Manoj Jarange: ‘एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय, त्यांनीच..’, जरांगे-पाटील संतापले; तुफान टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

maratha reservation manoj jarange patil was furious stormy criticism of dcm devendra fadnavis bjp
maratha reservation manoj jarange patil was furious stormy criticism of dcm devendra fadnavis bjp
social share
google news

Manoj Jarange Criticized to Devendra Fadnavis over Maratha Reservation: अंतरवाली-सराटी: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापलेला असतानाच अनेक जिल्ह्यांमध्ये जाळपोळीच्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे. याच प्रकरणी आता 307 कलमांतर्गत कारवाई केली जाईल असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. ज्यानंतर अंतरवाली सराटीत झालेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे. (maratha reservation manoj jarange patil was furious stormy criticism of dcm devendra fadnavis bjp)

ADVERTISEMENT

‘देवेंद्र फडणवीस यांनी उभ्या आयुष्यात एवढंच केलं. कोण टार्गेट केलं.. कोण कोणाचं काय केलं.. घरं कोणी जाळली हे तुम्हाला माहिती का? मराठ्यांनी जाळली का कोणी जाळली ते.. तुमचेच लोकं घुसवता आणि तुम्ही जाळपोळ करता. अरे भाजप तुमच्यामुळेच संपायला लागलाय ना. इतर राज्यात एवढे मागे का आले आहेत? हे असले नमुने आहेत ना.. मोठ्या बढाया हाणणारे..’ असं म्हणत जरांगे पाटलांनी फडणवीसांवर टीकेची झोड उठवली.

हे ही वाचा >> Maratha Reservation: ‘तेच मराठा आरक्षणाचे मारेकरी’, मुख्यमंत्री शिंदेंचा थेट उद्धव ठाकरेंवरच आरोप

मनोज जरांगे पत्रकार परिषदेत फडणवीसांवर संतापले

आज रात्रीपर्यंत निर्णय घ्या.. सरकारने उद्याच विशेष अधिवेशन बोलवावं. जर उद्यापर्यंत निर्णय घेतला नाही तर मी जलत्याग करणार. सरकारने घेतलेला एकही निर्णय मान्य नाही. आम्ही शांतेत आंदोलन करत असताना तुम्ही आम्हाला त्रास देत असाल तर आमचा नाईलाज आहे. बीडसह महाराष्ट्रातील लोकांना त्रास द्यायचा नाही.

आज तुम्ही विचार करा आणि उद्या विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या. जर उद्या संध्याकाळपासून तुम्ही हे मान्य केलं नाही तर उद्यापासून मी पाणी घेणं बंद करेन.

संपूर्ण महाराष्ट्रात 50 टक्के मराठा आहेत. तुम्ही दुसऱ्यांमुळे आमच्या लेकरांच्या मुंडक्यावर पाय द्यायचा असेल तर जे व्हायचं ते होईल. उद्या संध्याकाळपासून होणाऱ्या परिणामाची जबाबदारी तुमची.

आमचं आंदोलन शांततेत होणार.. पण कोण-कोण आंदोलन करतं हे आम्हीही पाहतो.. आणि सरकार पण काय करतं तेही पाहतो. तुम्ही काय मस्करी लावलीत का? तुम्हाला त्यांची गरज आहे आणि आम्हा मराठ्यांची गरज नाही का? सारखं तेच म्हणतायेत की, त्यांचीच गरज आहे.. त्यांचीच गरज आहे.. मग मराठे काय वापरायला ठेवलेत का तुम्ही?

देवेंद्र फडणवीस यांनी उभ्या आयुष्यात एवढंच केलं. कोण टार्गेट केलं.. कोण कोणाचं काय केलं.. घरं कोणी जाळली हे तुम्हाला माहिती का? मराठ्यांनी जाळली का कोणी जाळली ते.. तुमचेच लोकं घुसवता आणि तुम्ही जाळपोळ करता. अरे भाजप तुमच्यामुळेच संपायला लागलाय ना. इतर राज्यात एवढे मागे का आले आहेत? हे असले नमुने आहेत ना.. मोठ्या बढाया हाणणारे..

निधी आमचाय, कर जनेतचा आहे.. फुकट पैसे खायचे.. बासुंदी खा, गुलाबजाम खा.. फुकट खायचं.. यांना आता सुचेना झालंय. आणि आता म्हणतायेत 307 करेन वैगरे.. कर तुला काय करायचं ते.. तुम्ही आता ठरवलंच ना राज्यात अशांतता करायची ते.. तुमची बुद्धी जेवढी असेल तेवढंच तुम्ही बोलणार आहात. तुम्ही आम्हाला हक्काचं आरक्षण द्या.. आम्ही फक्त उद्यापर्यंत वाट बघू नाहीतर उद्यापासून पाणी देखील बंद करू.

सरकारला दुसरं कामच काय आहे दुसरं.. बांगड्या भरल्यावानी चाळे करायचे… यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या सगळ्यांच्या.. हे मर्दासारखं चालवतच नाही.. आतून काड्या करायच्या.. कुठे नेट बंद कर.. कुठे काय बंद कर. मराठ्यांचं आंदोलन आता थांबत नाही. आमच्या अंगावर यायचा प्रयत्न केला तर आमचा पण नाईलाज आहे. आम्हाला पण मर्यादा सोडाव्या लागतील. याला जबाबादार सरकार राहणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री.

त्यातील एक उपमुख्यमंत्री जास्त जबाबदार राहणार आहे. कारण त्याला अशा काड्या करायची लय सवय आहे.

40 वर्ष झाले आमचे फुकट आरक्षण खाता.. परत म्हणता आम्ही रस्त्यावर उतरू.. उतर तू रस्त्यावर.. आमच्या अंगावर यायचं नाही.. नाही तर त्याला सरकार जबाबदार राहील. त्यातला उपमुख्यमंत्री तर शंभर टक्के जबाबदार राहणार.

सरकारला मजाच बघायचीय ना.. होऊन जाऊ दे आता.. सरकारला दार पण सोडता आलं नाही पाहिजे. पण शांततेच.. आपणच 50 टक्के आहेत.

खातो तोवर आमचं तोपर्यंत गोड लागतं. आता द्यायची वेळ आली तेव्हा रस्त्यावर येतो म्हणतो.. ये तू रस्त्यावर.. तुला कोणत्या सरकारची फूस आहे ना.. त्यातला एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे.. त्याच्याकडे बघावं लागेल.. बाळा तू लोकांना थांबव तू राज्य बिघडवू नको.. एक तर सगळा भाजप विद्रूप करून टाकलाय तू. असे रंगीबेरंगी आणून ठेवलेत त्या सरकारमध्ये.

तुमचा नियमच आहे पहिल्यापासून.. तुम्हाला लोकांमध्ये भांडण लावून दिल्याशिवाय जमतच नाही. इतके खोडीचे आहेत तुम्ही.

मी ओबीसी बांधवांना सांगतो तुम्ही विनाकारण यांचं ऐकून रस्त्यावर येऊ नका.. यांचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे.. यांनी गोरगरीबांना झुंजायला लावलंय एकमेकांविरोधात.. यांचा पहिल्यापासून इतिहास आहे.. ते घरात बसून मलिदा खातात..

यांनी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये झुंज लावली तर यांना घरातच बसू द्यायचं नाही.. जो मजा बघतो ना.. त्याच्याच मागे लागायचं आता.

राज्यातील परिस्थितील वाईट आहे.. म्हणा मला विचार ना.. माझा नंबर घे आणि मला फोन करून विचार म्हणावं.. मी सांगतो खरं काय ते.. ते कधीच खरं सांगणार नाही.

आता म्हणतो केसेस करेन.. तुला दुसरं काहीच येत नाही का? राज्य चालवायला निघाले… स्वप्न बघतात.. मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होणार.. काय होणार पुन्हा पंतप्रधान ते.. हा असं वागल्यावर.. अशी संतप्त प्रतिक्रिया जरांगेंनी यावेळी दिली.

हे ही वाचा >> Maratha Reservation : देवेंद्र फडणवीसांवर विश्वास नाही?, सुप्रिया सुळेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

एकीकडे राज्यात अनेक ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला असताना दुसरीकडे मनोज जरांगे पाटील हे देखील आरक्षणासाठी उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. अशावेळी सरकार नेमकी काय भूमिका घेणार किंवा यामधून नेमका कसा तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT