Supriya Sule On Ajit Pawar Revolt : “मला या सगळ्याचं आश्रर्य वाटले नाही, पण धक्का बसला. कारण शरद पवार यांना अंधारात ठेवून हे सगळं केलं गेलं. आपल्या सुख-दुःखात जो उभा राहिलेला आहे, त्याला सांगायला हवे होते”, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली. याचवेळी त्यांनी प्रफुल पटेलांनी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष केलेली नियुक्ती चुकीचे असल्याचे सांगितलं.
ADVERTISEMENT
लोकमत दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी पक्षात झालेल्या बंडानंतर त्यांची भूमिका मांडली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गेलेले आमदार परतही येत आहेत. शरद पवार आमदारांच्या आणि त्यांच्या मतदारसंघातील लोकांच्या मनात आहेत. आता जे झालं ते स्वीकारून पुढे जायचं आहे. पक्षाची पुन्हा बांधणी करायची आहे.”
वाचा >> “अजित पवारांचं बंड शरद पवारांना कळलं होतं एक दिवस आधीच”, बंडाची Inside Story
“सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्ष करण्याचा अधिकार नाही”
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पक्षाच्या घटनेनुसार अध्यक्ष या नात्याने शरद पवारांना सगळे अधिकार आहेत. तसेच प्रदेशाध्यक्ष नियुक्त करण्याचा अधिकार प्रफुल पटेल यांना नाही. महाराष्ट्राची प्रभारी म्हणून मला तो अधिकार आहे. पण, ही नियुक्ती करतानाही मला अध्यक्षांची म्हणजेच शरद पवारांची परवानगी घेणे बंधनकारक आहे.”
वाचा >> Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट, फायदा होणार काँग्रेसला
“प्रफुल पटेल यांना अधिकार नाहीत, दुसरे म्हणजे अजित पवार सांगताहेत की, शरद पवार आमचे अध्यक्ष आहेत. मग शरद पवारांची परवानगी घेतली का?”, असा सवाल उलट सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना केलेला आहे.
अजित पवारांच्या बंडाची कल्पना होती का? सुप्रिया म्हणाल्या…
2 जुलै रोजी अजित पवारांच्या घरी आमदारांची बैठक बोलवली गेली होती. त्या बैठकीवेळी सुप्रिया सुळेही तिथे गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना याची कल्पना होती, असंही बोललं गेलं. त्यावर खुलासा करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी दोन तास देवगिरी बंगल्यावर अजित पवारांबरोबर होते. तेव्हा तिथे आमदार येत होते. प्रदेशाध्यक्षपदासाठी हे सुरू आहे, असं तेव्हा वाटले. मी निघून गेल्यानंतर ते सगळे राजभवनवर गेले आणि तेव्हा मला याची कल्पना आली”, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT