sakshi murder case, why sahil killed her girlfriend : धारदार चाकूने सपासप 40 वार… त्यानंतर भल्यामोठ्या दगडाने केलेले प्रहार… यात 16 वर्षाच्या साक्षीचा जागेवरच मृत्यू झाला. थरकाप उडवणाऱ्या या घटनेनं दिल्लीच नव्हे तर देशही हादरला. पोलिसांनी या प्रकरणात साक्षीचा बॉयफ्रेंड साहिलला अटक केली. आता या प्रकरणासंदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून साक्षी तिचा एक्स बॉयफ्रेंड प्रवीणच्या पुन्हा जवळ येत होती, असं सांगितले जात आहे. यावरूनच साक्षी आणि साहिलमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर संतापलेल्या साहिलने साक्षीची हत्या केली. साहिलला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली आहे.
Delhi Shahbad Dairy Murder : काय प्रकरण आहे?
ही घटना घडली ती दिल्लीतील शाहबाद डेअरी येथे. 20 वर्षीय साहिलने 16 वर्षीय साक्षीवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तिला दगडाने ठेचून मारले. चाकूचे वारांनी रक्तबंबाळ झालेल्या उपचारादरम्यान अल्पवयीन साक्षीचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यामध्ये साहिल साक्षीवर चाकूने कसा हल्ला करतो हे पाहायला मिळत आहे. तसेच त्याने साक्षीवर दगडानेही आघात केला.
साक्षीची हत्या का?
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात साहिलला संशय होता की साक्षीचे तिच्या एक्स बॉयफ्रेंडसोबत अफेअर आहे. एवढेच नाही तर साहिलने काही दिवसांपूर्वी साक्षीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. साक्षी तिचा एक्स बॉयफ्रेंड प्रवीणशी बोलत असल्याचा संशय साहिलला येत होता आणि ती त्याच्या जवळ जात असल्याचंही साहिलला वाटू लागलं. तिने एक्स बॉयफ्रेंडसोबत बोलू नये म्हणून साहिलने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.
साक्षी-साहिल जून 2021 पासून होते रिलेशनमध्ये
साहिल आणि साक्षी जून 2021 पासून रिलेशनमध्ये होते, पण तिने काही दिवसांपासून साहिलशी बोलणे बंद केले होते. यावरून दोघांमध्ये भांडण सुरू होते. साक्षीला साहिलसोबत ब्रेकअप करायचे होते, तर साहिल तिला भेटण्याचा सतत प्रयत्न करत होता. शनिवारीही दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यानंतर साहिलने साक्षीची हत्या करण्याचा निर्णय घेतला. साक्षीच्या हातावर प्रवीण नावाचा टॅटूही सापडला आहे. साहिल आणि साक्षीच्या भांडणाचे हे देखील एक कारण असू शकते, असं म्हटलं जात आहे.
साहिलने साक्षीचा खून कसा केला?
साक्षी तिची मैत्रीण नीतूच्या मुलाच्या वाढदिवसाला हजेरी लावण्यासाठी बाहेर गेली, तेव्हा साहिलने तिला रस्त्यात अडवले. येथे पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर जीवे मारण्याच्या उद्देशाने आलेल्या साहिलने साक्षीवर चाकूने हल्ला केला. साहिलने अवघ्या काही वेळात तिच्यावर 40 वार केले. त्यानंतर बाजूला पडलेला भलामोठा दगड उचलून अक्षरशः चेंदामेंदा होईपर्यंत तिच्यावर वार केले.
कोण आहे साहिल?
शाहबाद डेअरी भागात साहिल कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. त्याच्या कुटुंबात तीन बहिणी, आई आणि वडील आहेत. साहिल हा मेकॅनिक असून तो एसी आणि रेफ्रिजरेटर बनवतो. साहिलचे इंस्टाग्राम प्रोफाइलही समोर आले आहे. तो जास्त मद्यपान करत असल्याचं त्यातून दिसून येतंय. त्याला रील बनवण्याचीही आवड आहे. त्यात त्याचे हुक्का ओढतानाचे अनेक रील्स आहेत. एका रीलमध्ये तो म्हणतो, “जग आपल्याला शांततेत जगू देत नाही भाई, दहशत निर्माण करणे आवश्यक आहे.” काही फोटोंमध्ये रुद्राक्ष माळ घातल्याचेही दिसत आहे.
साहिलला अटक कशी झाली?
साहिल साक्षीची हत्या करून फरार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू केला. यानंतर पोलीस मृताच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचले. जिथे पोलिसांना मारेकऱ्याची ओळख साहिल अशी सांगितली. यानंतर पोलीस साहिलच्या घरी पोहोचले, तो घरी उपस्थित नव्हता. हत्येनंतर फोन बंद करून साहिल फरार झाला होता.
हेही वाचा >> साक्षीच्या डोक्यात 7 वेळा दगड टाकणाऱ्या साहिलचं सापडलं सोशल मीडिया प्रोफाइल! – Mumbai Tak
येथून तो बुलंदशहर येथील आपल्या मावशीच्या घरी पोहोचला. मावशीने साहिलच्या आईवडिलांना तो आपल्या घरी आला असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्याचे लोकेशन शोधण्यात पोलिसांना यश आले. त्याला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक बुलंदशहर येथे पोहोचले आणि त्याला अटक करून दिल्लीत आणण्यात आले.
रिठाळामध्ये लपवून ठेवली होती शस्त्रे
चौकशीदरम्यान साहिलने सांगितले की, त्याने रिठाळ्यात हत्येनंतर वापरलेले शस्त्र लपवले होते. येथून तो बुलंदशहर येथे गेला. इतकंच नाही, तर पोलिसांना चकमा देण्याच्या उद्देशाने साहिलने दोन बस बदलल्या. त्याने त्याचा फोनही बंद केला होता. मात्र, नंतर पोलिसांनी त्याचा फोन जप्त केला आहे.
साक्षी 15 दिवसांपासून होती मैत्रिणीच्या घरी
साक्षी 15 दिवसांपासून तिची मैत्रीण नीतूच्या घरी होती. नीतूच्या मुलाच्या वाढदिवसाला घरच्यांना सांगून साक्षी निघून गेली होती. ती अनेकदा नीतूच्या घरी जायची आणि तिथेच राहायची. नीतूचा नवरा तुरुंगात आहे. नीतूने सांगितले की, ती साक्षीला 6-7 महिन्यांपूर्वीच भेटली होती. साक्षी साहिलला 3-4 वर्षांपासून ओळखत होती. बराच वेळ न बोलल्याने दोघांमध्ये भांडण सुरू होते.
साक्षीच्या मृत्यूवर नातेवाईक काय म्हणाले?
साक्षीची हत्या झाल्यानंतर तिच्या आईने साहिलला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “माझी मुलगी गेल्या 10 दिवसांपासून तिच्या मैत्रिणीच्या घरी राहत होती. यावर्षी ती दहावी उत्तीर्ण झाली होती.”
हेही वाचा >> थेट डोक्यातच घुसवला चाकू अन् 40 वार… साक्षीच्या भयंकर हत्येची Inside Story
साक्षीच्या आईच्या म्हणण्यानुसार ती आरोपीला ओळखत नव्हती. मुलीला साहिलबद्दल अनेकदा विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिने काहीच सांगितले नाही. त्याचवेळी साक्षीच्या वडिलांनी सांगितले की, “मुलीला वकील व्हायचे होते. साहिलने माझ्या मुलीची निर्घृण हत्या केली. त्याला फाशी झालीच पाहिजे”
शवविच्छेदनात काय समोर आले?
साक्षीचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही समोर आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये साक्षीच्या शरीरावर चाकूने वारंवार वार केल्याचे समोर आले आहे. तिच्या शरीरावर आणि डोक्यावर 34 जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. यातील 16 जखमा चाकूच्या आहेत.
इतकेच नाही तर तिच्या डोक्याला जड वस्तूने मारण्यात आल्याने डोके फाटल्याचे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. या घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्येही आरोपी साहिल साक्षीला दगडासारख्या जड वस्तूने मारताना दिसत आहे.
ADVERTISEMENT