Pune Crime News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात सहावी आलेल्या आणि परिक्षेत्र वनअधिकारी म्हणून निवड झालेल्या एका तरुणीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. दर्शना दत्ता पवार (वय 26) असं या तरुणीचे नाव असून, पुणे जिल्ह्यातील राजगड पायथा येथील सतीचा माळ या ठिकाणी दर्शनाचा मृतदेह आढळून आला. ती एका मित्रासोबत फिरायला गेली होती अशी माहिती समोर आली असून, मित्रही बेपत्ता आहे. त्यामुळे नेमकं काय घडलं, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे.
ADVERTISEMENT
पुणे जिल्ह्यातील वेल्हा पोलीस ठाणे हद्दीत दर्शना पवार हिचा मृतदेह आढळून आला. ज्या ठिकाणी मृतदेह आढळून आला, त्या ठिकाणी मोबाईल, पर्स, बूट आणि ओढणीही आढळून आली. मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला असून, पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
दर्शना पवार मूळची अहमदनगर जिल्ह्यातील
वेल्हा पोलीस ठाण्यात याप्रकरणी संशयास्पद मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुणे ग्रामीणचे अतिरिक्त पोलीस अधिकारी मितेश गट्टे यांनी सांगितले की, दर्शना मूळची अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील आहे. मागील काही वर्षांपासून ती एमपीएससी परीक्षेची तयारी करत होती.
हेही वाचा >> सरस्वती वैद्यच्या हत्येचं गूढ उकललं, ‘या’ पदार्थात कीटकनाशक मिसळून हत्या
काही दिवस दर्शनाने पुण्यात क्लासेस लावले होते. त्यानंतर ती पुन्हा गावी गेली होती आणि घरीच अभ्यास करायची. दरम्यान, अलीकडेच ती एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली आणि परिक्षेत्र वनअधिकारी म्हणून तिची निवड झाली होती.
सत्कारासाठी दर्शना पवार आली होती पुण्यात
दरम्यान, परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्यात एका अकॅडमीकडून सत्काराचे आयोजन करणयात आले होते. त्यासाठी 9 जून रोजी ती पुण्यात आली होती. पुण्यातील कात्रज परिसरात नऱ्हे गावात दर्शना तिच्या मित्राकडे राहायला होती.
12 जून रोजी दर्शनाने तिच्या मैत्रिणीला सांगितलं की, ती ट्रेकिंगसाठी सिंहगड किल्ल्यावर जात आहे. दर्शनाने याबद्दल तिच्या कुटुंबीयांनाही सांगितलं होतं. ती तिच्या मित्रासोबत ट्रेकिंगला गेली होती.
फोन स्वीच ऑफ आणि नंतर मृतदेहच सापडला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 12 जून रोजी दर्शना पवारचा मोबाईल स्वीच ऑफ झाला. मोबाईल स्वीच ऑफ झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. तीन दिवस शोधाशोध करूनही दर्शना न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी सिंहगड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
हेही वाचा >> “हिटलर असाच माजला होता”, उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींना दिलं चॅलेंज
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी शोध सुरू केला. दरम्यान, रविवारी राजगड किल्ल्याजवळील सतीचा माळ या ठिकाणी दर्शना पवारचा मृतदेह सापडला. वेल्हा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आणि तिच्या कुटुंबीयांना ओळख पटवण्यााठी कळवले होते. ओळख पटल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवण्यात आला. दर्शनाच्या मृतदेहाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडलेले होते.
दर्शनासोबत गेलेला मित्रही बेपत्ता
दरम्यान, ज्या मित्रासोबत दर्शना पवार ट्रेकिंगला गेली होती, तोही बेपत्ता आहे. पोलिसांनी त्याचाही शोध सुरू केला आहे. दर्शनाची हत्या झाली की, त्यांच्यासोबत काही विपरित घडले, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सिंहगड रोड, वारजे आणि ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
ADVERTISEMENT