये. नवाब मलिक तुरुंगात असून सुद्धा शेवटपर्यंत त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत तुम्ही दाखवली नव्हती. हे महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलंय. त्यामुळे ऑडिट करायचंच असेल तर तुमच्या अडीच वर्षाच्या काळातील नैतिकेतेचं करा. तो रिपोर्ट पाहून तुम्हाला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही”, अशा शब्दात भाजपने ठाकरे गटाला उत्तर दिले आहे.
हेही वाचा >> फडणवीसांचं ‘ते’ पत्र, अजित पवार गटाने हात केले वर..! आता नवाब मलिकांचं काय होणार?
उबाठाचे नेते उद्धव ठाकरे आणि त्यांचे संपादक पोपटलाल यांनी त्यांच्या अडीच वर्षातील महाविकास आघाडीचं ऑडिट केलं असतं तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडल्यामुळे उबाठा ‘एनपीए‘त गेली आहे. तुम्हाला आता नैतिकतेच्या गप्पा मारण्याचा अधिकार उरला तरी… pic.twitter.com/EepIALBSng— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) December 9, 2023
सामनात अग्रलेखात काय?
मलिकांच्या मुद्यावर बोलताना ठाकरे गटाने अग्रलेखात म्हटलेले की, “पटेल यांची दाऊद-मिर्ची व्यवहारातील सर्व संपत्ती ‘ईडी’ने जप्त केली, पण मलिक यांना अटक केलेल्या ‘ईडी’ने त्यापेक्षा भयंकर प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप असूनही पटेल यांना मात्र अटक केली नाही. आरोप तेच, व्यवहार तोच, पण दोन वेगळे ‘न्याय’ लावले. मलिक यांना जो ‘न्याय’ तो पटेलांना का नाही? असा प्रश्न भाजप विरोधकांनी आता विचारला आहे.”
“मिर्चीफेम प्रफुल पटेल पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांना भेटतात. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी-शहांना एक पत्र लिहून ‘पटेलांना भेटणे देशहिताचे नाही. भाजपच्या नैतिकतेत ते बसत नाही. साहेब, पटेलांना लांब ठेवा’ असे सांगण्याचे धाडस दाखवावे. तरच मलिकांच्या बाबतीतील त्यांच्या नैतिकतेच्या उचक्या खऱ्या, नाहीतर पैशाचे सोंग व भाजपचे नैतिकतेचे ढोंग सारखेच”, असे ठाकरे गटाने सामना अग्रलेखात म्हटलेले आहे.