Holiday for schools and colleges Due to Rain: मुंबई: मुंबईसह आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. ठाणे, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील धरणक्षेत्रात तुफान पाऊस बरसत असल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसंच उद्या (26 जुलै) देखील हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने आता अनेक जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पाहा कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
पुणे शहरातील सर्व शाळांना व पुणे जिल्हयातील अतिवृष्टी होत असलेल्या तालुक्यातील शाळांना उद्या दि. २६ जुलै २०२४ रोजी सुट्टी असल्याचे आजच आदेश निर्गमीत करावेत व त्या आदेशाला प्रशासनामार्फत व शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सर्वांना कळविण्यात यावे असे पत्र उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटीला यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील आदेश काढले.
हे ही वाचा>> Mumbai Rain: मुंबईत पुन्हा 26 जुलै?, पावसाचा LIVE Video पाहून भरेल धडकी!
पुणे शहर व परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवल्यामुळे उद्या, शुक्रवारी (26 जुलै 2024) पुणे शहर व पिंपरी चिंचवड भागासह भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर, खेड, आंबेगाव, जुन्नर घाट येथील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी काढले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, दोन दिवस शाळांना सुट्टी
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथील पूरस्थिती ही गंभीर झाली आहे. यामुळेच जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे. 26 व 27 जुलै अशा दोन दिवसांची ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
हे ही वाचा>> Mahabaleshwar: महाबळेश्वरला जाताय?, 'ही' बातमी वाचा अन् तुम्हीच काय ते ठरवा!
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्या संदर्भात आदेश काढले आहेत. मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे काम करण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
IMD यांनी मुंबई, मुंबई उपनगर, रत्नागिरी, पालघर, ठाणे या जिल्ह्यात पुढील 24 तासाकरिता अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अशोक शिनगारे यांनी उद्या शुक्रवार, दि.26 जुलै 2024 रोजी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
मुंबईतील शाळा-महाविद्यालयांबाबत कोणतेही आदेश नाहीत
दरम्यान, मागील काही तासापासून मुंबईतही मुसळधार पाऊस बरसत आहे. पण आता काही वेळापासून पावसाने उसंत घेतली आहे. त्यामुळेच मुंबईतील शाळांना सुट्टी असणार की नाही याबाबत अद्याप तरी महापालिकेने कोणतेही आदेश काढलेले नाहीत.
ADVERTISEMENT
