Mumbra : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात हायहोल्टेज ड्रामा, उद्धव ठाकरे स्वतः उतरले रस्त्यावर
शिवसेनेच्या शाखेवर शिंदे गटाने बुलडोजर चालवल्यामुळे आज शिवसेने विरुद्ध शिवसेना असा हायहोल्टेज ड्रामा बघायला मिळाला. या प्रकरणामुळे आता राज्यातील वातावरणही ढवळून निघाले आहे. शिंदे गटाकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याची टीका आता होऊ लागली आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray : राज्यात सत्तांतर झाल्यापासून अनेक मोठ मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. हे चालू असतानाच मुंबईतील मुंब्र्यात आज शिवसेनेच्या शाखा (Shivsena Branch) पाडली गेल्याने थेट उद्धव ठाकरेच रस्त्यावर उतरत शिंदे गटाला भिडले आहेत. त्यामुळे आजच्या या राजकीय घडामोडीमुळे जोरदार वादंग माजले. उद्धव ठाकरे यांनी थेट मुंब्रा गाठून त्यानंतर त्यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन शिंदे (CM Eknath shinde) गटावर जोरदार हल्लाबोल चढविला आहे.
मुंब्र्यातील शिवसेनेची शाखेवर बुलडोजर चढविल्यानंतर आक्रमक होत शिवसैनिकांनी जोरदार आवाज उठविला. त्यानंतर उद्धव ठाकरेही थेट मैदानात उतरत त्यांनी मुंब्रा गाठले.
शाखेवर बुलडोजर
मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर फिरवल्याचे लक्षात येताच उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी जात शिंदेंवर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट दिली मात्र पोलिसांनी त्यांना अडवत लांबूनच त्याची पाहणी करण्याची विनंती केली.
तुम्ही शाखेजवळ जाऊ नका
यावेळी उद्धव ठाकरेंना पोलीस अडवत होते की, तुम्ही शाखेजवळ जाऊ नका. त्यासाठी त्यांचा ताफा बराच वेळ रस्त्यात थांबवून ठेवला होता. पण नंतर स्वतः उद्धव ठाकरे हे रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी पोलिसांनी त्यांना असंही सुनावलं की, इथं काय चाललंय हे व अवघा महाराष्ट्र बघतो आहे. त्यामुळे तुम्ही हतबल झाला आहात हे दाखवू नका असंही मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
हे ही वाचा >> ‘आमचे पोस्टर फाडले ना, आता आम्ही तुमची मस्ती फाडतो…’ फक्त निवडणुका येऊ दे…’
सत्तेचा माज
उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका करताना म्हटले की, सत्तेचा माज आल्यामुळे अशी कामं या गद्दारांकडून केली जात आहेत. मात्र हे आता सगळा महाराष्ट्र पाहतो आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत याचे परिणाम भोगावे लागतील असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
आधी पोलीस बाजूला करा
उद्धव ठाकरे यांनी मुंब्र्यातील शाखा बुलडोजरने पाडण्यात आल्यावर थेट प्रशासनालाही त्यांनी आव्हान दिले आहे. यावेळी त्यांनी थेट आव्हान देत म्हटले आहे की, तुमच्यात हिम्मत असेल तर पोलीस बाजूला करुन तुम्ही भिडा अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेंचा समाचार घेतला आहे.
त्यांची जागा त्यांना दाखवा
उद्धव ठाकरे यांनी ही घटना घडल्यानंतर शिवसैनिकांशी संवाद साधत आगामी काळातील निवडणुकीत शिंदे गटाच्या उमेदवाराला त्यांची जागा दाखवू द्या असंही त्यांनी यावेळी आवाहन केले आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून ते अगदी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची गरज आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.