Sanjay Raut: "दिल्लीत अमित शाहांचा उदय...", उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटील भेटीनंतर संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात उद्धव ठाकरे आणि भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट झाली. त्यानंतर संजय राऊत यांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

उद्धव ठाकरे-चंद्रकातदादा पाटील भेटीमुळे चर्चेला उधाण!

संजय राऊतांचा अमित शाहांवर निशाणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्या चर्चेला दिला पूर्णविराम
Sanjay Raut On Amit Shah : भाजप आमदार पराग अळवणी यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यात उद्धव ठाकरे आणि भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट झाली. या भेटीत ठाकरे गट शिवसेना आणि भाजपची युती होण्याबाबत चर्चा झाल्याचं समजते. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या चर्चेला पूर्णविराम लावला आहे. लग्नात भेटल्यामुळे युती होते किंवा पक्ष जवळ येतात, इतका भाबडा विचार कोणाच्या डोक्यात येऊ नये, असं फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले. परंतु, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रकांतदाद पाटील यांचे आभार मानले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
चंद्रकांत पाटील हे आमचे सर्वांचे मित्र आहेत. चंद्रकांतदादा शिवसेना-भाजप युतीचे पहिल्यापासून समर्थक राहिले आहेत. ते मला माहिती आहे. शिवसेना-भाजप युतीत जी जुनी पिढी होती, ज्यांनी आमच्यासारखं एकत्रित काम केलंय, त्याच्यात चंद्रकांतदादांसारखे नेते होते. कदाचित आता जे भाजपात हवशे, नवशे, गवशे बाहेरून आलेले आहेत. त्यांना 25 वर्षातल्या आमच्या युतीचं महत्त्व कळणार नाही. आता जे आले आहेत, त्यांचा ना भाजपशी संबंध..ना हिंदूत्वाशी संबंध..पण चंद्रकांतदादांच्या भावना या अनेकांच्या आहेत त्यांच्या पक्षात. कारण आम्ही एकत्रित 25 वर्ष अतिशय उत्तमरितीने काम केलं. नरेंद्र मोदी यांच्यासोबत आम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं. पण सगळ्यांना माहितीय दिल्लीत अमित शाहांचा उदय झाल्यावर शिवसेना-भाजपात वितुष्ट आलं. हे दुर्देवानं सांगावासं वाटतं.
हे ही वाचा >> Raj Thackeray : "अजित पवार ते हेमंत बिस्वा शर्मा... भाजपने ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच मंत्री केलं"
चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्या भावना व्यक्त केल्या आहेत, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. आम्ही महाविकास आघाडीत गेलो, त्याला कारण होतं भारतीय जनता पक्षातील काही लोकांचं हट्ट..25 वर्षांची आमची युती ज्या कारणासाठी तुटली, ती कारणं जर पाहिली तर ती भूमिका योग्य होती. आमचा पक्ष फोडल्यावर जे आम्ही मागत होतो, तो तुम्ही आमचा पक्ष फोडून एकनाथ शिंदेंना दिला. मुख्यमंत्रीपदाचा दावा आणि जो हक्क होता, तो तुम्ही एकनाथ शिंदेंना दिला. आमची जेव्हा मागणी होती, तेव्हा अमित शहांनी ती नाकारली. अमित शाहांनी ठरवून हे केलं. कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडायची होती. त्यांचे आर्थिक हितसंबंध या मुंबईत गुंतले होते. म्हणून त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडून संपवायची होती. आजही एकनाथ शिंदेंचा वापर ते त्यासाठीच करतायत.