इंदूर : मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये (Indore) रामनवमीच्या दिवशी एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील बेलेश्वर मंदिरात रामनवमीचा मोठा उत्सव सुरू होता. त्यावेळी अचानक मंदीर परिसरात 10 वर्षांपूर्वी मुजवलेल्या विहिरीचं छत कोसळलं, यात सुमारे 20-25 जण विहिरीत पडले असल्याचं सांगण्यात येत आहे. यापैकी आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 9 जण अजूनही अडकले आहेत, त्यांना वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. (A big accident took place on Ram Navami in Indore, Madhya Pradesh.)
ADVERTISEMENT
याबाबत बोलताना मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (CM Shivraj Singh Chouhan) यांनी सांगितले की, आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर 9 जण अजूनही अडकले आहेत. त्यांनाही वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. बाहेर काढलेल्या लोकांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. सरकार आणि प्रशासन सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. इंदूरचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना फोन करून बचाव कार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालय सतत इंदूर जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगरात दगडफेक, जाळपोळ; पोलिसांकडून हवेत गोळीबार
नेमकं काय घडलं?
रामनवमीला बेलेश्वर मंदिरात हवन सुरु होता. यासाठी लोकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती दर्शविली होती. या मंदिरात एक जुनी आणि 10 वर्षांपूर्वी छत टाकून मुजवलेली विहीर होती, पूजेच्या वेळी 20-25 लोक विहिरीच्या छतावर उभे होते, तेव्हा अतिवजनानं अचानक हे छत खाली कोसळलं. त्यात सुमारे 20-25 जण विहिरीत पडले. ही विहीर 50 फूट खोल असल्याचे सांगण्यात येत आहे. इंदूर जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. मात्र, विहिरीत पाणी असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहेत. लोकांना मंदिराजवळ जाण्यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
हेही वाचा : छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : रात्री बारा ते दुपारी बारा, काय-काय घडलं?
इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांनी सांगितले की, संख्या सांगणे कठीण आहे. 10 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. विहिरीत पडलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याला आमचं प्राधान्य आहे. बचाव पथक, पोलीस आणि स्थानिक अडकलेल्यांना बाहेर काढण्यास मदत करत आहेत. ज्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. रेस्क्यू टीम दोरी लावून लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे, संपूर्ण जिल्हा प्रशासन तेथे पोहोचले आहे.
ADVERTISEMENT