सगळ्याच चोरांचे आडनाव मोदी कसे? या एका विधानामुळे काँग्रेसचे नेते (Congress Leader) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना खासदारकी गमवावी लागली. मोदी समुदायाची अवमान केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा दिली, तर दुसरीकडे भाजपने (Bjp) राहुल गांधींवर ओबीसींचा (OBC) अपमान केल्याचा आरोप केला. नीरव मोदी (Nirav Modi), ललित मोदी (Lalit Modi) यांची नाव घेत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका केली होती. त्यामुळे नीरव मोदी, ललित मोदी नेमके कोणत्या समुदायातील आहेत? ते ओबीसी आहेत का? नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी एकाच समुदायातील आहेत का? हे आणि याच्याशी संबंधित अनेक प्रश्नांनी डोकं वर काढलं आहे. याच प्रश्नांची उत्तर काय आहेत, हे जाणून घेऊयात…
ADVERTISEMENT
राहुल गांधींनी नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी यांचं नाव घेत टीका केली. राहुल गांधींच्या विधानाने नीरव मोदी, ललित मोदी आणि नरेंद्र मोदी एका समाजातून येतात का? हा प्रश्न चर्चिला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोध घांची तेली समुदायाचे आहेत. घांची हे गुजराती नाव असून हिंदीमध्ये त्यांना तेली असं संबोधलं जातं.
हेही वाचा – सावरकरांवरुन राजकारण तापलं; ठाकरेंकडून काँग्रेसच्या ‘डिनर’वर बहिष्कार
मोध घांची (तेली) समुदायाचे लोक साधारणतः गुजरात, राजस्थानच्या काही भागात वास्तव्याला आहेत. घांची म्हणजे तेल घाणीचा व्यवसाय करणारे, तेलबियांपासून तेल काढणारा समाज… तसं पाहायला गेलं तर घांची तेली हा समाज आधी इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट नव्हता. पण, 1953-55 च्या पहिल्या मागासवर्गीय आयोगानं म्हणजे काका कालेलकर आयोगानं या घांची समुदायाचा गुजरात राज्यात मागासवर्गीयांमध्ये समावेश केला.
मोदी हे आडनाव कुठून आले?
त्यानंतर कालांतरानं केंद्रातही या जातीला ओबीसीचा दर्जा मिळाला. पण, मोदी हे आडनाव आलं कुठून? तर याबद्दल जेएनयूचे निवृत्त प्राध्यापक आणि सोशल रिसर्चरच्या हवाल्याने द प्रिंटने एक वृत्त दिलेलं आहे. त्यात म्हटलं आहे की, ‘मोदी ही एक भटकी जमात असून 15-16 व्या दशकात उत्तरेतून गुजरातमध्ये स्थायिक झाली. त्यानंतर तेलबियांपासून तेल काढण्याचा म्हणजेच तेल घाणीचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे त्यांना तेली घांची समाज असं नाव पडलं. यामध्ये दोन वर्ग करण्यात आले आहेत, एक मोध वानिक आणि दुसरी बनिया.”
नीरव मोदी, ललित मोदी ओबीसी आहेत का?
राहुल गांधींच्या विधानामुळे ओबीसी समाजाचा अपमान झाला, असं भाजपचा आरोप आहे. पंतप्रधान मोदी ओबीसी समाजाचे आहेत, पण नीरव मोदी आणि ललित मोदी हे ओबीसी समाजाचे आहेत का? तर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी देखील दावा केलाय की, नीरव मोदी, ललित मोदी हे ओबीसी नाहीत. तसेच DNA India ने 2017 मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखानुसार, ललित मोदीचे पूर्वज राजस्थानच्या शेखावती भागातून येतात. ललित मोदी हे मारवाडी असल्याचं या लेखामध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा – लोकसभेतल्या किती खासदारांचे आहेत क्रिमिनल रेकॉर्ड? हत्या, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे कितींवर?
दुसरीकडे नीरव मोदी नेमके कोणत्या समुदायाचे आहेत? तर इंडिया टुडेच्या एका 2018 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखातील माहितीनुसार, नीरव मोदीचा जन्म हिरे व्यापाऱ्यांच्या कुटुंबात मुंबईत झाला. पण, नीरव मोदीचे वडील दीपक मोदी हे मूळचे गुजरातमधले पालनपुरी जैन समुदायाचे होते.
राहुल गांधींच्या विधानामुळे ओबीसींचा अपमान झाला असं भाजपचं म्हणणं आहे. पण, सगळे मोदी खरंच ओबीसी आहेत का? याबद्दल काय दावे-प्रतिदावे करण्यात आले? हेच सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता.
ADVERTISEMENT