-योगेश पांडे (नागपूर), धनंजय साबळे (अमरावती)
ADVERTISEMENT
अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. पाण्याच्या प्रश्नाकडे सरकारचं लक्ष्य वेधण्यासाठी आमदार देशमुख यांनी संघर्ष यात्रा काढली. मात्र, पोलिसांनी देशमुखांसह 700 पेक्षा अधिक लोकांना वडधामणा गावातच रोखलं. 10 एप्रिल रोजी ही पदयात्रा सुरू झाली होती. 69 गावांच्या पाणीप्रश्नावरून देशमुख नागरिकांना घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील घरी जाणार होते. ((mla nitin deshmukh arrested by nagpur police))
आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघातील पाणीप्रश्न संघर्ष पदयात्रेच्या निमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. 10 एप्रिल रोजी बाळापूरचे आमदार नितीन देशमुखांची पदयात्रा सुरू केली. ही पदयात्रा आता नागपूरच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचली होती. नागपूर पोलिसांनी वडधामणा गावातच ती थांबवली. पोलिसांनी आमदार नितीन देशमुखांसह 700 वर लोकांना वडधामणा गावातच स्थानबद्ध केलं. वडधामणा गावात पदयात्रेचा मुक्काम होता, त्या पार्श्वभूमीवर रात्रीपासूनच नागपूर पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला होता.
संघर्ष पदयात्रा कशासाठी?
बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला-अमरावतीच्या खारपट्ट्यातील पाणी प्रश्नाचा मुद्दा लावून धरला आहे. या भागातील 69 गावातील नागरिकांना खार पाणी मिळत आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, असं आमदार नितीन देशमुखांचं म्हणणं आहे.
हेही वाचा >> आप्पासाहेब धर्माधिकारींच्या ‘श्री समर्थ बैठकी’त नेमकी काय मिळते शिकवण?
हा प्रश्न शासनाने सोडवावा म्हणून आमदार नितीन देशमुख यांनी 10 एप्रिल रोजी संघर्ष पदयात्रा सुरू केली. त्यांच्या या यात्रेत पाणी समस्या भेडसावणाऱ्या गावातील नागरिकही सहभागी झाले आहेत. “69 गावातील लोक जे पाणी पितात, तेच पाणी आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देऊ. त्यांना त्याच पाण्याने अंघोळ करायला लावू, त्यानंतरच त्यांना आमच्या वेदना कळतील”, असं नितीन देशमुखांनी पदयात्रा सुरू करताना म्हटलं होतं.
नागपूर पोलिसांची नितीन देशमुखांना नोटीस
10 एप्रिल रोजी निघालेल्या या यात्रेला दहा दिवस झाले आहेत. शुक्रवारी म्हणजे 21 एप्रिल रोजी ही यात्रा नागपूरमधील देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर धडकणार होती. मात्र, नागपूर पोलिसांनी नितीन देशमुख यांना परवानगी नाकारली. या प्रकरणात नागपूर पोलिसांनी बुधवारी (19 एप्रिल) आमदार देशमुखांना नोटीस बजावली होती.
आमदार नितीन देशमुखांसह पदयात्रेतील लोकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
दरम्यान, बुधवारी संघर्ष पदयात्रा नागपूरच्या वेशीवर असलेल्या वडधामणा येथे पोहोचली. त्यानंतर पोलीस या गावात दाखल झाले. देशमुखांची यात्रा थांबवण्याचे प्रयत्न झाले. मात्र, देशमुख आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी गुरुवारी (20 एप्रिल) सकाळी कार्यकर्त्यांसह त्यांना अटक केली. त्यांना पोलीस पुन्हा अमरावतीकडे घेऊन गेले आहेत.
हे बघितलं का >> Exclusive: शरद पवारांनी संजय राऊतांना कोणती महत्वाची माहिती दिली? मुंबई TAKसोबत बोलताना सांगितलं…
हा अतिरेकीपणा… आम्ही मोदींच्या घरी जाऊ -नितीन देशमुख
पोलीस ताब्यात घेत असताना आमदार नितीन देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “हा यांचा अतिरेकीपणा सुरू आहे. सर्व कार्यकर्त्यांना याची मारहाण सुरू आहे. पाण्यासाठी कार्यकर्त्यांना मारहाण सुरू आहे. हे आंदोलन आम्ही नरेंद्र मोदींच्या घरी जाऊ पाणी घेऊन. पोलिसांवर गृहमंत्र्यांचा दबाव आहे.”
पाणी-पाणी आक्रोश केला म्हणून अटक -संजय राऊत
“पाणी प्रश्नावर अकोला ते नागपूर यात्रा काढणाऱ्या आमदार नितीन देशमुखना अटक झाली. नागपूरचा हद्दीबाहेर पोलिसांनी रोखले. खारघर येथे श्रीसेवक पाण्याशिवाय तडफडून मारले. आता विदर्भात पाणी पाणी आक्रोश केला म्हणून अटका केल्या. महाराष्ट्र जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरु लागले”, असं संजय राऊतांनी यांनी ट्विट करून सांगितलं आहे.
ADVERTISEMENT