Maratha Reservation: ‘या’ घडीची मोठी बातमी… मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं, घेतला मोठा निर्णय
Manoj Jarange: मराठा आरक्षणासाठी मागील 9 दिवसांपासून पुकारलेलं आमरण उपोषण अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT

Manoj Jarange: अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी पुकारलेलं आमरण उपोषण अखेर आज (2 नोव्हेंबर) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पुन्हा एकदा जरांगे-पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला तब्बल 2 महिन्यांचा वेळ दिला आहे. सरकारच्या वतीने जे शिष्टमंडळ पाठविण्यात आलं होतं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे-पाटलांनी हा निर्णय जाहीर केला.
सुरुवातीला मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा उपोषण केलं होतं. तेव्हा स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतरवाली सराटी येथे येऊन मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवलं होतं. त्यावेळी सरकारने 30 दिवसांचा वेळ मागितला होता. मात्र, त्यानंतरही आरक्षण मिळू न शकल्याने जरांगे पाटील यांनी 9 दिवसांपूर्वी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती. मात्र आता अखेर पुन्हा एकदा सरकारला 2 महिन्यांचा वेळ देऊन जरांगेंनी पुन्हा एकदा आपलं उपोषण सोडलं आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation: ’11 मुख्यमंत्र्यानी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत गोल-गोल फिरवलं’
एकीकडे राज्यातील परिस्थिती चिघळू नये यासाठी सरकारने शिंदे समितीतील दोन्ही निवृत्त न्यायाधीश आणि मंत्रिमंडळातील काही महत्त्वाचे मंत्री हे यावेळी चर्चेला उपस्थित होते. यावेळी दीड तास चर्चा झाल्यानंतर अखेर 2 महिन्यांचा वेळ देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं आहे.
उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगे-पाटील नेमकं काय म्हणाले?
‘महाराष्ट्रातील समाजाचं काय? आपण जातीशी दगाफटका करू शकत नाही. हीच समिती यांनी आणखी वेळ घ्यावा आणि महाराष्ट्रभर काम करून संपूर्ण मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी काम करावं.’
‘असं ते ठरलं आहे आणि ते समितीने देखील मान्य केलं आहे. हे महाराष्ट्रातील समाजासाठी विशेष सांगतो आहे. अर्धवट आरक्षण घेतलं तर आपला एक भाऊ नाराज झाला असता आणि एक भाऊ खुश झाला असता. पण दिवाळी सगळ्यांना गोड पाहिजे. या मताचा मी आहे..’
‘सरकारला वेळ घ्यायचाय तो घ्यावा.. समिती सरकारला अहवाल देईल. आपण त्याना सांगितलं आहे की. आपले स्वत:चे अभ्यासक देखील आहेच.’
‘कोणत्या टप्प्यावर आंदोलन थांबवायचं आणि कोणत्या टप्प्यावर आंदोलन सुरू करायचं यावर देखील चर्चा झाली. नुसतंच ताणून धरलं हे पण नाही केलं पाहिजे. आपण आता त्यांना सांगितलं आहे की, ही तुमच्यासाठी शेवटची वेळ.’
‘मराठवाड्याचं भागलं होतं.. पण आपल्या सगळ्या भावांना आरक्षण मिळालं पाहिजे.’ असं मनोज जरांगे पाटील यावेळी म्हणाले.
हे ही वाचा >> Manoj Jarange : अन्न-पाण्याशिवाय माणूस किती दिवस जगू शकतो? मृत्यू होऊ शकतो का?
जरांगे-पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर आता सरकार या सगळ्याबाबत कसा तोडगा काढणार आणि मराठा समाजाला कसं आरक्षण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.