संसार अर्ध्यावरच मोडून गेला, 10 महिन्यातच तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला

मुंबई तक

28 Mar 2024 (अपडेटेड: 28 Mar 2024, 04:08 PM)

रस्ते अपघातात दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. असाच भीषण अपघात बीड जिल्ह्यात घडला आहे. जिथे एका नवविवाहीत तरूणीने लग्नाच्या 10 महिन्यानंतरच पतीला गमावलं आहे. या घटनेनंतर कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 

Mumbaitak
follow google news

रोहित हातागळे

हे वाचलं का?

Beed Accident News : धुमधडाक्यात लग्न झालं आणि नवीन संसाराला सुरुवात झाली. दोघांनीही आयुष्यभर एकमेकांची साथ न सोडण्याचे वचन दिले. पण, दहा महिन्यांतच तो संसार अर्ध्यावर मोडून निघून गेला. तिने बघितलेले सुखी संसाराचे स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले.  ही हृदयद्रावक, मन हेलावून टाकणारी घटना घडली बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात. (Beed Ambejogai Accident News Sushant Thakur Death in an accident by motorcycle near Satephal Fata he married before 10 months ago )

रस्ते अपघातात दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. असाच भीषण अपघात बीड जिल्ह्यात घडला आहे. जिथे एका नवविवाहीत तरूणीने लग्नाच्या 10 महिन्यानंतरच पतीला गमावलं आहे. या घटनेनंतर कुटुंबासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. 

अंबाजोगाई तालुक्यातील अंबासाखर कारखाना रोडवरील सातेफळ फाट्यानजीक मोटारसायकलची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना बुधवार (27 मार्च) रोजी सायंकाळी घडली आहे. या भयानक अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती आहे. सुशांत सुनील ठाकूर (वय 23) मु. पाटोदा, ता. अंबाजोगाई तर, बालाजी भुजबळ (वय 30), रा. जोडजवळा, जिल्हा लातूर, असं अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. तसंच, शिवहर भुजबळ हे जखमी झाले आहेत.

अंबासाखर कारखाना ते देवळा रोडवर असलेल्या सातेफळ फाट्यानजीक मोटारसायकल क्रमांक MH 11CU2758 आणि MH24BS9183 यांचा समोरासमोर अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की दोन्ही मोटारसायकलचा हेडलाईटच्या भागाचे अक्षरशः टुकडे टुकडे झाले होते. अपघाताची माहिती समजताच परिसरातील कुंबेफळ,सातेफळ, ममदापुर, पाटोदा येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

यादरम्यान अपघातातील दोघे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला आहे. 

लग्न होऊन केवळ 10 महिने उलटले असताना सुशांतचा अपघातात मृत्यू 

अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा हे सुशांत ठाकूर याचे आजोळ असून तो चनई येथील रहिवासी आहे. सुशांत याचे में 2023 रोजी ममदापुर येथील मुलीसोबत लग्न झालेलं आहे. लग्नाला केवळ 10 महिने झाले असून कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुशांत ठाकूर हा त्याच्या मोटारसायकलवर बसून अंबाजोगाईकडे जात होता याच दरम्यान बालाजी भुजबळ व शिवहर भुजबळ हे अंबाजोगाईहुन त्यांच्या जोडजवळा या गावी जात असताना सातेफळ फाट्यावर त्यांचा हा भीषण अपघात झाला.

    follow whatsapp