महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी, शिवसेना-मनसेची होणार युती? एकनाथ शिंदे थेट राज ठाकरेंच्या घरी!
Shivsena-MNS: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन अचानक भेट घेतली. ज्यानंतर शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होईल अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आज (15 मार्च) रात्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुंबईतील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे काही महत्त्वाचे नेते आणि मंत्रीही सोबत आहेत. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या युतीच्या चर्चांना जोर आला असून, विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि मनसे यांची युतीच्या चर्चासाठीच ही भेट झाल्याचं आता बोललं जात आहे.
शिवसेना-मनसे यांची युती होणार?
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या या भेटीचं अधिकृत कारण ‘स्नेहभोजन’ असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी या भेटीत राजकीय चर्चा नक्कीच होईल. त्यामुळेच ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. मागील काही काळात शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांच्यातील जवळीक वाढताना दिसत आहे. विशेषतः 2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंचा प्रचारही केला होता.
हे ही वाचा>> अजितदादांच्या मुलाला क्लिन बोल्ड करणारी ऋतुजा पाटील आहे तरी कोण?, जय पवारांची कशी पडली विकेट?
या भेटीचा राजकीय अर्थ लावताना अनेक राजकीय तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे की, आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची ठरू शकते. या भेटीमुळे शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राजकीय वर्तुळातील चर्चा
एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, ही भेट शिवसेना (शिंदे गट) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीची नांदी असू शकते. यापूर्वी 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी राज ठाकरे यांनी मनसेतर्फे 20 विधानसभा जागांची मागणी केली होती, ज्यामध्ये मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) बहुतांश जागांचा समावेश होता. तसेच, राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत NDA ला बिनशर्त पाठिंबा दिला होता,
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीगाठी
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील भेटींचा इतिहास पाहिला तर, दोघांमध्ये यापूर्वी अनेकदा राजकीय चर्चा झाल्याचे दिसते. 2022 मध्ये गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट देऊन गणपतीचे दर्शन घेतले होते. तसेच, 2023 मध्ये टोल दरवाढीच्या मुद्द्यावर मनसेने आंदोलन केल्यानंतर राज ठाकरे यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. याशिवाय, 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी दोघांमध्ये अनेक भेटीगाठी झाल्या होत्या.
हे ही वाचा>> "मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची?" बँकांमधला खळखट्याक थांबणार, मनसैनिकांना काय आदेश?
या भेटीचा राजकीय अर्थ लावताना अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील ही भेट आगामी BMC निवडणुकीसाठी रणनीती आखण्याचा एक भाग असू शकते. मुंबई आणि ठाणे हे दोन्ही पक्षांचे गड मानले जातात, आणि या भागात प्रभाव वाढवण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, काही विश्लेषकांचे मत आहे की, ही भेट उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला कमकुवत करण्यासाठी असू शकते. जर आगामी काळात शिवसेना आणि मनसेची युती झाली तर त्याचा थेट फटका हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसू शकतो.
एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी घेतलेली भेट ही केवळ ‘स्नेहभोजन’ नसून, त्यामागे खोल राजकीय अर्थ दडला आहे, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी राजकीय समीकरणं उदयाला येण्याची शक्यता आहे.