Narayan Surve: आधी TV चोरला नंतर परत आणला, कवी नारायण सुर्वेंच्या घरी चोरी करणाऱ्या सुशिक्षित चोराची 'ही' चिठ्ठी पाहाच!

मुंबई तक

16 Jul 2024 (अपडेटेड: 16 Jul 2024, 12:18 PM)

Theft at Poet Narayan Surve house: कवी नारायण सुर्वेंच्या घरात आधी चोरी केली. पण जेव्हा चोराला हे समजलं की, ते घर हे नामवंत कवीचं आहे तेव्हा त्याने चक्क चोरी केलेल्या वस्तू पुन्हा त्यांच्या घरी आणून ठेवल्या.

नारायण सुर्वेंच्या घरी चोरी करणारा हा चोर आहे तरी कोण?

नारायण सुर्वेंच्या घरी चोरी करणारा हा चोर आहे तरी कोण?

follow google news

कामगार आहे मी, तळपती तलवार आहे
सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे,

हे वाचलं का?

या कवितेच्या ओळी म्हटलं की, सगळ्यात आधी जे नाव समोर येतं ते म्हणजे कविवर्य पद्मश्री नारायण सुर्वे... सारस्वतांनो! थोडासा गुन्हा करणार आहे... अशी प्रांजळ कबुली देणारे नारायण सुर्वे हे आजही महाराष्ट्राच्या मनामनात आहे. पण याच कवीच्या घरी चोरी करणारा एक चोर आज त्याच्या आगळ्यावेगळ्या कबुली जबाबमुळे चर्चेत आला आहे. (a thief who burglar the house of late poet narayan surve brought back the stolen items thief also brought a emotional note along with it)

नारायण सुर्वे हे मराठी साहित्य विश्वातील एक मोठं नाव आहे. कामगारांची व्यथा अन् त्याच्या जगण्याची गाथा जेव्हा कवी सुर्वे त्यांच्या कवितेतून जगापुढे मांडतात तेव्हा त्यांच्या याच कविता थेट वाचकाच्या काजळाला हात घालतात. पण अशा दिग्गज कवीच्या घरी जेव्हा एका चोरानं चोरी केली त्यानंतर जे काही घडलं ते सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारं आहे. 

नेमकं प्रकरण काय... 

त्याचं झालं असं की, एका चोराने काही दिवसांपूर्वी नारायण सुर्वे यांच्या नेरळमधील घरातून काही मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या. पण या चोराला जेव्हा हे कळलं की, आपण ज्यांच्या घरातून चोरी केली आहे ते घर दिवंगत कवी नारायण सुर्वे यांचं आहे तेव्हा चोराला खूपच खंत वाटली.. पण तो एवढ्यावरच थांबला नाही. त्याला त्याचं खजीलपण अधिकच बोचू लागलं अन् केलेला गुन्ह्याच प्रायश्चित त्यानं वेगळ्या प्रकारे घेतलं.

ज्या घरातून मौल्यवान वस्तू चोरल्या ते घर कवी नारायण सुर्वे यांचे असल्याचे लक्षात आल्यानंतर चोराला पश्चाताप झाला आणि त्याने चोरून नेलेल्या वस्तू पुन्हा त्याच घरात आणून ठेवल्या. चोराच्या या कृत्याची आता अवघ्या महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील नेरळ येथे असलेले घर जेथून चोरट्याने एलईडी टीव्हीसह मौल्यवान वस्तू चोरल्या, ते घर नारायण सुर्वे यांचे आहे. लेखक सुर्वे यांचे 16 ऑगस्ट 2010 रोजी वयाच्या 84 व्या वर्षी निधन झाले होते. मुंबईत जन्मलेले लेखक नारायण सुर्वे हे प्रसिद्ध कवी आणि सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांच्या कवितांमध्ये शहरी कामगार वर्गाचा संघर्ष स्पष्टपणे दिसून येतो. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर नारायण सुर्वे यांना नेरळ येथे हक्काचं घर मिळालं होतं. याच घरामध्ये मागील आठवड्यात चोरी झाली होती. 

नारायण सुर्वे यांच्या या घरात त्यांची मुलगी सुजाता आणि त्यांचे पती गणेश घारे हे मागील काही वर्षांपासून राहत आहेत. पण काही दिवसांपूर्वी ते त्यांच्या मुलाकडे म्हणजे विरारला राहण्यासाठी गेले होते. त्यामुळे साधारण 10 दिवसांपासून हे घर बंद होते. या संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या घरातील काही मौल्यवान गोष्टी  चोरल्या होत्या .

अन् 'सुशिक्षित' चोर झाला भावुक

चोरट्याने दरोड्याच्या उद्देशाने घरात प्रवेश करून एलईडी टीव्हीसह काही साहित्य चोरून नेले होते. दुसऱ्या दिवशी आणखी काही वस्तू चोरण्यासाठी तो या घरात पुन्हा आला होता. त्याच वेळी एका खोलीत त्याला नारायण सुर्वे यांचा फोटो आणि काही गोष्टी आढळून आल्या. जे पाहताच चोर अक्षरश: जागीच थिजून गेला. 

चोराला आपल्या कृत्याचा बराच पश्चाताप झाला. त्यामुले त्याने आदल्या दिवशी चोरलेल्या वस्तू पुन्हा नारायण सुर्वे यांच्या घरात आणून ठेवल्या. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने या घराच्या भिंतीवर एका चिठ्ठी देखील चिकटवली होती. ज्यामध्ये त्याने नारायण सुर्वेंच्या घरात चोरी केल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. 

चोराची इमोनशल चिठ्ठी

'मला माहित नव्हतं की नारायण सुर्वे यांचं घर आहे. नाय तर मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी, जी वस्तू तुमची घेतली आहे. ती मी परत करत आहे. मी टीव्ही पण नेला होता परंतु आणून ठेवला. सॉरी...' 

असा अत्यंत भावनिक मजकूर लिहून ती चिठ्ठी अज्ञात चोराने नारायण सुर्वेंच्या घरातील एका भिंतीवर चिकटवून ठेवली.

पोलिसांच्या मते, हा चोर हा शिकला-सवरलेला असावा. त्यामुळे जेव्हा त्याला लेखकाच्या घराबाबत समजतं तेव्हा तो अत्यंत दु:खी झाला असावा आणि त्यामुळेच त्याने जे काही सामान चोरलं होतं ते सगळं परत केलं. आतापर्यंत अनेकदा चोरीच्या घटनांबाबत आपण ऐकलं आहे. मात्र, अशाप्रकारे चोरी केलेल्या वस्तू परत करण्याची घटना ही दुर्मिळच म्हणावी लागेल.  

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. नेरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 'नारायण सुर्वे यांची मुलगी सुजाता आणि त्यांचे पती गणेश हे जेव्हा नेरळच्या घरी परतले तेव्हा त्यांना चोराने चिकटवलेली एक चिठ्ठी सापडली. त्यानंतर या संपूर्ण घटनेचा खुलासा झाला. ज्याचा आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. टीव्ही आणि इतर वस्तूंवर सापडलेल्या बोटांच्या ठशांच्या आधारे पोलीस त्या सुशिक्षित चोराचा सध्या शोध घेत आहेत.

    follow whatsapp