Ajit Pawar आता धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?, अजितदादांनी केलं मोठं विधान
वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्याने आता धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी जोर धरत आहेत. याच मुद्द्यावर अजित पवारांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

धनंजय मुंडेंच्या राजीम्याबाबत अजित पवारांचं मोठं विधान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमका काय निर्णय घेणार?
मुंबई: संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आल्यापासून राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी विरोधकांनी मागणी लावून धरली आहे. अशातच आतापर्यंत धनंजय मुंडेंची पाठराखण करणाऱ्या अजित पवार यांनी मात्र आता एक मोठं विधान केलं आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहणार की जाणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
अजित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला त्याचवेळी त्यांना पत्रकारांकडून विचारण्यात आलं की, 'नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे राजीनामा देणार का?'
हे ही वाचा>> 'CM साहेब, माझ्या नवऱ्याने तुमच्या पक्षाचं प्रामाणिक काम केलं, आता तुम्हीच...', वाल्मिक कराडच्या पत्नीचं मोठं विधान
ज्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, 'जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा.. असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीने दोषींवर कारवाई करत आहेत.' असं विधान अजित पवारांनी केलं आहे.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंबाबत अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हापासून आम्ही सगळ्यांना ठरवलं होतं की, कोणाचीही हयगय करायची नाही. जे दोषी असतील, जे संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई करायची.'
'एक आहे की, महिना होऊन गेला संतोष देशमुखांचा भाऊ, पत्नी, मुलं हे चिंतेत आहेत की, पुढे काही होतंय की नाही. वास्तविक पोलीस यंत्रणा काम करत आहे. सीआयडी, एसआयटी काम करत आहे.'
हे ही वाचा>> Walmik Karad Wife: वाल्मिक कराडची पत्नी म्हणते, 'महिनाभर आम्ही मरणयातना भोगतोय...'
'न्यायालयीन चौकशीबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आहे. जे कोणी दोषी असतील त्यांना अजिबात थारा द्यायचा नाही. कारण निर्घृण हत्या आहे. हे महाराष्ट्रात कोणीच खपवून घेणार नाही. चौकशीच ज्यांच्याबाबत धागेदोरे सापडतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ही घटना अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आहे.'
'बीडमध्ये अतिशय चांगले एसपी पाठवले आहेत. त्यांना कोणताही राजकीय हस्तक्षेप न होऊ देता कायदा-सुव्यवस्था राखण्यास सांगण्यात आलं आहे.' असं अजित पवार यावेळी म्हणाले.
दरम्यान, याचवेळी त्यांना असंही विचारण्यात आलं की, नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे राजीनामा देणार का?
यावर अजित पवार म्हणाले की, 'जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा.. असं मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे आणि मुख्यमंत्री त्या पद्धतीने दोषींवर कारवाई करत आहेत.'
'मी इतकं स्पष्ट सांगतो, सगळ्या महाराष्ट्राला माझी मतं माहिती आहेत. मी कधीही माझ्या राजकीय जीवनाला सुरुवात केल्यापासून कधीही जाती-पातीचा, नात्या-गोत्याचा विचार केलेला नाही. महाराष्ट्र चांगला राहिला पाहिजे, कायदा-सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे, प्रत्येकाने आपआपली जबाबदारी नीटपणे पार पाडली पाहिजे.'
'आपल्या आजूबाजूला कोण आहेत, कसे वागतात.. कसे बोलतात. लोकांशी कसे संबंध ठेवतात. याचं पण भान आमच्यासहीत सगळ्यांनी त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. चुकीची माणसं असतील तर त्यांना बाजूला केलं पाहिजे.' असंही अजितदादा म्हणाले.