Eknath Shinde : "...तर आपल्या सर्वांची पाठ बाळासाहेबांनी थोपटली असती", उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडाडले
Eknath Shinde: सर्वांनी भक्कम साथ दिली. त्यामुळेच सर्वसामान्य गरिब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. याची मला जाणीव आहे. जीवाला जीव देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा मी ऋणी आहे", असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बाळसाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेचा भव्य मेळावा

...म्हणून सर्वसामान्य गरिब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला

शिवसेना मेळाव्यात एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
DCM Eknath Shinde Speech Shivsena Melava : "आज बाळासाहेब असते, तर आपल्या सर्वांची पाठ त्यांनी थोपटवली असती. आज लाडक्या बहिणींनी माझाही सत्कार केला. खरं म्हणजे हा घरच्यांनी केलेला कौतुक सोहळा आहे. आपण किती झेंडे गाडून आलो, तरीसुद्धा घरी परतल्यावर आई उंबरठ्यावर भाकर तुकडा ओवाळून टाकते. दृष्ट काढते. जसं जीवाला समाधान वाटतो, एक आनंद वाटतो. तशाप्रकारचा आनंद माझ्या मनाला झालेला आहे. तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला. सर्वांनी भक्कम साथ दिली. त्यामुळेच सर्वसामान्य गरिब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला. याची मला जाणीव आहे. जीवाला जीव देणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा मी ऋणी आहे", असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात बोलत होते.
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात जे काम आपण सर्वांनी केलं. यासाठी मी इथे काम करत होतो. परंतु, माझ्यासोबत इथं सगळ्यांनी रात्रीचा दिवस केला. पायाला भिंगरी लावून आपण फिरलो. हे देखील मी माझं भाग्य समजतो. हा प्रचंड विजय मिळाला आहे. हा विजय दैदिप्यमान विजय आहे. हा ऐतिहासिक विजय आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कधीही असा विजय मिळाला नव्हता. त्यामुळे आता आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे. दुप्पट वेगानै चौपट काम याठिकाणी आपल्याला करावं लागेल. त्यासाठी हा एकनाथ शिंदे तुमच्यासाठी अहोरात्र काम करायला तयार आहे.
हे ही वाचा >> Big Breaking: 'एकटं लढण्याचा निर्णय घेतल्याशिवाय...', उद्धव ठाकरेंच्या घोषणेने प्रचंड मोठी खळबळ
हा एकनाथ शिंदे शिवसेनेचा भगवा असाच डौलाने आपल्या सर्वांच्या साथीने फडकवत ठेवेल, हा शब्द मी याठिकाणी देतो. शिवसेनेचा विचार आणि अस्मिता याच्याबरोबर कधीही तडजोड होणार नाही. बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कधीही प्रतारणा होणार नाही. हे देखील मी याठिकाणी सांगतो. शरीरातील रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या मायबाप जनतेचा हक्क आहे. तो पुढेही हक्क अबाधित राहील. असं मी वचन देतो. मी एक साधा कार्यकर्ता आहे. कालही कार्यकर्ता होतो. आजही कार्यकर्ता आहे. उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. खूर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधीच कासावीस झाला नाही. कधी होणारही नाही. आई-भवानीच्या साथीने सर्वांच्या सहकार्याने भरभरून मिळालं, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.