कुणाल कामराविरोधात आक्रमक, स्टुडिओ फोडला, शिंदेंच्या शिवसैनिकांकडून थेट 'ही' धमकी, "11 वाजता..."
Kunal Kamra Studio: ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका हिंदी गाण्याच्या चालीवर कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवत आपल्या कॉमेडीमधून निशाणा साधला. त्यानंतर आता शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

कुणाल कामराची एकनाथ शिंदेंवर 'ती' टीका

आक्रमक शिवसैनिकांनी थेट स्टुडिओ फोडला

नरेश म्हस्के, मिलिंद देवरा, संजय निरूपम काय म्हणाले?
Kunal Kamra Controversy : स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. कुणाल कामरा यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक कॉमेडीचा व्हिडीओ अपलोड केला आहे. यामध्ये त्यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टिप्पणी कुणाल यांनी केली आहे. हा व्हिडीओ समोर येताच शिवसैनिक संतप्त झाले आणि त्यांनी रविवारी मुंबईतील खार भागात असलेल्या स्टुडिओ आणि हॉटेल युनिकॉन्टिनेंटलची तोडफोड केली. हा व्हिडिओ इथेच शूट करण्यात आल्याचा दावा केला जातोय.
हे ही वाचा >> अखेर नागपूर शांत झालं; पोलिसांनी संपूर्ण कर्फ्यू हटवला, पण...
कुणाल कामराविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी फिर्याद दिली आहे. त्याचवेळी शिवसेना नेते राहुल कनाल यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान केल्याबद्दल कुणाल कामरा, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दिली. तसंच बीएनएसच्या योग्य कलमांखाली खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
वाद नेमका का झाला?
‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका हिंदी गाण्याच्या चालीवर कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवत आपल्या कॉमेडीमधून निशाणा साधला. तसंच ‘गद्दार’ म्हणूनही उल्लेख केला. कामरा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी शिवसेना कार्यकर्त्यांनी केली आहे.
हे ही वाचा >> रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची काय आहे कहाणी?, संभाजीराजेंच्या पत्राने खळबळ!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामरा यांनी शिंदे यांच्याविरोधात केलेल्या कॉमेडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पक्षाचे कार्यकर्ते हॉटेलच्या सभागृहात पोहोचले. जिथे इंडियाज गॉट लेटेंटचा आक्षेपार्ह भाग शूट केला गेला होता, तिथेच हा स्टुडीओ आहे. त्यावेळी रणवीर अलाहाबादिया, समय रैना, अपूर्व मखिजा आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिंदे गटाचा कामराला इशारा
शिवसेना खासदार मिलिंद देवरा यांनी X वर पोस्ट करत म्हटले की, 'एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली गेली. स्वत:च्या बळावर ऑटो चालकापासून भारतातील दुसऱ्या मोठ्या राज्याचा मुख्यमंत्री बनलेला नेता आहे. त्यांच्यावर केलेल्या टिप्पण्यांमध्ये वर्णभेदी अहंकार असल्याचं दिसतंय. शिवसेना कार्यकर्ते देशभर कुणाल कामराला शोधून काढतील असा इशारा शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी कामरा यांना दिला. तुम्हाला भारतातून पळवून लावू असंही त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. X वर पोस्ट करताना शिवसेना नेते संजय निरुपम यांनी लिहिलं, 'उद्या 11 वाजता कुणाल कामराची धुलाई करणार'
दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोमवारी रात्री स्टुडिओवर झालेला हल्ला भ्याडपणाचा असल्याचे म्हटले आहे.