‘उद्धव ठाकरे-आरती सिंग कनेक्शन ते महिन्याला ७ कोटींची वसुली’; रवी राणांचा आरोप काय?

मुंबई तक

• 07:12 AM • 13 Sep 2022

उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य (नवनीत राणा आणि रवी राणा) यांच्या गेल्या काही महिन्यांपासून राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. हनुमान चालीसा पठण प्रकरणावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुखांवर गंभीर आरोप केला आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग या उद्धव ठाकरेंना वसुली करून […]

Mumbaitak
follow google news

उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य (नवनीत राणा आणि रवी राणा) यांच्या गेल्या काही महिन्यांपासून राजकीय संघर्ष उफाळून आला आहे. हनुमान चालीसा पठण प्रकरणावरून उद्धव ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुखांवर गंभीर आरोप केला आहे. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग या उद्धव ठाकरेंना वसुली करून पैसे पाठवायच्या असा खळबळजनक दावा राणांनी केला आहे.

हे वाचलं का?

नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यासह उद्धव ठाकरेंनाही लक्ष्य केलं.

गेल्या काही दिवसांपासून नवनीत राणा आणि रवी राणा यांनी लव्ह जिहादच्या मुद्दा उचलून धरलाय. यातील पहिलंच प्रकरण नवनीत राणा यांच्यावर बुमरँग झाल्याचं बोललं जात असून, घरातून निघून गेलेल्या मुलीसह पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलाच्या कुटुंबियांनी नवनीत राणांवर आरोप केले.

कथित लव्ह जिहाद प्रकरणात खासदार नवनीत राणा अडकणार?; पोलिसांनी दाखल केला गुन्हा

या प्रकरणात नवनीत राणा यांच्यावर अमरावतीतील राजापेठ पोलीस ठाण्यात आणि नागपूरमध्येही गुन्हा दाखल झाला आहे. अमरावतीत दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर आणि मनपा आयुक्तांवरील शाईफेक प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आल्याच्या मुद्द्यावर रवी राणा आणि नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंवरच आरोप केले.

रवी राणा यांनी उद्धव ठाकरे आणि आरती सिंग यांच्यावर काय आरोप केले आहेत?

मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर जितके गुन्हे दाखल करता येईल, तितके करा, असा एकसुत्री कार्यक्रम दिला होता. कशा प्रकारे कारवाई करता येईल, असे निर्देश उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना दिले होते, असा दावा रवी राणांनी केला आहे.

पुढे बोलताना आमदार रवी राणा म्हणाले, “अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी आमच्यावर पोक्सो सारखा गुन्हा दाखल केला. तक्रारदाराला बोलावून घेऊन एका प्राचार्यावरही पोक्सोसारखा गुन्हा दाखल केला. तक्रारदाराला तक्रार देण्यासाठी उद्युक्त केलं”

ज्यांचा वध करायचा होता, तो केला आणि घरी बसवलं; नवनीत राणा उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाल्या?

“मी दिल्लीत असताना मनपा आयुक्तांवर शाईफेक झाली. त्या प्रकरणात माझ्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्री काढला. त्यावेळी माझ्या कुटुंबियांना दोन दिवस नजरकैद केलं होतं”, असा आरोप रवी राणांनी केला आहे.

आरती सिंग अडीच वर्षांपासून महिन्याला ७ कोटींची वसुली करायच्या; राणांचा गंभीर आरोप

रवी राणांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांच्यावर वसुली केल्याचाही आरोप केलाय. “उद्धव ठाकरे यांना खुश करण्यासाठी पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी अमरावती शहरात वसुली पथक नेमलं होतं. वसुली पथकाच्या माध्यमातून अमरावतीत अनेक गुन्हे झाले. दंगे झाले. आरती सिंग यांनी महिन्याला ७ कोटींची वसुली अडीच वर्षांपासून केली. ते उद्धव ठाकरेंना पोहोचवण्याचं काम केलं आहे. याचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे”, असं राणा म्हणाले.

    follow whatsapp