Lok Sabha 2024 : राणे-सामंत संघर्ष पेटणार की शमणार! शिंदे काय देणार ‘मेसेज’?
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघावरून शिवसेना आणि भाजपतील उदय सामंत-नारायण राणेंनी एकमेकांना लक्ष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
Eknath Shinde Sindhudurg-Ratnagiri Lok Sabha 2024 : महाराष्ट्रातील काही लोकसभा मतदारसंघ असे आहेत, जिथे भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्याकडून दावे-प्रतिदावे केले जाताहेत. यात एक मतदारसंघ आहे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा. उदय सामंत यांनी मतांचं गणित सांगत या मतदारसंघावर दावा केला. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी उत्तर देत पहिला दावा आमचा असं सांगतानाच युतीचे मंगळसूत्र घातलेय तर पावित्र्य जपावे लागेल अशा शब्दात सुनावले. त्यात आता शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा राजापूरमध्ये होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात बोलणार आहेत. लोकसभा मतदारसंघावर दावा करणार की, सामंतांना सबुरीने घेण्याचा मेसेज देणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
ADVERTISEMENT
सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात 2019 मध्ये शिवसेनेचे विनायक राऊत जिंकले होते. सध्या ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. पण, आता लोकसभा 2024 ची तयारी सुरू आहे. या मतदारसंघातून कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. दुसरीकडे या मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. या सगळ्यात सामंत आणि राणेंनी केलेल्या विधानामुळे दोन्ही गटातील सुप्त संघर्ष समोर आला.
उदय सामंतांनी केला सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघावर दावा
काही दिवसांपूर्वी उदय सामंत म्हणालेले की, “सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहता ही जागा शिवसेनेकडेच असायला हवी. या लोकसभा मतदारसंघात माझा विधानसभा मतदारसंघ आहे. माझ्या मतदारसंघातून महायुतीला सव्वालाख मते मिळतील. बाजूच्या सिंधुदुर्गमधून म्हणजेच दिपक केसरकरांच्या मतदारसंघात आमचे मोठे मताधिक्य आहे. त्यामुळे आम्ही या जागेवर दावा केला आहे.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> “गोळी घातली की…”, ठाकरेंचा नेता ढसाढसा रडला, काय घडलं?
“ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार लढला असेल आणि तिथे उमेदवार बदलायचा असेल किंवा जिथे भाजपचा उमेदवार लढला असेल आणि आता बदल करायचा असेल, तर हे केवळ बोलण्याने होत नाही. आजही या जागेवर शिवसेनेचा अधिकार आहे. एकनाथ शिंदेंचा या जागेवर दावा आहे. त्यामुळे या जागेबाबत एकनाथ शिंदे घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य असेल”, असे सांगत सामंतांनी शिंदेंच्या कोर्टात हा चेंडू टाकला.
नारायण राणेंनी केला दावा, सामंतांचा घेतला समाचार
सामंतांनी केलेल्या विधानानंतर नारायण राणेंनी मतदारसंघावर दावा केला.”उदय सामंत बोलतील आणि तसा निर्णय होईल, असे होणार नाही. आम्ही ओरिजनल आहोत. आम्ही पहिल्यापासून इथे आहोत. आम्ही भाजपत असलो तरी या जागेवर आमचा दावा कायम आहे. कोणता उमेदवार या जागेवरून निवडणूक लढवणार ते आमचा पक्ष ठरवेल. उदय सामंत यांनी यावर भाष्य करू नये. मी कधी लोकसभेच्या दावेदारीवर भाष्य करतो का? युतीत नांदायचे असेल, तर त्याचे पावित्र्य ठेवावे लागेल. एकदा मंगळसूत्र घातले की, त्याचे पावित्र्य जपावे लागेल”, असे म्हणत सामंतांना अप्रत्यक्षपणे भाजपच्या मर्जीप्रमाणे निर्णय होईल असे संकेत राणेंनी दिले.
ADVERTISEMENT
राणेंच्या विधानानंतर तेलींनीही मतदारसंघावर केला दावा
राणे यांनी सामंतांना उत्तर दिले. त्यानंतर माजी आमदार आणि भाजपचे नेते राजन तेलींनीही या मतदारसंघावर दावा केला. ते म्हणाले, “मते कुणाची जास्त यापेक्षा मजबूत बांधणी कोणाची आहे, याला फार महत्त्व आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपची बांधणी सगळ्यात जास्त आहे. त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आम्ही पक्षश्रेष्ठींकडे तशी मागणी सुद्धा केली आहे.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> घरातून बाहेर पडला पण, मोहोळला दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेताच आलं नाही
“2019 मध्ये निलेश राणे अपक्ष हे लढले होते आणि त्यावेळी त्यांना दोन लाख 80 हजार मते मिळाली होती. त्यावेळी शिवसेनेचे विनायक राऊत हे भाजपाने मदत केल्याने विजयी झाले होते. त्यामुळे आताची आमची मते आणि निलेश राणेंची मते हे पाहता निश्चितच या मतदारसंघात आमची ताकद आहे”, असे राजन तेली यांनी सांगितले.
पुढे तेली यांनी सांगितलं की, “त्यामुळे आमची इच्छा आहे की भाजपच्या चिन्हावरच सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली जावी. कधी नव्हे ती संधी पक्षाला मजबूत बांधणीमुळे निर्माण झाली आहे. तर आता रवींद्र चव्हाण हे ही जागा लढवणार अशा पद्धतीची बातमी समोर आली आहे. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांच्यासारखा जर उमेदवार असेल तर निश्चित भाजपचाच खासदार या मतदारसंघात विजय होईल”, असा दावा भाजपचे माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे.
हेही वाचा >> “ठाकरे गटाचे 16 आमदार अपात्र होतील”, निकालाआधी शिंदेंच्या आमदाराचा दावा
त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशी रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील जागेसाठीची लढाई सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कारण हा दावा करून तेलींनी उदय सामंतांना पुन्हा एकदा डिवचले असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे. अशात आता शिंदे या तळकोकणात शिवसंकल्प मेळाव्याच्या निमित्ताने दौरा करत आहे. राणे-सामंत यांच्यात संघर्ष सुरू असताना शिंदेंची सभा होत आहे. त्यात ते काय भूमिका मांडणार यावरून भविष्यकाळातील निर्णयाचे संकेत मिळू शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT