Manoj Jarange Patil : राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवले आहे. या अधिवेशनाला सुरूवात होण्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सगेसोयरे शब्दाचा उल्लेख करत ही तुम्हाला शेवटची संधी आहे, नाहीतर पश्चाताप करावा लागेल, असा इशारा जरांगेंनी शिंदे सरकारला दिला आहे.
ADVERTISEMENT
अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी अधिवेशनाआधी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, "या विशेष अधिवेशनात सरकारने सगेसोयरेची जी अधिसूचना काढली त्याची अंमलबजावणी सुरूवातीलाच करावी. नंतर मागासवर्ग आयोगाने जो अहवाल दिला आहे, त्याचा कायदा करण्यासाठी तो विषय दुसऱ्या सत्रात चर्चेला घ्यावा. कारण हे आंदोलन मराठ्यांना कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून उभं केलेलं आहे."
मराठा आमदारांना आवाहन
"ज्या नोंदी सापडल्या त्या आधारावर ज्यांच्या नोंदी सापडलेल्या नाहीत, त्यांना आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेची अधिसूचना काढलेली आहे. त्यासाठी सरकारने विशेष अधिवेशनात आधी सगेसोयरेची अंमलबजावणी करावी. महाराष्ट्रातील सर्व मराठा आमदार आणि मंत्र्यांनी हा विषय लावून धरावा", असे आवाहन जरांगे यांनी आमदारांना केली आहे.
"मराठ्यांची मागणी वेगळी करताय दुसरं, जर असं केलं तर तुम्ही मराठ्यांचे विरोधी आहात हे गृहित धरलं जाईल. तुम्ही अधिवेशन बोलवलंय. करोडो मराठ्यांची मागणी आहे की, आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या", असे खडेबोल जरांगेंनी शिंदे सरकारला सुनावले.
"सगेसोयरेचा विषय तातडीने घ्या आणि अंमलबजावणी तातडीने घ्या, नाहीतर भयंकर आंदोलन असेल. सगेसोयरेवर चर्चा केली नाही, तर राज्यात प्रचंड मोठं आंदोलन उभं करणार आहे. २१ फेब्रुवारीलाच घोषणा करणार", असा इशारा मनोज जरांगेंनी दिला.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, "सामान्य मराठ्यांची मागणी ही ओबीसीतून आरक्षणाचीच आहे. शंभर दीडशे जणांनाच स्वतंत्र मराठा आरक्षण हवं आहे. त्यांनाच इतर मराठ्यांचं वाटोळ करायचं आहे. तुम्हाला तीन लोक महत्त्वाचे की पाच-सहा कोटी मराठे महत्त्वाचे?"
"ही तुम्हाला शेवटची संधी आहे. तुम्ही सगेसोयरेचा मुद्दा अधिवेशनात घेऊ नका आणि अंमलबजावणी करू नका, मग पश्चाताप शब्दाची अशी व्याख्या करावी लागेल की, दिलं असतं तर बरं झालं असतं लय पश्चाताप आला आता. व्याख्याच बदलावी लागेल", असा गर्भित इशारा जरांगे पाटलांनी शिंदे सरकारला दिला.
मनोज जरांगेंच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
- "कोणी शिष्टंमंडळ भेटायला आलं नाही. जो तो ज्याच्या त्याच्या सोयीने येतात. जनता किती त्रासातून चालली आहे याच्याशी त्यांना घेणं देणं नाही."
- "सगेसोयरेचा कायदा झाला नाहीतर सरकारला पश्र्चाताप होईल असं आंदोलन करू."
- "मराठे आम्हीच आणि कुणबी आम्हीच आणि शेतकरी आम्हीच आहोत"
- "जिथे विविध मागण्यांची चर्चा आहे तिथे सगेसोयरे बाबत चर्चा होवू शकते तिथे आम्हाला आशा आहे."
- "करोडो समाज म्हणतोय ओबीसी मधून आरक्षण द्या आणि ते शे दोनशे लोकांसाठी कायदा करत आहेत."
- "सरकार कोणाचंही असो दिल्या नंतर जनता खुश व्हायला हवी परंतु जनता नाराज का होतीय? तुमच्यावर नाराजी वाढत चालली आहे. तुम्ही जीआर काढता पण अंमलबाजवली करत नाहीत."
- "मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, पण विश्वास टिकवण्यासाठी या सोबत सगेसोयरेचा विषय घेणं त्यांची जबाबदारी."
- "न्यायाधीश, मंत्री आणि सचिवांनी सगेसोयरे शब्द घेतले आहेत."
- "मराठा समाजाने वेळ दिला, पण आता कळेल मराठे कसे आहेत. सरकारला शेवटची विनंती सुरुवातीला सगेसोयरे चा विषय घ्यावा."
ADVERTISEMENT