'लोकांचे बळी घेणाऱ्या धनंजय मुंडेंचं तुम्ही समर्थन करताय...', आव्हाड संतापले थेट नामदेव शास्त्रींना...
Jitendra Awhad vs Namdev Shastri: भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार पक्ष) नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला आहे.
ADVERTISEMENT

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाच्या घटनेमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या सगळ्यात धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध असणाऱ्या वाल्मिक कराडवर अनेक आरोप करण्यात आले आहेत. या घटनेचा मास्टरमाईंड हा कराड असल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यातच मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आमदार सुरेश धस आणि अंजली दमानिया आक्रमक झाल्या आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचे वाल्मिक कराडसोबत कसे आर्थिक संबंध आहेत हे समोर आणण्याचा प्रयत्न दमानिया यांनी केला. त्याचबरोबर मुंडे यांनी कसा ऑफिस ऑफ प्रॉफिटचा फायदा घेतला हे देखील दमानिया यांनी सांगितलं.
या सगळ्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एकीकडे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना मुंडेंनी भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली. त्याचबरोबर गड मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा असल्याचं देखील जाहीर केलं. या सगळ्यामुळे आता नवीन राजकारण रंगताना दिसत आहे.
हे ही वाचा>> धनंजय मुंडेंवरचा 'तो' प्रश्न अन् नामदेव शास्त्री मुंबई Tak च्या LIVE शोमधून उठून गेले!
नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्याने अनेकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. आमदार जितेंद्र आव्हाड यानी एक भली मोठी पोस्ट लिहीत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंडेंचं समर्थन करणं अत्यंत दुर्देवी असल्याचं आव्हाड म्हणाले, आव्हाड त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात,
जितेंद्र आव्हाडांची पोस्ट जशीच्या तशी...
डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धंनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरुन अश्या गुन्हेगारी वृत्तीचे समर्थन आणि पाठराखण होणे, ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. कधीकाळी आपण भगवानगड राजकारण्यापासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती? आणि आज निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्याचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या धंनजय मुंडे वाल्मिक कराड टोळीचे समर्थन करताय ही मनाला न पटणारी गोष्ट आहे.
हे ही वाचा>> नामदेव शास्त्रींना चिंता संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांच्या मानसिकतेची, म्हणाले अगोदर 'त्यांना' मारहाण...
शास्त्री महाराज आपल्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, पण आपण धनंजय मुडे वाल्मिक कराड टोळीची पाठराखण करणे हे भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे. धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारी आणि राक्षसी राजकीय महत्वकांक्षेसाठी उध्वस्त केलेल्या समाजातील लोकांची यादी देतोय, त्या सर्वांना आणि धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांना भगवान गडावर समाजाची परीषद बोलावून समोरासमोर बसून चर्चा घडवून आणा, म्हणजे धंनजय मुडे वाल्मिक कराड हे किती मोठे संत आहेत हे संपूर्ण जगाला कळेल.
ज्यांचे खून झालेत असे….
1) मयत संगीत डिघोळे परळी यांचे कुटुंब
2) मयत काकासाहेब गर्जे परळी यांचे कुटुंब
3) मयत महादेव मुंडे परळी यांचे कुटुंब
4) मयत बापु आंधळे परळी यांचे कुटुंब
5)मयत बंडु मुंडे परळी यांचे कुटुंब
ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले घडवून आणले आहेत असे..
1) महादेव गित्ते परळी
2) सहदेव सातभाई परळी
3) राजाभाऊ नेहरकर परळी
ज्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांचे आयुष्य उध्वस्त केले असे…
1) प्रा. शिवराज बांगर बीड
2) बबनभाऊ गित्ते परळी
3) रामकृष्ण बांगर, विजयसिंह बांगर पाटोदा
4) करूणा धंनजय मुंडे परळी
5) प्रकाश मुंडे नाथ्रा परळी
6) राजाभाऊ फड परळी
अशी खूप मोठी समाजातील लोकांची यादी आहे, (इतर समाजाची यादी जोडल्या ती फार मोठी होईल)
ज्यांना घेऊन मी आपल्याकडे येतो, यांच्या वेदना आणि त्यांना वेदना देणारा कोण आहे? हे आपण महंत म्हणून विचारणार का? धनंजय मुंडेच्या हाताला लावलेल्या सलाईनपेक्षा धंनजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यामुळे अनाथ झालेली लेकरे, विधवा झालेल्या बायका, आपल्या पोटच्या मुलांन गमावून सतत डोळ्यातून आसवे गाळणारे आई बाप, यांनी घडवून आणलेल्या हल्ल्याने कायम आधू झालेले लोक, यांनी खोट्या गुन्ह्यांत अडकवल्यानंतर तुरुंगात खितपत पडलेले किंवा रानोमाळ भटकंती करणारे लोक यांचे दुःख फार मोठे आहे.
महंत म्हणून आपण हे दुःख समजावून घेणार आहात का? सुदर्शन घुले, प्रतीक घुले, गोट्या गित्ते, धनराज फड, सुनिल फड, विष्णु चाटे, रघु फड, यांसारखे समाजातील शेकडो तरुण स्वताःच्या राजकीय फायद्यासाठी गुन्हेगार बनवलेत. त्यांच्या कुटुंबाची काय आवस्था आहे?
आता या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.